Tirupati Prasad Controversy आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) येथे प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाडू गेल्या वर्षीपासून वादात आहेत. तिरुपतीचा लाडू हा भारतीयांच्या श्रद्धास्थानाचा विषय आहे. प्रसाद म्हणून मिळणाऱ्या या लाडवाप्रती श्रद्धा आणि भक्ती असल्याने या लाडवाला विशेष महत्त्व आहे.

पारंपरिकरित्या तूप, पीठ, साखर, आणि सुका मेवा यांसारख्या शुद्ध शाकाहारी घटकांपासून हे लाडू तयार होतात. मात्र, आता गेल्या काही वर्षांपासून त्यात बनावट तुपाचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षीदेखील या लाडवात तुपाच्या जागी बीफ टॅलोचा वापर केल्याच्या दाव्यांमुळे वादंग निर्माण झाला होता. नेमकं प्रकरण काय? तपासात काय समोर आले? मंदिर समितीची २५० कोटींची फसवणूक कशी झाली? त्याविषयी जाणून घेऊयात…

प्रकरण काय?

  • तिरुपतीच्या लाडू प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळ झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
  • या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हाती घेतला आहे.
  • समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. तूप पुरवठा करणाऱ्या या कंपनीने मागील ५ वर्षांत कुठूनही दूध किंवा लोणी (बटर) खरेदी केलेले नव्हते, तरीही त्यांनी मंदिराला २५० कोटी किमतीचे ६८ लाख किलो तूप पुरवल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणाचे तपशील उघड होताच अधिकाऱ्यांनी अजय कुमार सुगंध याला अटक केली. त्याने उत्तराखंडमधील भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीला मोनोडिग्लिसराइड्स आणि ॲसिटिक ॲसिड एस्टरसारखी विविध रसायने पुरवली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, लाडू प्रसादासाठी तूप पुरवण्याचे कंत्राट त्याला तिरुमला तिरुपती देवस्थानने दिले होते.

तिरुपतीच्या लाडू प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळ झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

कशी केली मंदिर समितीची फसवणूक?

२०१९ ते २०२४ या काळात डेअरीचे प्रवर्तक पॉमिल जैन आणि विपिन जैन यांनी कथितरित्या मंदिराला बनावट तूप पुरवले. त्यांनी सर्वप्रथम बनावट तूप बनवण्याचा कारखाना उभारला. तसेच, दूध खरेदी आणि पेमेंट नोंदींमध्ये बनावटगिरी केली. हे सर्व तपशील नेल्लोर न्यायालयात सादर केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालात नमूद आहेत. सीबीआयने सांगितले की, भोले बाबा डेअरीला २०२२ मध्ये अपात्र ठरवून काळ्या यादीत टाकले होते, तरीही त्यांनी मंदिर समितीला भेसळयुक्त तूप पुरवणे सुरूच ठेवले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार, त्यांनी इतर डेअऱ्यांच्या माध्यमातून कंत्राटासाठी बोली लावली, यात तिरुपती येथील वैष्णवी डेअरी, उत्तर प्रदेशातील मल गंगा आणि तामिळनाडूमधील एआर डेअरी फूड्स यांचा समावेश होता.

भेसळयुक्त तुपाचा पुरवठा कसा सुरु ठेवला?

केंद्रीय तपास संस्थेने हेदेखील उघड केले की, मागील वर्षी जुलैमध्ये एआर डेअरीने कथितरित्या पुरवलेले आणि मंदिर समितीने नाकारलेल्या जनावरांच्या चरबीची भेसळ असलेले तुपाचे चार कंटेनर, भोले बाबा डेअरीच्या प्रवर्तकांनी वैष्णवी डेअरीच्या माध्यमातून मंदिर समितीला पुन्हा पुरवले. एफएसएसएआय अधिकारी आणि एसआयटीने दिंडीगुल येथील एआर डेअरी प्लांटची तपासणी केली तेव्हा त्यांना आढळले की, तुपाचे ते चार टँकर कधीही एआर डेअरी प्लांटमध्ये परत आले नाहीत. त्याऐवजी ते वैष्णवी डेअरी प्लांटच्या जवळ असलेल्या एका स्थानिक स्टोन क्रशिंग युनिटकडे वळवले गेले होते.

एका महिन्यानंतर म्हणजे ऑगस्टमध्ये, आंध्र प्रदेश सर्कल श्रेणी अंतर्गत वैष्णवी डेअरीने टीटीडीला तूप पुरवले होते. या डेअरीने ट्रक्सवरील लेबले बदलली, गुणवत्ता सुधारणा डेटा बनावट केला आणि तेच नाकारलेले तूप तिरुपती ट्रस्टला पुन्हा पुरवले, असे सीबीआयने सांगितले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात पुढे म्हटले आहे की, तुपाचा हाच साठा नंतर जगप्रसिद्ध मंदिरातील तिरुपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरला गेला, जे लाखो भाविकांना वितरित केले जातात.

तपासकर्त्यांनुसार, अजय कुमारने कथितरित्या जवळजवळ सात वर्षांपासून भोले बाबा डेअरीचे संचालक पॉमिल जैन आणि विपिन जैन यांना मोनोग्लिसराइड्स, ॲसिटिक ॲसिड आणि एस्टर ही रसायने पुरवली होती. ही रसायने पाम तेल बनवण्यासाठी वापरली जातात. एसआयटीला आढळले की, दिल्लीतील एका मोठ्या वितरकाकडून दक्षिण कोरियातून आयात केलेली ही रसायने अजय कुमारने स्वतःच्या कंपनीच्या नावाने खरेदी करून डेअरीला पुरवली होती.

तपासकर्त्यांनी सांगितले की, त्यांनी अजय कुमार आणि भोले बाबा डेअरीच्या संचालकांना जोडणारे रासायनिक पुरवठा आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे गोळा केले आहेत. त्याला तीन दिवसांपूर्वी दिल्लीतून ताब्यात घेऊन एसआयटी कार्यालयात चौकशीसाठी तिरुपतीला आणले गेले आणि नंतर नेल्लोर एसीबी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत न्यायिक कोठडीत ठेवण्यात आले आहे.

२०२४ मधील वाद काय?

गेल्या वर्षी तेलुगु देसम पक्षाने प्रसादाच्या लाडूत कोणते पदार्थ वापरले जातात, याची तपासणी करून प्रयोगशाळेचा एक चाचणी अहवाल समोर आणला होता. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी, फिश ऑइल आणि बीफ टॅलोचा समावेश होता, असे अहवालात स्पष्ट केले गेले. हा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या अहवालानंतर भाजपा आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाने जोरदार आरोप करत वायएसआर काँग्रेसला घेरले होते.