तीनही सैन्यदलांत समन्वय राखण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांचा एकात्मिक युद्ध विभाग अर्थात थिएटर कमांड स्थापन करण्याची रखडलेली प्रक्रिया म्हणजेच ‘थिएटरायझेशन’ प्रगतीपथावर आहे. आजवरची ही सर्वात मोठी लष्करी सुधारणा मानली जाते. चीनने दशकभरापूर्वी सशस्त्र दलांची पाच थिएटर कमांडमध्ये पुनर्रचना केली आहे. चीन आणि पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास किंवा इतरही अनेक कारणांसाठी थिएटरायझेशन महत्त्वाचे ठरणार आहे. त्याविषयी…

‘थिएटरायझेशन’ म्हणजे काय ?

लष्कर, हवाई दल आणि नौदल या तीन दलांच्या क्षमता एकत्रित करणारी ही संकल्पना आहे. त्यांच्या संसाधनांचा युद्ध व अन्य मोहिमांत चांगल्या प्रकारे वापर करण्याची ही युद्धरणनीती आहे. ज्यात सैन्य दलांची शस्त्रे, मनुष्यबळ एका विभागांतर्गत (थिएटर कमांड) आणण्याची रचना केली जाईल. भौगोलिकदृष्ट्या प्रत्येक विभागात तीनही दलांचे घटक असतील, ज्यामुळे एकसंध आणि प्रभावी मोहीम राबविता येईल. प्रत्येक विभागावर विशिष्ट भौगोलिक प्रदेशाच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. तीनही दलांच्या एकीकरणातून अस्तित्वात येणाऱ्या एकात्मिक युद्ध विभागात सामाईक लष्करी कारवाईबरोबर पुरवठा व्यवस्था, वाहतूक, दळणवळण, देखभाल-दुरुस्तीची संयुक्त व्यवस्था नियोजित आहे. सामूहिक शक्तीतून परिणामकारकता साधण्याचा उद्देश आहे.

हेही वाचा…आता कोकणातही कोस्टल रोड…९३ पर्यटनस्थळे जोडणारा रेवस – रेड्डी सागरी किनारा मार्ग प्रकल्प कसा असेल?

परिवर्तन कसे असेल?

सुमारे १७ लाखांच्या बलाढ्य भारतीय सैन्यदलांचे सध्या १७ स्वतंत्र कमांड किंवा विभाग आहेत. यामध्ये लष्कर आणि हवाई दलाच्या प्रत्येकी सात आणि नौदलाच्या तीन यांचा समावेश आहे. प्रत्येक दल स्वतंत्रपणे जबाबदारी सांभाळते. यात बदल होऊन तीनही दलांचा एकात्मिक युद्ध विभाग अस्तित्वात येईल. अंदमान-निकोबार बेटावर ही संकल्पना आधीपासून प्रत्यक्षात आली आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडही कार्यरत आहे. पाकिस्तान व चीनला तोंड देण्यासाठी एकात्मिक युद्ध विभागात तिसऱ्या सागरी थिएटर कमांडसह दोन एकात्मिक थिएटर कमांडची स्थापना असू शकेल. प्रत्येक दलासाठी एक अशा तीन थिएटर कमांडसाठी काही घटक आग्रही होते. यात पुढील पर्याय म्हणजे दोन्ही शेजारी राष्ट्रांना डोळ्यासमोर ठेवत स्थापलेल्या कमांड्समध्ये लष्कर व हवाई दलाच्या फिरत्या नियुक्त्या असतील आणि सागरी कमांडचे नेतृत्व नौदल अधिकारी करतील. परंतु, या संदर्भातील अंतिम रूपरेषा स्पष्ट झालेली नाही.

विचाराधीन प्रारूप कसे आहे?

विचाराधीन प्रारूपात किमान सहा नवीन एकात्मिक युद्ध विभागांची घडी बसविण्याचा प्रयत्न होत आहे. पहिल्या टप्प्यात हवाई संरक्षण कमांड आणि सागरी (मेरीटाईम) थिएटर कमांड निर्मितीचा समावेश आहे. हवाई संरक्षण कमांड तीनही सेवांच्या हवाई संरक्षण सामग्रीवर नियंत्रण ठेवेल. तिच्यावर हवाई शत्रूंकडून लष्करी मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली जाईल. प्रयागराज येथील भारतीय हवाई दलाचे तीन तारांकित अधिकारी (थ्री स्टार जनरल) या विभागाचे नेतृत्व करतील. सागरी थिएटर कमांड सागरी धोक्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदार असेल. त्यात लष्कर व हवाई दलाचे घटक असतील. ही कमांड कर्नाटकातील कारवार येथे असेल आणि तिचे नेतृत्व भारतीय नौदलाच्या तीन तारांकित अधिकाऱ्याकडे राहणार आहे. पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील आघाड्या सुरक्षित राखण्यासाठी देशाकडे इतर तीन एकात्मिक युद्ध विभाग असणे अपेक्षित आहे. संसाधनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी लॉजिस्टिक कमांड कार्यरत राहील.

हेही वाचा…‘मॅकडोनाल्ड’ कंपनीला दणका देणारे मॉर्गन स्परलॉक कोण होते?

रखडलेल्या प्रक्रियेची प्रगती कशी?

प्रारंभीच्या अंदाजानुसार २०२३ पर्यंत थिएटर कमांड्स तयार होणे अपेक्षित होते. कमांडच्या मूलभूत रचनेबाबत सशस्त्र दलांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे प्रक्रियेला विलंब झाला. भारतीय सैन्यदलांचे पहिले संयुक्त प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक युद्ध विभाग स्थापण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक महिने त्यांचे पद रिक्त होते. विद्यमान संरक्षणप्रमुख अनिल चौहान यांनी एकत्रीकरणास नव्याने गती दिली. महत्त्वाकांक्षी लष्करी सुधारणेबाबत तीनही दलांमध्ये एकमत होऊन ती प्रगती करीत असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. ही पुनर्रचना भारतीय सैन्यदलांना लष्करी सज्जता व युद्ध लढाई कौशल्याची पुढील कक्षात पायाभरणी करेल, असा विश्वास सैन्यदलांचे प्रमुख चौहाण यांना आहे. तीनही दलांच्या एकात्मिक रचनेतून एक संयुक्त संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. अल्पावधीत होणारी ही प्रक्रिया नाही. परंतु, किमान संयुक्त प्रशिक्षण, प्रशासन व पुरवठा व्यवस्था व्यवस्थापन प्रणाली हे उपक्रम चालू वर्षात स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. संरक्षण मंत्रालयाने तीनही दलांना आंतरसेवा संघटनेत (आयएसओएस) विलीन करीत निर्मिलेल्या संयुक्त सेवा संस्थांमध्ये लष्करी न्यायाच्या समान अमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले. आंतर-सेवा संस्था (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायद्यान्वये कमांड प्रमुखांना प्रभावी देखरेख करण्याचा अधिकार प्राप्त झाला.

हेही वाचा…Watermelon at Cannes: हमास-इस्रायल युद्धादरम्यान कलिंगड कसे ठरले पॅलेस्टाईन एकतेचे प्रतीक?

चीनचे नियोजन कसे आहे?

लष्कर, हवाई दल व नौदलाच्या संयुक्त कार्यवाहीच्या व्यवस्थापनासाठी चीनने खास यंत्रणा विकसित केली आहे. संयुक्त चढाई व संख्यात्मक बदलासाठी केंद्रीय लष्करी आयोगात साधारणत: १३ वर्षांपूर्वी सेवा कमांडर हे नवीन पद निर्माण केले होते. सुमारे २० लाख जवानांच्या चिनी सैन्याची २०१६ मध्ये पाच थिएटर कमांडमध्ये पुनर्रचना केली गेली आहे. त्याचा उद्देश प्रहारक क्षमता विस्तारणे, कमांड व नियंत्रण सुधारणे होता. या नव्या प्रणालीत लष्कर, नौदल व हवाई दलासह विविध दलांची एकात्मिक कमांड आहे. भारत-चीन दरम्यानच्या सीमेचे भारतीय लष्कराच्या चार आणि भारतीय हवाई दलाच्या तीन कमांड संरक्षण करतात, तर चीनची पश्चिम थिएटर कमांड संपूर्ण ३४८८ किलोमीटर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसाठी जबाबदार आहे.