निमा पाटील
सालाबादप्रमाणे यंदाही ऑक्सफर्डने ‘वर्ड ऑफ द इयर’ जाहीर केला आहे. अभिनेता टॉम हॉलंडने जून महिन्यात एका मुलाखतीमध्ये ‘रिझ’ हा शब्द वापरला होता. तसा हा शब्द मागील वर्षापासून वापरला जात आहे. पण हॉलंडच्या मुलाखतीनंतर समाज माध्यमांमध्ये या शब्दाचा वापर वाढला. विशेषतः ‘जनरेशन झी’ (१९९७-२०१२ या कालावधीत जन्म घेतलेल्या) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोरवयीन आणि तरुणांमध्ये या शब्दाचे वेड प्रचंड आहे.
‘रिझ’ म्हणजे काय?
‘रिझ’ हा बोलीभाषेतील शब्द आहे. एखाद्या व्यक्तीची ऐट, शैली, मोहकता, आकर्षकपणा किंवा व्यक्तीला स्वतःकडे प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंधांसाठी आकृष्ट करण्याची क्षमता अशी ऑक्सफर्डने त्याची व्याख्या केली आहे. ‘रिझ’ची उत्पत्ती ‘करिष्मा’ या शब्दापासून झाली आहे. करिष्माचा उच्चार इंग्रजीमध्ये चरिष्मा असा केला जातो. त्याच्या Charisma या स्पेलिंगमधील मधील ris एवढाच भाग उचलून त्यापासून rizz हा शब्द तयार करण्यात आला. नवीन शब्द तयार करण्याची ही असामान्य पद्धत आहे. रेफ्रिजरेटरपासून ‘फ्रिज’ आणि इन्फ्ल्युएंझापासून ‘फ्ल्यू’ हे शब्दही त्याचीच उदाहरणे आहेत, असे ऑक्सफर्ड लँग्वेजेसचे अध्यक्ष कॅस्पर ग्रॅथवोहल यांनी सांगितले.
ऑक्सफर्डने ‘वर्ड ऑफ द इयर’ कसा ठरवला?
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने (यूओपी) सोमवारी, ४ डिसेंबरला वर्षातील शब्दाची घोषणा केली. तज्ज्ञांनी तयार केलेल्या आठ शब्दांच्या यादीतून ‘रिझ’ या शब्दावर मोहोर उमटवण्यात आली. बोली आणि लेखी अशा तब्बल १९ अब्ज शब्दांचे भांडार तपासल्यानंतर ऑक्सफर्डचा ‘वर्ड ऑफ द इयर’ ठरवला गेला. वापर वाढलेल्या किंवा अलिकडेच भाषेमध्ये भर पडलेल्या शब्द किंवा शब्दप्रयोगाचा त्यासाठी विचार केला जातो.
या शब्दाचे वैशिष्ट्य काय आहे?
‘रिझ’ हा शब्द विशेषकरून तरुण पिढीशी जोडलेला आहे, विशेषतः किशोरवयीन मुला-मुलींशी. गेमिंग आणि इंटरनेटच्या संस्कृतीतून त्याचा उदय, विकास आणि प्रसार झाल्याची माहिती ग्रॅथवोहल यांनी दिली. ‘रिझ’चा वापर क्रियापद म्हणूनही करता येतो. ‘टू रिझ अप’ म्हणजे (एखाद्या व्यक्तीला) आकर्षित करणे, मोहात पाडणे किंवा गप्पा मारणे.
आणखी वाचा-विश्लेषण : इस्रायलचा दक्षिण गाझावर हल्ला… परिणाम काय?
‘रिझ’ शब्दाविषयी कोणती निरीक्षणे नोंदवण्यात आली?
भाषा कशी तयार होते, तिला कसा आकार येतो आणि विविध गटांमध्ये त्याची देवाणघेवाण कशी होते आणि त्यानंतर तिचा वापर व्यापक प्रमाणावर कसा वाढतो याचे ‘रिझ’ हे मनोवेधक उदाहरण आहे असे ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरुण पिढ्या स्वतः तयार केलेली, विकसित केलेली भाषा वापरून स्वतःचे अवकाश कसे निर्माण करतात याचेही हे उदाहरण आहे असे ऑक्सफर्डने म्हटले आहे. त्यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, नवीन पिढीच्या भाषेवर त्यांच्या समाजकार्यापासून जीवनशैलीपर्यंत अनेक बाबींचा प्रभाव पडलेला दिसतो.
अंतिम फेरीत कोणते शब्द होते?
वर्षातील सर्वात महत्त्वाचा शब्द ठरवण्यासाठी ‘सिच्युएशनशिप’, ‘स्विफ्टी’, ‘बेज फ्लॅग’, ‘डि-इन्फ्ल्युएन्सिंग’, ‘पॅरासोशल’, ‘हीटडोम’ आणि ‘प्रॉम्प्ट’ हे अन्य सात शब्द अंतिम यादीत होते. ‘सिच्युएशनशिप’ म्हणजे औपचारिक किंवा प्रस्थापित नसलेले प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंध. गायिका टेलर स्विफ्टच्या उत्साही चाहत्यांसाठी ‘स्विफ्टी’ हा शब्द वापरला जातो. लोकांना विशिष्ट खरेदीपासून किंवा वापरापासून प्रवृत्त करण्याच्या प्रकारासाठी ‘डि-इन्फ्ल्युएन्सिंग’ हा शब्द आहे. एखाद्या विचित्र किंवा वैशिष्ट्यपूर्ण पात्र, पण ते मुळातच चांगले किंवा वाईट असेल असे नाही या संकल्पनेसाठी ‘बेज फ्लॅग’ हा शब्दप्रयोग वापरला जातो. पॅरासोशल म्हणजे एखाद्या व्यक्तीशी प्रत्यक्ष ओळख नसताना जोडले गेलेले एकतर्फी नाते, उदाहरणार्थ चाहत्यांचे प्रसिद्ध व्यक्तीशी, वाचक-प्रेक्षकाचे एखाद्या कादंबरी अथवा चित्रपटातील पात्राशी असलेले नाते. ‘हीट डोम’ म्हणजे एखाद्या प्रदेशावर गरम हवा अडकून उच्च दाबाचा पट्टा तयार होतो ती नैसर्गिक घटना. सरतेशेवटी, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोग्रामसाठी दिलेल्या सूचनेला प्रॉम्प्ट म्हणतात.
‘वर्ड ऑफ द इयर’ ठरवण्याची पद्धत कोणती आहे?
कॅस्पर ग्रॅथवोहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमधून शब्दकोशगारांचे पथक एकत्रितपणे शब्द निवडण्यासाठी समोर असलेल्या पुराव्यांचा आढावा घेते आणि त्यानंतर ‘वर्ड ऑफ द इयर’ निवडला जातो. त्यासाठी विविध घटक लक्षात घेतले जातात आणि भाषेसंबंधी आकडेवारीचे विश्लेषण केले जाते. एखाद्या शब्दाचा किती जास्त प्रमाणात वापर केला जातो हा महत्त्वाचा मापदंड असतो. वर्षभरात एखाद्या शब्दाच्या वापरात अचानक वाढ दिसून आली तर ती बाब विचारात घेतली जाते. त्यानंतर त्या शब्दाशी संबंधित संवाद आणि घडामोडींची विचार केला जातो आणि त्याचा वापर का वाढला असेल याचा तपास केला जातो. दरवर्षी ‘वर्ड ऑफ द इयर’ ठरवण्यासाठी साधारण ३० ते ४० शब्द स्पर्धेत असतात. ही प्रक्रिया वर्षभर सुरू असते. यूओपीच्या कर्मचाऱ्यांनाही याबद्दल प्रश्न विचारले जातात. या ३०-४० शब्दांमधून अंतिम यादी तयार केली जाते. मात्र हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट केला जातोच असे नाही.
सर्वसामान्य लोकांचा यामध्ये सहभाग असतो का?
ऑक्सफर्डने २०२२पासून ‘वर्ड ऑफ द इयर’ निवडताना सर्वसामान्य लोकांचे मत मागवण्याची पद्धत सुरू केली. त्यामध्ये, अंतिम तीन शब्दांची निवड करताना जगभरातील लोकांना मतदान करण्याची संधी देण्यात आली. त्या वर्षी त्यासाठी ३.१८ लाख लोकांनी केलेल्या दिलेल्या मताचा विचार करून ‘गोब्लिन मोड’ हा शब्द ‘वर्ड ऑफ द इयर’ ठरला होता. तो शब्द सर्वात प्रथम २००९ मध्ये ट्विटरवर वापरण्यात आला होता. फेब्रुवारी २०२२मध्ये समाज माध्यमांवर तो मोठ्या प्रमाणात वापरला गेला आणि लवकरच वर्तमानपत्रे व मासिकांमध्येही त्याने स्थान पटकावले होते. त्याच्या आदल्या वर्षी कोविड लशींवरून ‘व्हॅक्स’ हा शब्द ‘वर्ड ऑफ द इयर’ निश्चित करण्यात आला होता. २०२० या कोविड वर्षात कोणताही एक शब्द स्वीकारण्यात न येऊन त्या वर्षी ‘वर्ड ऑफ द इयर’ जाहीर केला गेला नाही. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने वर्षाचा शब्द जाहीर करण्याची पद्धत सुरू केल्यापासून पहिल्यांदाच असे घडले होते.
nima.patil@expressindia.com