अश्रू म्हटले की आपल्याला डोळ्यात तरळणारे पाणी दिसते. शतकानुशतके, लोक याबद्दल बोलत आले आहेत. भावना दर्शवण्याची ताकद त्यांच्यात आहेच. पण तुम्हाला माहीत आहे का, की हे अश्रू जीवनदायीदेखील ठरू शकतात. एका संशोधनाने या अश्रूंचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे अश्रू उंटाचे आहेत आणि ते २६ प्रकारच्या सापांचे विष निष्क्रिय करू शकतात. कसे, ते आपण पाहुया.
कोणी केले संशोधन?
बिकानेरमधील राष्ट्रीय उंट संशोधन केंद्र (NRCC) येथील शास्त्रज्ञांनी उंटांच्या अश्रूबाबत संशोधन केले आहे. यामध्ये उंटाच्या अश्रूंपासून मिळवलेली प्रतिपिंडे किंवा अँटीबॉडीज आणि त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीचा वापर सापाच्या विषाशी लढण्यासाठी केला जाऊ शकतो, हे शोधण्यात आले. केवळ राष्ट्रीय उंट संशोधन केंद्रानेच नव्हे तर अनेक संस्थांनी यावर यापूर्वी संशोधन केले आहे. लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमधील सर्पदंशावरील संशोधनातही आढळून आले की उंटाच्या अश्रूंचा वापर सापांच्या विषावर उतारा औषध बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच दुबईच्या सेंट्रल व्हेटर्नरी रिसर्च लॅबोरेटरीने केलेल्या अभ्यासातही उंटाच्या अश्रूंमध्ये आश्चर्यकारक क्षमता असतात, हे सिद्ध झाले आहे. शास्त्रज्ज्ञांच्या मते उंटाच्या अँटीबॉडीपासून सापाच्या विषाचे अँटी-व्हेनम बनवण्याचा आणखी एक मोठा फायदा आहे. कोणतेही विषरोधक सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड-चेनची गरज असते. परंतु उंट हा प्राणी उष्णता सहन करण्याची अफाट शक्ती ठेवतो. हाच गुण जर अँटी-व्हेनममध्ये आला तर ते साठवण्यासाठी कोल्ड-चेनची गरज भासणार नाही.
उंटाचे अश्रू शक्तिशाली का आहेत?
उंटांना ‘वाळवंटातील जहाज’ म्हणून ओळखले जाते. ते खडतर परिस्थितीत अनेक मैल प्रवास करण्यास नागरिकांना मदत करतात. उंटाचे अश्रू वाळवंटातील संसर्गापासून नैसर्गिक संरक्षण देतात. त्यांच्या अश्रूंमध्ये महत्त्वाचे जैविक गुणधर्म आहेत जे कठोर वाळवंटातील वातावरणात टिकून राहण्यास मदत करतात. उंटांच्या डोळ्यात वाळू न जाण्यासाठी एक विशेष संरक्षक यंत्रणा आहे. यामुळे उंटाच्या डोळ्यात संसर्ग होत नाही. उंटाच्या अश्रूंना तीन थर असतात. बाहेरील थर हा लिपीडचा बनलेला असतो. यामुळे डोळे कोरडे होत नाहीत. मधल्या थरात प्रथिने असतात. तर आतील थरात कर्बोदके असतात. उंटांच्या अश्रूंमध्ये विविध प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जी डोळ्यांचे सूक्ष्मजीव संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. वाळवंटातील परिस्थितीत जिथे धूळ, वाळू हवेत असते तिथे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. उंटांच्या अश्रूंमधील एक प्रमुख संरक्षणात्मक घटक म्हणजे लायसोझाइम. हे त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. बहुतेकदा नैसर्गिक प्रतिजैविक म्हणून ओळखले जाणारे लायसोझाइम विशिष्ट जीवाणू, बुरशी आणि अगदी विषाणूंच्या पेशी भिंती तोडू शकते, अशा प्रकारे उंटांच्या डोळ्यांचे रक्षण होते.
संशोधनात काय आढळले?
‘मनीकंट्रोल’ वेबसाइटरील एका वृत्तानुसार, बिकानेरमधील राष्ट्रीय उंट संशोधन केंद्र (NRCC) येथील शास्त्रज्ञांनी उंटांच्या अश्रूंवर अनेक प्रयोग केले, ज्यामध्ये त्यांनी उंटांना सॉ-स्केल्ड व्हायपर (Echis carinatus sochureki) या अत्यंत विषारी सापाचे विष टोचले. यावेळी उंटांचे अश्रू आणि रक्तातून काढलेल्या अँटीबॉडीज विषाच्या घातक परिणामांना विशेषतः रक्तस्राव आणि गुठळ्यांना प्रभावीपणे प्रतिकार करतात असे आढळून आले. उल्लेखनीय म्हणजे, उंटांपासून मिळवलेल्या या अँटीबॉडीजमुळे कमी ॲलर्जीक प्रतिक्रिया निर्माण झाल्या आणि घोड्याच्या इम्युनोग्लोबुलिन (IgG) पासून मिळवलेल्या पारंपारिक अँटीवेनम्सच्या तुलनेत त्या अधिक शक्तिशाली होत्या.
उंटांच्या अश्रूंना महत्त्व का?
भारतात सर्पदंशाचे प्रमाण गंभीर आहे. दरवर्षी जवळजवळ ५८,००० मृत्यू सर्पदंशाने होतात आणि आणखी १,४०,००० लोक अपंग होतात. जगभरातील हा सर्वात मोठा आकडा आहे. उंटापासून बनवलेल्या अँटीबॉडीजमुळे आता सर्पदंशावर कमी खर्चाचे, सुरक्षित उपचार मिळू शकतात. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकेल कारण येथे सर्पदंश होणे आणि वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळणे ही गंभीर समस्या आहे.
उंट पाळणाऱ्यांना काय फायदा?
बिकानेर, जैसलमेर आणि जोधपूरसारख्या प्रदेशातील उंट पाळणाऱ्या समुदायांसाठी हे संशोधन आर्थिकदृष्ट्या परिवर्तनकारी ठरत आहे. राष्ट्रीय उंट संशोधन केंद्राने उंट पाळणाऱ्यांना अश्रू आणि रक्ताचे नमुने नियंत्रित आणि सुरक्षितपणे काढण्यासाठी त्यांचे उंट देण्यास प्रोत्साहित केले आहे. त्या बदल्यात त्यांना चांगले पैसे दिले जातात. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि इतर खासगी औषध उत्पादकांसह औषध कंपन्या आता उंटांपासून मिळवलेल्या अँटीबॉडीजचा सक्रियपणे शोध घेत आहेत. एका अहवालानुसार प्रति उंटासाठी दरमहा पाच ते दहा हजार रुपये उंट पाळणाऱ्यांना दिले जात आहेत.
dharmesh.shinde@expressindia.com