तंबाखूचे व्यसन आणि त्यामुळे दर वर्षी जाणारे बळी याबाबत सातत्याने चर्चा होत असते. आता जगभरात धूम्रपानात घट होत असल्याची सकारात्मक बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे. जगभरात सन २००० मध्ये १.३८ अब्ज व्यक्ती तंबाखूचे व्यसन करीत होते. ही संख्या २०२४ मध्ये १.२ अब्जांवर आली. याचबरोबर जगात २०१० पासून तंबाखूचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत १२ कोटी म्हणजेच २७ टक्क्यांची घट झाली आहे. असे असले, तरी जगातील पाचपैकी एका व्यक्तीला तंबाखूचे व्यसन असून, त्यामुळे दर वर्षी होणारे कोट्यवधी मृत्यू टाळता येत नसल्याचेही वास्तव आहे.
परिस्थिती काय?
जगाचा विचार करता तंबाखूमुळे होणारे मृत्यू आग्नेय आशियात सर्वाधिक आहेत. या भागात तंबाखूचे व्यसन २००० मध्ये ७० टक्के पुरुषांमध्ये होते. ते २०२४ मध्ये कमी होऊन ३७ टक्क्यांवर आले. जगातील तंबाखूच्या व्यसनात झालेल्या घटीपैकी निम्मी या भागात झाली आहे. आफ्रिकेत तंबाखूचे व्यसन जगात सर्वांत कमी असून, हे प्रमाण २०२४ मध्ये ९.५ टक्के होते. मात्र, या भागातील लोकसंख्येतील वाढीमुळे तंबाखूचे व्यसन असलेल्या व्यक्तींची संख्या वाढलेली दिसून आली. दक्षिण आणि उत्तर अमेरिकेत तंबाखूचे व्यसन ३६ टक्क्यांनी कमी झाले असून, त्याचे प्रमाण १४ टक्क्यांवर आले. युरोपमध्ये २४ टक्के प्रौढांमध्ये तंबाखूचे व्यसन असून, महिलांमध्ये हे प्रमाण अधिक असून, ते २४.१ टक्के दिसून आले. आखाती देशांमध्ये १८ टक्के लोकसंख्येला तंबाखूचे व्यसन असून, त्यात वाढ होताना दिसून येत आहे. पश्चिमी प्रशांत भागातही तंबाखूचे व्यसन वाढत असून, त्याचे प्रमाण २५.८ टक्के आहे.
महिलांची आघाडी?
जगभरात तंबाखूचे व्यसन करणाऱ्या सर्वच वयोगटांतील महिला आणि पुरुषांचे प्रमाण २००० ते २०२४ या कालावधीत कमी झाले आहे. यात महिलांनी आघाडी घेतली आहे. तंबाखूच्या व्यसनात ३० टक्के घट करण्याचे उद्दिष्ट महिलांनी पाच वर्षे आधी म्हणजे २०२० मध्ये गाठले. महिलांमधील तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण २०१० मध्ये ११ टक्के होते. ते २०२४ मध्ये कमी होऊन केवळ सहा टक्क्यांवर आले. याउलट पुरुषांमधील तंबाखूच्या व्यसनात ३० टक्के घट होण्यासाठी २०३१ ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तंबाखूचे व्यसन असलेल्या जगातील पाचपैकी चार व्यक्ती पुरुष आहेत. अजूनही जवळपास १ अब्ज पुरुष तंबाखूचे व्यसन करीत आहेत. पुरुषांमधील तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण २०१० मध्ये ४१.४ टक्के होते. ते कमी होऊन २०२४ मध्ये ३२.५ टक्क्यांवर आले आहे. असे असले, तरी ते कमी होण्याचा वेग कमी आहे.
ई-सिगारेटचा धोका अधिक?
जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदाच जगातील ई-सिगारेटच्या वापराबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून समोर आलेले आकडे धक्कादायक आहेत. जगभरात १० कोटींहून अधिक लोक ई-सिगारेटचे व्यसन करतात. त्यातील सुमारे ८.६ कोटी नागरिक हे श्रीमंत देशांतील आहेत. जगभरात १३ ते १५ वयोगटातील सुमारे १.५ कोटी मुले ई-सिगारेटचा वापर करतात. ई-सिगारेटची विदा संकलित होणाऱ्या देशांमध्ये प्रौढांपेक्षा मुले ही सरासरी नऊपट अधिक ई-सिगारेट ओढतात.
नवीन उत्पादनांवर भर का?
तंबाखू उद्योगाकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उत्पादने सादर केली जात आहेत. तंबाखूचे व्यसन वाढवून या बाजारपेठेचा विस्तार करणे, हा यामागील हेतू आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकारही तंबाखू उद्योगाकडून केला जात आहे. त्यामुळे केवळ नवीन प्रकारच्या सिगारेटच नव्हे, तर ई-सिगारेट, निकोटिन पाऊच, हिटेड टोबॅको प्रॉडक्ट्स (एचटीपीएस) अशा प्रकारच्या नवीन उत्पादनांचा समावेश आहे. तरुण पिढीसह पौगंडावस्थेतील मुलांना भुरळ पाडण्यात ही उत्पादने यशस्वी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातूनच या उत्पादनांचा वापर वाढत आहे.
उपाययोजना काय?
जगातील सर्वच देशांनी तंबाखू नियंत्रणासाठी पावले उचलण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. तंबाखू उद्योगाच्या नियंत्रणासाठी कठोर नियमावली आवश्यक असल्याचे संघटनेने अधोरेखित केले आहे. त्याच वेळी तंबाखू उद्योग सरकारी धोरणांतील पळवाटा शोधून नवीन तंबाखू उत्पादने बाजारात आणून लहान मुलांना लक्ष्य करीत आहेत. हे थांबविण्यासाठी ई-सिगारेटसारख्या नवीन निकोटिन उत्पादनांवर नियंत्रण आणावे. त्यावरील करात वाढ करण्यासोबत त्यांच्या जाहिरातीस बंदी अशा उपाययोजना कराव्यात, असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे.
sanjay.jadhav@expressindia.com
