Jain Ramayana भारतात सध्या उपलब्ध असलेल्या ३०० हून अधिक रामकथा या मूळ रामायणावर आधारित रचल्या गेल्या. प्रादेशिक तसेच भाषक फरकानुसार या रामकथा आपले वैविध्य दर्शवितात. याच प्रादेशिक व सांप्रदायिक रामायणांच्या यादीत महाराष्ट्री प्राकृत भाषेत असलेले रामायण विशेष उल्लेखनीय आहे. हे जैन रामायण इतर रामायणांपेक्षा तत्त्वज्ञानाच्या पातळीवर खूपच वेगळी रचना ठरते. आज रामनवमीच्या निमित्ताने त्याविषयी समजून घेणे सयुक्तिक ठरावे.

जैन धर्माचा इतिहास

भारतीय संस्कृती ही विविध तत्त्वज्ञानांच्या उत्पत्तीसाठी ओळखली जाते. आस्तिकांपासून ते नास्तिकांपर्यंत सर्वच प्रकारच्या तत्त्वज्ञानाला या संस्कृतीत स्वतंत्र अस्तित्व देण्यात आले आहे. याच तत्त्वज्ञानाच्या परंपरेतील एक प्राचीन तत्त्वज्ञान हे जैन पंथाच्या रूपाने भारतीय संस्कृती समृद्ध करत आहे. जैन संप्रदायाची उत्पत्ती ही काही अभ्यासक सिंधू संस्कृतीच्या काळात झाली असावी असे मानतात. याविषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे असली तरी जैन धर्माचा खरा इतिहास हा इसवी सनपूर्व सहाव्या शतकापासून सुरू झाल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. जैन पंथीयांचा प्रारंभिक काळ हा उत्तर भारतातील आहे. परंतु पहिला मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने जैन धर्माची दीक्षा घेऊन आयुष्याच्या शेवटच्या काळात पश्चिम भारतात (महाराष्ट्र आणि कर्नाटक) स्थलांतर केले होते. त्यामुळे मौर्य काळापासूनच पश्चिम भारतात जैन पंथीयांचा प्रभाव असल्याचा सबळ पुरावा मिळतो.

Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
Hindutva of Congress and BJP on the occasion of Ram Navami
रामनवमीचे औचित्य साधून हिंदुत्व काँग्रेसचे अन् भाजपचे…
168 th prakat din, Shri Swami Samarth Maharaj, Celebrated with Devotion, bhakts, akkalkot, marathi news,
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!

आणखी वाचा: विश्लेषण: अंकुशपुराण : अस्सल महाराष्ट्रीय रामायण आहे तरी काय?

जैन रामायण व महाराष्ट्र यांचा नक्की संबंध काय?

महाराष्ट्रात इसवी सनपूर्व काळापासून प्राकृत भाषेचा वापर केला जात होता. सातवाहनकालीन अनेक अभिलेखांमध्ये हीच भाषा प्रामुख्याने आढळून येते. म्हणूनच ही भाषा महाराष्ट्री प्राकृत म्हणून प्रसिद्ध आहे. जैन पंथीयांचे मानले जाणारे आद्य रामायण हे याच भाषेत उपलब्ध आहे. यावरून हे रामायण मूळचे महाराष्ट्राचे किंवा त्याच्या सभोवतालच्या परिसरातील असावे असे अभ्यासक मानतात. या रामकथेचा कर्ता विमलसुरी हा जैन मुनी आहे. त्याने लिहिलेले पौमचरीय रामायण हे जैन साहित्यातील १७ वेगवेगळ्या रामकथांपैकी आद्य काव्य आहे. पौमाचरीयु म्हणजे ‘पद्माची (रामाची) जीवनकथा’. विमलसुरी हा पहिल्या ‘हरिवंशचार्य’ या जैन महाभारताचा कर्तादेखील आहे. पौमाचरीय ही रामकथा विमलसुरी यांनी २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या नंतर ५३० वर्षांनी म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिली, असे तो स्वतः या कथेच्या सुरवातीस नमूद करतो. परंतु काही अभ्यासक भाषाशास्त्रानुसार या रामायणाचा काळ इसवी सन तिसरे शतक असल्याचे मानतात. या रामायणात गुप्तराजा कुमारगुप्त आणि महाक्षत्रप यांच्यातील संघर्षावर भाष्य करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण राजवंश वाकाटक यांच्या नंदिवर्धन या राजधानीचा उल्लेख आहे. एकूणच प्रादेशिक वर्णनावरून या रामायणाचे कर्तेपण महाराष्ट्राकडेच जाते.

आणखी वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

जैन रामायण असुर, राक्षस व वानर यांच्याविषयी नेमके काय सांगते?

या रामायणाची सुरुवात वाल्मीकी रामायणाप्रमाणे होत नाही तर कथेच्या सुरुवातीस विद्याधर, असुर व वानर यांच्या प्रदेशाचे वर्णन करण्यात आले आहे. आजतागायत भारतीय जनमनात असुर, राक्षस म्हटल्यावर जे चित्र उभे राहते त्या चित्राला हे रामायण छेद देते. यात विमलसुरी स्पष्ट नमूद करतात की राक्षस, असुर हे बीभत्स नाहीत. तो सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेला समाज आहे. रावण हा मेघवाहना या कुळातील असून जैनधर्मीयांचा आदरकर्ता आहे. त्याने अनेक जैन मंदिरे आपल्या हयातीत बांधली. मुळात या रामायणानुसार रावण हा सुंदर व सद्वर्तनी असून जैन मंदिरांचा रक्षणकर्ता होता. फक्त सीता ही त्याची कमकुवत बाजू होती व तीच त्याची चूक ठरली. वाल्मीकी रामायणाप्रमाणे येथील रावण प्रतीकात्मक दशमुखी आहे. रावणाला त्याच्या आईने दिलेल्या नऊ मौल्यवान खड्यांच्या हारामुळे खड्यांवर पडणाऱ्या त्याच्या प्रतिबिंबामुळे त्याचे स्वतःचे व इतर नऊ मुखे असल्याचा भास होत असे. म्हणूनच त्याला दशमुख नाव मिळाले, असे हे जैन रामायण सांगते.

रामायणातील वानर नक्की कोण?

या रामायणातील वानरसमूह हा कुठल्याही प्रकारच्या मर्कटकांचा समूह नाही. तर तो लढवय्या आदिवासी समाज आहे. त्यांच्या ध्वजावर त्यांनी त्यांचे प्रतीक म्हणून माकडाचे चित्र ते वानर या नावाने प्रसिद्ध होते, असा उल्लेख जैन रामायणात आहे.

आणखी वाचा: विश्लेषण : शूर्पणखा स्वतंत्र स्त्री ते राक्षसी… खरेच कोण होती ती?

स्त्री भूमिकांचा आदर करणारे जैन रामायण

विमलसुरी यांचे जैन रामायण हे स्त्रीवादी रामायण आहे. या रामायणात सीता अग्निपरीक्षा देत नाही तर ती जैन पंथाची दीक्षा घेऊन साध्वी होते. किंबहुना येथे कैकेयी खलनायिका नाही. विमलसुरी हा कैकेयीला दोष देत नाही. तिच्या कृतीमागे एका आईची भूमिका असल्याचे स्पष्टीकरण ते देतात. भरत हा या मायायुक्त जगताचा त्याग करून जैन मुनी होण्याचा निर्णय घेतो. त्यावेळेस त्याला या भूमिकेपासून परावृत्त करण्यासाठी ती दशरथाला त्याला राजा करण्यासाठी गळ घालते. हे ज्या वेळेस रामाला कळते त्या वेळेस राम स्वतःहून वनवास स्वीकारतो. कारण त्याच्या उपस्थितीत भरत कधीही राज्यकारभार स्वीकारणार नाही, याची त्याला कल्पना असते.

अहिंसावादी जैन तत्त्वज्ञानाचे पालन करणारा राम

या रामायणात कुठेही राम हा सुवर्ण मृगाला मारत नाही. उलट रावण लक्ष्मणाचा खोटा आवाज काढून सीतेला फसवून तिचे अपहरण करतो. संपूर्ण कथेत राम व रावण यांनी जैन धर्माचा नेहमीच आदर केल्याचा संदर्भ वारंवार येतो. राम हा जैन धर्माची तत्त्वे पळणारा होता. म्हणूनच या तत्त्वांचा आदर ठेवण्यासाठी त्याने कुठल्याही सजीव प्राण्याला दुखापत केली नाही. म्हणूनच शेवटच्या युद्धात रावणाविरुद्ध रामाने शस्त्र उचलले नाही. तर लक्ष्मणाने रावणाला ठार केले. यानंतर लक्ष्मण व रावण या दोघांनाही नरक प्राप्त झाला. राम हा जैन धर्मात आदरणीय आहे. राम हा जैन धर्मात त्यांच्या ६३ शलाका पुरुषांपैकी (परम आदरणीय) एक आहे. राम हा जैन धर्मातील आठवा बलभद्र मानला जातो. रावण व लक्ष्मण यांच्यातील युद्धानंतर राम हा जैन मुनी होतो. व शेवटी या रामायणाच्या निर्वाणकांडात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील तुंगी गिरी येथे राम निर्वाण (मोक्ष) प्राप्त करतो. आजही महाराष्ट्रातील तुंगी हे ठिकाण जैन धर्मीयांचे  तीर्थस्थान आहे.