मुलाच्या कुटुंबियांनी मागणी केलेल्या हुंड्याची पूर्तता न करता आल्यामुळे केरळमधील एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चार दिवसांपूर्वी घडली. या तरुणीच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांनी हुंड्यात १५० ग्रॅम सोनं, १५ एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कार मागितली होती. मात्र ही मागणी पूर्ण करू न शकल्यामुळे या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. याच पार्श्वभूमीवर भारतात हुंडाबंदी असूनही हुंड्याची मागणी का केली जाते? हुंड्यासंदर्भात देशात काय कायदा आहे? हे जाणून घेऊ या….
तिरुअनंतपुरुममध्ये काय घडलं?
केरळच्या तिरुअनंतरपुरम येथे कथित हुंडाबळीची नुकतीच एक घटना घडली. डॉक्टर असलेल्या शहाना नावाच्या मुलीने हुंड्यासाठी मागितलेली रक्कम देऊ न शकल्यामुळे आत्महत्या केली. ही तरुणी तिरुअनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सर्जरी या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होती. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबाच्या जबाबानंतर नवऱ्या मुलाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
शहाना यांच्या कुटुंबियांचे नेमके आरोप काय?
डॉ. शहाना यांच्या कुटुंबियांनी नवऱ्या मुलावर हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. डॉ. रवैस असे नवऱ्या मुलाचे नाव आहे. रुवैसच्या कुटुंबियांनी हुंड्यात १५० ग्रॅम सोनं, १५ एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कार मागितली होती. आम्ही या मागण्या पूर्ण करू शकत नाही, असे आम्ही त्यांना सांगितले होते. त्यानंतर डॉ. रुवैसने आणि त्याच्या कुटुंबाने लग्न मोडलं. ज्यानंतर डॉ. शहानाने टोकाचे पाऊल उचलले, असा डॉ. शहाना यांच्या कुटुबियांनी आरोप केला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. रुवैसने या तरुणीला म्हणजेच डॉ. शहानाला बराच त्रास दिला आणि हुंड्यासाठी तगादा लावला होता. त्याला कंटाळूनच तिने आत्महत्या केली. या मुलीची सुसाइड नोटही मिळाली आहे. त्यात सगळ्यांना फक्त पैसा प्रिय असतो असा उल्लेख आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून पत्नीचा छळ
याच वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात तेलंगणातील हैदराबाद येथे अशीच एक घटना घडली होती. या प्रकरणात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने कुटुंबियांसह २४ वर्षीय पत्नीचा हुंड्यामुळे छळ केला होता. शेवटी कंटाळून या महिलेने आत्महत्या केली होती. या सॉफ्टवेअर इंजिनिअरविरोधात नंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हैदराबादमध्ये जुलै महिन्यात अशीच आणखी एक घटना घडली होती. पती तसेच पतीच्या कुटुंबियांकडून हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे ३१ वर्षीय महिलेने आत्महत्या केली होती.
न्यायालयाने व्यक्त केली चिंता
दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात हुंड्यामुळे महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने एका प्रकरणात आयपीसीच्या कलम ४९८ अ आणि ३०४ ब (हुंड्यामुळे मृत्यू) अंतर्गत एका आरोपीला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. याच प्रकरणाचा निकाल देताना न्यायमूर्ती स्वर्णकांता यांनी हुंड्यांमुळे महिलांच्या मृत्यूंमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भात चिंता व्यक्त केली होती.
नवरा तसेच नवऱ्याच्या कुटुंबियांकडून हुंड्याचा तगादा लावला जातो. यामुळे महिलांना मानसिक तसेच भावनिक तणावाला सामोरे जावे लागते. यात महिलांचा सतत छळही केला जातो. याबाबत बोलताना “हुंड्यासाठी महिलेला सतत त्रास दिला जातो. आपल्या आई-वडिलांना हुंड्याचे पैसे माग असे या महिलेला सांगितले जाते. त्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जातो. एका महिलेसाठी हा फार मोठा आघात असतो. शेवटी महिलांना या छळवणुकीपेक्षा मृत्यू अधिक सोपा वाटतो,” असे न्यायालयाने म्हटले होते.
तीन महिलांची सामूहिक आत्महत्या
गेल्या वर्षाच्या मे महिन्यात हुंडाबळीची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. ही घटना राजस्थान राज्यातील होती. तीन बहिणींचे एकाच कुंटबात लग्न झाले होते. या तिन्ही बहिणींचा हुंड्यासाठी सतत छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या तिन्ही महिलांनी स्वत:ला संपवल्यामुळे नंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. देशभरातून हळहळ व्यक्त केली जात होती.
हुंड्याची व्याख्या काय?
गेल्या सहा दशकांपासून भारतात हुंडाबंदी आहे. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी ही पद्धत अजूनही चालूच आहे. या जुन्या अनिष्ट परंपरेमुळे मुलींना मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी हुंडा मागितला आणि दिला जात असल्यामुळे हे कायद्याचे अपयश असल्याचेही सिद्ध होते.
भारतात हुंडाबबंदी काययदा १९६१ साली लागू झाला होता. या कायद्यानुसार हुंडा देणे तसेच घेणे हा गुन्हा आहे. या कायद्यात हुंड्याची सविस्तर व्याख्या करण्यात आलेली आहे. “लग्नासाठी एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाकडून तसेच कुटुंबाशी संबंधित एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या कुटुंबाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला कोणतीही संपत्ती तसेच मौल्यवान वस्तू देण्यास तसेच ती स्वीकारण्यास सहमती दर्शवने” अशी या कायद्याने हुंड्याची व्याख्या केली आहे.
हुंडाबंदीचा कायदा काय सांगतो?
हुंडा घेण्यात तसेच देण्यात एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास या कायद्यात पाच वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवास भोगावा लागू शकतो. तसेच १५ हजार रुपये किंवा हुंड्यात मागितलेली रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल ती आर्थिक दंडाच्या स्वरुपात भरावी लागते. दुससरीकडे हुंड्यासाठी एखाद्या महिलेचा छळ केला जात असेल तर तो भारतीय दंड संहितेतील (IPC) कलम ४९८ अ नुसार गुन्हा ठरतो.
हुंडाबळींची संख्या तब्बल ६४५०
भारतात हुंड्यामुळे दरवर्षी अनेक मुली, महिला आपले जीवन संपवतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालानुसार गेल्या वर्षी भारतात हुंडा बंदी कायद्यांतर्गत तब्बल १३ हजार ४७९ प्रकरणे नोंदवली गेली. २०२२ सालात हुंडाबळींची संख्या तब्बल ६४५० होतीच.
एकूण १३ हजार ५३४ गुन्ह्यांची नोंद
२०२१ साली भारतात हुंडाबंदी कायद्याअंतर्गत एकूण १३ हजार ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० सालाच्या तुलनेत दाखल गुन्ह्यांचे हे प्रमाण २५ टक्क्यांनी अधिक आहे. २०२१ साली हुंड्यामुळे एकूण ६५८९ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण २०२० सालाच्या तुलनेत ३.८५ टक्क्यांनी कमी आहे.
…म्हणून अधिक हुंडा मागितला जातो
भारतातील हुंडापद्धतीबद्दल युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया येथील सिवान अँडरसन यांनी एक शोधनिबंध प्रकाशित केला. गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. त्यामुळे हुंड्यामध्ये दिल्या जाणाऱ्या पैशांतही वाढ झाली आहे, असे या शोधनिबंधात सांगण्यात आले होते. एप्रिलमध्ये प्रकाशित झालेल्या अशाच एका अभ्यासानुसार गेल्या काही वर्षांत मुलांसाठी नोकरी आणि शिक्षणाच्या संधींचा विस्तार झालेला आहे. ज्यामुळे लग्नावेळी हुंडादेखील अधिक मागितला जातो. हुंडापद्धतीला खतपाणी मिळते.
मुलगा जेवढा अधिक शिकलेला, तेवढाच जास्त हुंडा
बीबीसीच्या एका वृत्तानुसार युनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न कॅलिफोर्नियाचे जेफ्री विवर आणि व्हर्जिनिया विद्यापीठाचे गौरव चिपळूणकर यांनीदेखील भारतातील हुंडापद्धतीचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी १९३० ते १९९९ या कालावधीत झालेल्या एकूण ७३ हजार लग्नांचा अभ्यास केला. या अभ्यासातून हुंडा पद्धतीचा कसा विकास होत गेला, हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बीसीसीने दिल्यानुसार नवरा मुलगा जेवढा अधिक शिकलेला असेल, त्याच्याकडे जेवढी चांगली नोकरी असेल तेवढाच अधिक हुंडा मागितला जातो, असे निरीक्षण या अभ्यासातून काढण्यात आले.
मुलीच्या कुटुंबियांनी हुंडा देण्यास विरोध केल्यास…
जेफ्री विवर आणि गौरव चिपळूणकर यांनी केलेल्या अभ्यासानुसार “एखाद्या मुलीच्या कुटुंबियांनी हुंडा देण्यास विरोध केल्यास ‘कमी दर्जाचा’ नवरा मिळतो. नवऱ्या मुलाच्या कुटंबियांनी त्याच्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले असतील किंवा नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांना एखाद्या मुलीचे लग्न करावयाचे असेल, तर अशा स्थितीत मुलीकडून जास्तीत जास्त हुंडा मागितला जातो. जास्त हुंडा मागण्यास मुलाला प्रोत्साहित केले जाते.”
प्रत्येक तासाला ३० ते ४० कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे
दरम्यान, हुंड्याबाबत जेवढ्या तक्रारी पोलीस दरबारी नोंदवल्या जातात, त्यापेक्षा कितीतरी अधिक हुंडाबळीची प्रकरणे आहेत, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे. इंडियाज पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजच्या कार्यकर्त्या कविता श्रीवास्तव यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “साधारण एका तासात ३० ते ४० महिला या कौटुंबिक हिंसाचाराला तोंड देतात. ही फक्त समोर आलेली प्रकरणं आहेत. त्यामुळे हा आकडा यापेक्षा अधिक असू शकतो. महिलांचा मृत्यू होण्यामागे भारतात कौटुंबिक हिंसाचाराला असलेली व्यापक मान्यता हे एक कारण आहे,” असे श्रीवास्तव म्हणाल्या.
कलम ४९८ बाबत व्यक्त केली जाते चिंता
दरम्यान, आपयीसीच्या कलम ४९८ बाबत चिंताही व्यक्त केली जाते. हुंडाबळीचा हा दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्याअंतर्गत पूर्वतपास न करता, किंवा पुराव्याशिवाय आरोपीला पीडितेच्या साक्षीने अटक करता येते. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत चिंता व्यक्त केली होती.