scorecardresearch

Premium

विश्लेषण : झोमॅटो, पेटीएमच्या समभागांत का होतेय सातत्याने घसरण?

तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांचे समभाग हे कंपनीने गुंतवणूकदारांना दिलेल्या समभाग इश्यू प्राइसपेक्षा देखील खाली आले आहेत

विश्लेषण : झोमॅटो, पेटीएमच्या समभागांत का होतेय सातत्याने घसरण?

नवीन वर्षात सुरू असलेली भांडवली बाजारातील पडझड ही बाजारात नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांसाठी खूपच मारक ठरली. पेटीएम, पॉलिसीबझार, नायका, झोमॅटो, कारट्रेड टेक या कंपन्यांचे समभाग दणदणीत आपटले. गेल्या काही महिन्यांत अतिभव्य प्रारंभिक भागविक्री आणि त्याला गुंतवणूकदारांकडून दणकेबाज प्रतिसाद मिळवीत अनेक नवीन पिढीच्या कंपन्यांचे समभाग बाजारात सूचिबद्ध झाले. परंतु ताज्या पडझडीत या कंपन्यांच्या समभागांना आता वाली उरला नाही, अशी मोठी घसरण त्यात सुरू आहे. त्यातील काही कंपन्यांचे समभाग हे कंपनीने गुंतवणूकदारांना प्रारंभिक समभाग विक्रीच्या वेळी दिलेल्या किमतीपेक्षा म्हणजेच इश्यू प्राइसपेक्षा देखील खाली आले आहेत.

नवीन वर्षात उणे परतावा

RBI, home loan, Shaktikanta Das, repo rate
सलग चौथ्यांदा व्याजदर अपरिवर्तित, रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षेनुरूप ‘जैसे थे’ भूमिका
Anil-deshmukh
कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या, अनिल देशमुख म्हणाले ‘जातनिहाय सर्वेक्षण…’
pharma companies doing well
Money Mantra: महिन्याच्या अखेरीस निफ्टी 19600च्या वर बंद; फार्मा कंपन्या तेजीत !
9th edition, World of Concrete India (WIKI), october, mumbai, concrete industry,
बांधकाम उद्योगाला आकार देण्यात ‘एआय’च्या भूमिकेवर श्वेतपत्रिका, ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या ‘काँक्रीट शो’मध्ये अनावरण

गत वर्षात भांडवली बाजाराने ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंतची सर्वोच्च उच्चांकी पातळी गाठल्यानंतर डिसेंबर २०२१ पासून भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू आहेत. परिणामी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत उणे ४.५२ टक्के परतावा दिला आहे. तर बीएसई आयपीओ निर्देशांक ज्यामध्ये नुकत्याच सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांचा सहभाग आहे, त्याने तीन महिन्यांच्या कालावधीत तर उणे २०.०२ टक्के परतावा दिला आहे.

घसरण का?

गेल्या वर्षी (२०२१) भांडवली बाजारातील तेजीचा भांडवली बाजारात नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांना फायदा झाला. परिणामी सरलेल्या वर्षात सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना बहुप्रसवा (मल्टीबॅगर) परतावा दिला. मात्र आता जागतिक पातळीवर विशेषतः अमेरिकी बाजारात फेसबुकसह इतर तंत्रज्ञानाधारित कंपन्यांच्या समभागांत मोठी घसरण झाली आहे. त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले आहेत. परिणामी पेटीएम, पॉलिसीबझार, नायका, झोमॅटो, कारट्रेड टेक या कंपन्यांचे समभागात घसरण वाढली आहे. याचबरोबर युक्रेन आणि रशियामधील भू-राजकीय तणाव, अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून देण्यात आलेले व्याजदर वाढीचे संकेत यामुळे परदेशी गुंतवणूकदारांकडून देशांतर्गत भांडवली बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधीचे निर्गमन सुरू झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला असून नफावसुलीला प्राधान्य दिले आहे आणि जगभरातील भांडवली बाजारांमध्ये चलनवाढीच्या वाढत्या दबावामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

झोमॅटो, पेटीएमच्या समभागात घसरण का?

नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांमध्ये झोमॅटो, नायका या कंपन्यांनी भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यांनतर बहुप्रसवा (मल्टीबॅगर) परतावा दिला होता. तर पेटीएम, कारट्रेड टेक सारख्या कंपन्यांचे समभाग इश्यू प्राईसपेक्षा खूप खाली व्यवहार करत आहेत. पदार्पणाच्या दिवशीच पेटीएमच्या समभागाने गुंतवणूकदारांना निराश केले होते.

झोमॅटो

झोमॅटोच्या समभागात गेल्या पाच सत्रांमध्ये १८ टक्क्यांची पडझड झाली. तर गेल्या महिन्याभरात ४१ टक्क्यांची घसरण झाली आहे. मंगळवारच्या सत्रात (१५ फेब्रुवारी) समभागाने ७५.७५ रुपयांचा नीचांक गाठला होता. कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून दिलेल्या ७६ रुपये प्रतिसमभाग या किमतीपेक्षाही (इश्यू प्राईसपेक्षा) तो खाली पोहोचला.

झोमॅटोने सरलेल्या तिमाहीत ६३ कोटींचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. तर गेल्या वर्षी याच काळात कंपनीला ३५२.६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मात्र तिमाही-दर-तिमाहीत आधारावर कंपनीच्या तोट्यात घसरण होत आहे ही कंपनीची जमेची बाजू आहे. झोमॅटो घरोघरी खाद्यपदार्थांचा बटवडा करणारे सर्वांत मोठे नवउद्यमी माध्यम आहे. मात्र कंपनीचा व्यवसायात लाभ कमी असल्याने लक्षात येईल. हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ अगदी थोडे पैसे अधिक आकारून घरपोच करण्याचे काम झोमॅटोकडून पार पडले जाते. मात्र या अल्प फायद्यातून कंपनीला डिलिव्हरी बॉयचा पगार, त्यांच्या पेट्रोलचा खर्च करावा लागतो. त्यामुळे नफ्याचे प्रमाण अत्यल्प राहते. सध्या शहरांपुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय भविष्यात तोट्यात चालवणे किती शक्य होईल हा प्रश्न नक्कीच उपस्थित होऊ शकतो.

पेटीएम

इतिहासातील सर्वांत मोठ्या समभाग विक्रीच्या यशानंतर, भांडवली बाजारातील ‘पेटीएम’च्या समभागांचे पदार्पण गुंतवणूकदारांसाठी स्वप्नभंग ठरले. मोठ्या फायद्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्यांना सूचिबद्धतेच्या दिवशी कंपनीचा समभाग २७ टक्क्यांनी गडगडल्याचे पाहावे लागले. प्रारंभिक भागविक्रीतून प्रति समभाग २,१५० रुपये किमतीला हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला होता. मात्र मोठ्या फायद्यासह सूचिबद्धता होण्याऐवजी समभागाने ९.३ टक्के घसरणीसह सुरुवात करीत निराशा केली होती. गेल्या सत्रात समभागाने ८४० रुपयांचा तळ गाठला. ही समभागाची आतापर्यंतची नीचांकी पातळी आहे.

सुमारे तीन हजार कोटींचा व्यावसायिक तोटा नोंदविणाऱ्या कंपनीच्या समभागांची इतक्या चढ्या मूल्यांकनाने विक्री कशी होऊ शकते याबाबत बाजार विश्लेषकांमध्ये चर्चा होती. मुळात कंपनीचा समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध झाला त्यावेळी कंपनीला ३,००० कोटींचा तोटा होता. शिवाय सरलेल्या डिसेंबर तिमाहीत कंपनीला ७७८ कोटींचा तोटा झाला होता. तर त्या आधीच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीने ४८२ कोटींचा तोटा नोंदला होता. मात्र समाधानाची बाब म्हणजे डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलात ८९ टक्क्यांची होत तो १,४५६ कोटींवर पोहोचला. याचबरोबर पेटीएमला पेमेंट व्यवसायातून सुमारे ७० टक्के महसूल मिळतो. मात्र केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल पेमेंट व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल झाल्यास पेटीएमच्या व्यवसायाला धक्का बसण्याची शक्यता आहे. पेटीएम विमा क्षेत्रातदेखील प्रवेश करू इच्छित आहे. त्याबाबत अजूनही विमा नियामक इर्डाकडून परवानगी देण्यात आलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta vishelshan why zomato paytm shares are falling constantly asj 82 print exp 0222

First published on: 17-02-2022 at 20:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×