संदीप नलावडे

गाझा पट्टीच्या उत्तरेकडील बराचसा भाग बेचिराख केल्यानंतर इस्रायली सैन्याने आता दक्षिणेकडे मोर्चा वळविला आहे. तीन दिवसांच्या हवाई बॉम्बहल्ल्यानंतर इस्रायलने दक्षिणेकडील भागांत भूदल हलविले असून जमिनीवरून मारा करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायल प्रशासनाने सामान्य नागरिकांना दक्षिण गाझा परिसर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तरेतून दक्षिणेकडे आश्रय घेतलेले २३ लाख नागरिक कुठे जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दक्षिण गाझातील या युद्धाविषयी…

israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
israel withdraws troops from southern gaza
दक्षिण गाझामधून इस्रायलचं सैन्य माघारी; नेमकं कारण काय?

दक्षिण गाझामध्ये सध्या काय घडत आहे?

आठवडाभराच्या युद्धविरामानंतर इस्रायल सैन्याने पुन्हा युद्धास सुरुवात केली असून युद्धाची तीव्रता वाढविली आहे. उत्तर गाझामधील बहुतेक भाग बेचिराख केल्यानंतर आता दक्षिण गाझाकडे इस्रायली सैन्याने आपला मोर्चा वळविला आहे. दक्षिण गाझामधील खान युनिस या मोठ्या शहरामध्ये आणि त्याच्या आसपासच्या परिसरांत बॉम्बफेक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हवाई बॉम्बस्फोट आणि भू-आक्रमणामुळे या शहरातील नागरिक भयभीत झाले असून पुन्हा स्थलांतराची वेळ त्यांच्यावर आली आहे. डझनभर इस्रायली रणगाडे, युद्धवाहने आणि बुलडोझर खान युनिस शहरात घुसले आहेत. खान युनिस शहरात सध्या विस्थापित पॅलेस्टिनी राहत आहेत. उत्तर गाझाच्या हल्ल्यानंतर बहुतेक पॅलेस्टिनींनी दक्षिणेकडे आश्रय घेतला होता. इस्रायल डिफेन्स फोर्सचे (आयडीएफ) प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्झी हलेवी यांनी सांगितले की, आम्ही उत्तर गाझामध्ये लढल्यानंतर आता दक्षिण गाझा बेचिराख करणार आहोत. इस्रायल संपूर्ण गाझामध्ये भू-युद्धमोहीम चालवणार आहे. खान युनिसच्या नासेर रुग्णालयात युद्धातील जखमी झालेल्या शेकडो रुग्णांना दाखल केले आहे.

आणखी वाचा-विश्लेषण : ‘ग्रीन कार्ड’च्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो भारतीयांना दिलासा?

इस्रायलचे दक्षिण गाझामध्ये हल्ला करण्याचे कारण…

उत्तरेकडील हल्ल्यानंतर हमासच्या बहुतेक दहशतवाद्यांनी दक्षिण गाझाचा आश्रय घेतल्याचा संशय इस्रायलला आहे. दक्षिण गाझातील बहुतेक शहरांमध्ये आणि विशेषत: खान युनिस शहरामध्ये हमासचे दहशतवादी लपून बसले आहेत, असा दावा इस्रायल लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. सात दिवसांच्या युद्धविरामांतर्गत हमासने गाझामध्ये ठेवलेले ११० ओलीस सोडले, तर त्या बदल्यात २४० पॅलेस्टिनी इस्रायली तुरुंगातून सोडण्यात आले. यापैकी काही पॅलेस्टिनी दक्षिण गाझामध्ये लपून हमासला मदत करत आहेत, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिणेकडे लपलेल्या हमास दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी या परिसरात हल्ला करण्याचे कारण इस्रायलकडून देण्यात आले आहे.

सामान्य नागरिकांबाबत इस्रायलची काय भूमिका?

दक्षिण गाझामध्ये आक्रमण वाढविले असले तरी सामान्य नागरिकांना स्थलांतराचे आदेश दिले असल्याचे इस्रायली प्रशासनाने सांगितले. इस्रायली सैन्याने रविवारी खान युनिसचे अनेक भाग रिकामे करण्याचे आदेश दिले आणि नागरिकांना तात्काळ या परिसरातून स्थलांतर करण्याचे आवाहन केले. उत्तरेकडील हल्ल्यानंतर अनेक पॅलेस्टिनींनी दक्षिण भागाचा आसरा घेतला होता. मात्र आता या परिसरातही युद्धविस्तार झाल्याने २३ लाख नागरिकांपुढे आश्रय कुठे घ्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दक्षिण गाझामधील बाॅम्बहल्ल्यानंतर सामान्य नागरिकांना स्थानिक रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका आणि खासगी वाहने पाठविण्यात आल्याचा दावा इस्रायली प्रशासनाने केला आहे.

संयुक्त राष्ट्रांचे या युद्धविस्ताराबाबत मत काय?

‘गाझामधील कोणतीही जागा सुरक्षित नाही,’ असे मत संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रांच्या या विभागाच्या अंदाजानुसार गाझामधील १८ लाख म्हणजेच लोकसंख्येच्या ७५ टक्के नागरिक विस्थापित झाले आहेत. गाझामधील आरोग्यविषयक परिस्थिती तासातासाला बिघडत आहे, अशी चिंता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांनी आपले वैर समाप्त करावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले.

आणखी वाचा-विश्लेषण : बाबरी पाडल्यानंतर भारतीय राजकारणाला कलाटणी का मिळाली? 

इस्रायल-हमास युद्धाची युरोपमध्ये चिंता का?

इस्रायल-हमास युद्धामुळे युरोपमध्ये ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा धोक्याचा इशारा युरोपीय संघटनेने दिला आहे. ख्रिसमसच्या सुट्टीत युरोपमधील काही शहरांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये आयफेल टॉवर परिसरात झालेल्या एका प्राणघातक हल्ल्याची चौकशी करताना फ्रेंच तपासकर्त्यांनी हा इशारा दिला आहे. आयफेल टॉवरजवळ एका जर्मन-फिलिपिनो पर्यटकाला चाकूने भोसकून ठार मारण्यात आले, तर अन्य दोघांना हातोड्याने जखमी करण्यात आले. हल्लेखोर आयसिस या दहशतवादी संघटनेशी निष्ठा बाळगणारा असल्याचे तपासात उघड झाले आहे. ‘इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध युरोपमध्ये सामाजिक ध्रुवीकरणाचे कारण बनू शकेल. ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये युरोपीय संघातील देशांमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो,’ असे युरोपीय संघाच्या गृह विभागाचे आयुक्त यल्वा जोहानसन यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यांत युरोपमधील अनेक देशांच्या राजधानींमध्ये हजारो नागरिकांनी पॅलेस्टिनी समर्थक मोर्चे काढले, तर काही ठिकाणी इस्रायल आणि ज्यू समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले होते.

sandeep.nalawade@expressindi.com