Education History Evolution in india : १८२२ साली ब्रिटीश सर्जन्सच्या मेडिकल बोर्डाने भारत सरकारच्या तत्कालीन सचिवांना एक पत्र पाठवलं. या पत्रात भारतीयांना वैद्यकीय शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं. नागरिकांचे आरोग्य चांगलं राहावं आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी तयार व्हावेत, असा त्यामागचा उद्देश होता; पण ब्रिटिशांचा हा एकमेव हेतू नव्हता. आयुर्वेद व युनानी पद्धतीवरील उपचारांवर विश्वास नसल्यामुळे त्यांनी युरोपिय डॉक्टरांना भारतात आणलं होतं. मात्र, १८ व्या शतकाच्या मध्यापासून युद्धे सुरू झाली आणि ईस्ट इंडिया कंपनीचे सर्जन लष्करी सेवेत गुंतले गेले.
यादरम्यान, कंपनीच्या सैन्यातील भारतीय सैनिकांनी ब्रिटीश सर्जन्सकडून वैद्यकीय उपचार घेण्यास सुरुवात केली; परंतु उच्चवर्णीय भारतीय सैनिकांनी जातीय बंधनाच्या कारणास्तव युरोपियन डॉक्टरांनी तयार केलेली औषधे घेण्यास नकार दिला. यावर उपाय म्हणून कंपनीने भारतीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नवीन तुकड्यांमध्ये नेमणूक केली. हे कर्मचारी ब्रिटीश सर्जन्सकडून चिठ्ठी घेऊन औषधे तयार करीत होते.
१८३५ साली वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना
याच पार्श्वभूमीवर, १८३५ साली कलकत्ता येथे (आताचे कोलकाता) ब्रिटीश भारतातील पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाची (कलकत्ता मेडिकल कॉलेज, पूर्वीचे नाव मेडिकल कॉलेज ऑफ बंगाल) स्थापना करण्यात आली. त्या काळात कलकत्ता ही ब्रिटीश भारताची राजधानी व राजकीय तसेच प्रशासकीय केंद्र होते, त्यामुळे संसाधने व मनुष्यबळ सहज उपलब्ध व्हावे म्हणून वैद्यकीय महाविद्यालयासाठी या ठिकाणची निवड करण्यात आली. दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर भारतात पाश्चिमात्य वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात झाली.
आणखी वाचा : Who is Kim Ju-Ae : किम जोंग उन यांची १२ वर्षांची मुलगी होणार उत्तर कोरियाची नवी हुकूमशाह?
वैज्ञानिक पद्धत पारंपरिक ज्ञानापेक्षा वरचढ
लेखक पाटी बी व हॅरिसन हे त्यांच्या ‘Perspectives on Europe’s encounter with Indian medical systems’ या पुस्तकात लिहितात, “पाश्चात्य वैद्यकशास्त्र, आयुर्वेद आणि युनानी पद्धती यांच्यात सुरुवातीच्या संवादाच्या काळात काही समान विचार होते. मानवी शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन यावर आधारित सिद्धांत, तसेच आजार हा या संतुलनाच्या बिघाडामुळे होतो ही संकल्पना या तिन्ही वैद्यकीय पद्धतींमध्ये मान्य होती. ही समानता परस्पर आदर वाढवणारी ठरली आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांकडून शिकण्याची तयारी दर्शवली. मात्र, युरोपमध्ये तर्कशास्त्राला अधिक प्राधान्य मिळालं. अनुभवावर आधारित निरीक्षण आणि वैज्ञानिक पद्धतींना पारंपरिक ज्ञानापेक्षा वरचढ मानलं जाऊ लागलं, त्यामुळे युरोपियन डॉक्टरांनी आपली वैद्यकीय पद्धतच श्रेष्ठ मानायला सुरुवात केली.”
पूर्वी भारतात वैद्यकीय शिक्षण कसं होतं?
- भारतात एमबीबीएसच्या शिक्षणाला १८३५ पासून सुरुवात झाली.
- ब्रिटिशांच्या राजवटीत भारतातील वैद्यकीय शिक्षण आजच्या तुलनेत वेगळं होतं.
- आज एमबीबीएसचा अभ्यासक्रम ४.५ वर्षांचा असून त्यानंतर एक वर्षाचा सराव (इंटर्नशिप) अनिवार्य असतो.
- मात्र, त्या काळात भारतातील एमबीबीएसचा अभ्यासक्रम फक्त तीन वर्षांचा होता.
- अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्र (Anatomy), शरीरक्रिया शास्त्र (Physiology) आणि औषधशास्त्र (Pharmacology) विषयाचे धडे दिले जात होते.
- दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात त्यांना औषधोपचार (Medicine) आणि शस्त्रक्रिया (Surgery) यांचे शिक्षण दिलं जायचं.
विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण कसं दिलं जायचं?
वैद्यकीय विद्यार्थ्यांना क्लिनिकल शिक्षणासाठी जनरल हॉस्पिटल, कंपनीचे दवाखाने, नेत्ररोग रुग्णालय आणि लसीकरण विभागात काम करावं लागत होतं. वैद्यकीय शिक्षणाचे माध्यम इंग्रजी होतं. १८३५ मध्ये स्थापन झालेल्या मेडिकल कॉलेज ऑफ बंगालमध्ये १४ ते २० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. एमबीबीएसची पहिली बॅच १८३९ साली पदवीधर झाली आणि भारतात वैद्यकीय शिक्षणाची पाळंमुळं रोवली गेली. सध्या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय किमान १७ वर्षे असावं लागतं. तसेच त्याला एनईईटी-यूजी (NEET-UG) परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. एमबीबीएस किंवा बीडीएसनंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी एनईईटी-पीजी (NEET-PG) परीक्षा घेतली जाते.

भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात
अठराव्या शतकात भारतात वैद्यकीय शिक्षणाचा पाया रोवला गेला. सध्याच्या घडीला देशभरात जवळपास ७८० वैद्यकीय महाविद्यालये (MBBSचे शिक्षण देणारी, NMC मान्यताप्राप्त) कार्यरत आहेत. मात्र तरीदेखील भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जावे लागत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेतून (NEET) स्वत:ला सिद्ध केल्यानंतरही वैद्यकीय महाविद्यालयांमधील ६० ते ७० लाख रुपयांचा खर्च परवडत नसल्याने दरवर्षी देशातून दरवर्षी जवळपास ४० ते ५० हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जात आहेत.
हेही वाचा : भारताविरोधात दंड थोपाटणारे ट्रम्प चीनसमोर कसे नरमले? कारण काय?
भारतात वैद्यकीय शिक्षणाचा खर्च सर्वाधिक
रशिया, युक्रेन, कझाकिस्तान, फिलिपाईन्स व चीन या देशांत वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थी पसंती देत आहेत. विशेष म्हणजे- देशात दरवर्षी २५ लाखांच्या आसपास विद्यार्थी यूजी नीट परीक्षा देतात. यातील १० ते १२ लाख विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होतात. जे विद्यार्थी १ लाखांच्या क्रमवारीत असतात त्यांना खासगी व अभिमत विद्यापीठामध्ये प्रवेशाची संधी मिळते. अधिक गुण असतात त्यांना खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी असते. मात्र तेथे साडेचार वर्षासाठी ५० ते ६० लाख रुपये खर्च येतो. याउलट परदेशामध्ये संपूर्ण वैद्यकीय शिक्षणाचा खर्च हा ३० ते ३५ लाख रुपये असतो. त्यामुळे देशात शिक्षण घेण्याऐवजी हे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याला प्राधान्य देतात.
देशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी किती जागा?
देशात १ लाख १८ हजारांच्या आसपास वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जागा आहेत. त्यातील २५ ते ३० हजार जागा या सरकारी महाविद्यालयांमध्ये आहेत. त्यात ५० टक्के जागांवर आरक्षण असते. त्यामुळे मुंबईतील केईएमसारख्या रुग्णालयात प्रवेश मिळविण्यासाठी पहिल्या दोन ते तीन हजारांमध्ये येणे गरजेचे आहे. परदेशी विद्यापीठामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी जवळपास ४० ते ५० हजार विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात, अशी माहिती समोर आली आहे.