संवर्धनवादी संतुष्ट का नाहीत?

गुजरातमध्ये आशियाई सिंहांची संख्या वाढल्याचे नुकत्याच झालेल्या गणनेतून स्पष्ट झाले, मात्र या सिंहगणनेत कालबाह्य आणि सदोष पद्धतींचा वापर करण्यात आला. त्यामुळे गणनेतून निघालेल्या निष्कर्षांविषयी सावध भूमिका घेतली जावी, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सिंहगणना ११ जिल्ह्यांत मिळून ३५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात करण्यात आली. गणना करणाऱ्या पथकांनी या भागांवर २४ तास लक्ष ठेवले. या संपूर्ण मोहिमेत पडताळणी आणि पुन:पडताळणी केली गेली. यामुळे सिंहांची गणना अत्यंत अचूकतेने पूर्ण करणे शक्य झाल्याचा दावा केला जातो, मात्र काही संवर्धक या दाव्याशी सहमत नाहीत. त्यांच्या मते भारतात सिंहगणनेसाठी जुनी आणि सदोष पद्धत वापरली गेली. आता प्रामुख्याने थेट छायाचित्रण आणि इतर क्षेत्रीय पद्धतींनी गणना केली जाते. अधिक प्रगत आणि वैज्ञानिकदृष्ट्या अधिक मजबूत तंत्र का वापरले जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

एकाच भागात सिंह असण्याचे धोके कोणते?

भारतातील जवळपास सर्वच आशियाई सिंह गुजरातमध्ये असल्याने, तिथे एखाद्या आजाराची साथ आल्यास सर्वांनाच प्रादुर्भाव होऊन त्यांचा नाश होऊ शकतो, असे जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एखाद्या प्रजातीचे सर्व प्राणी एकाच भागात केंद्रित झाले असल्यास ती प्रजात नामशेष होण्याचा मोठा धोका असतो. याव्यतिरिक्त परिसरात मानवी वस्ती असल्यास माणसांकडून होणारा छळ, हवामान बदल आणि अधिवास नष्ट होणे यासारखे इतर धोकेही संभवतात. यावर्षी जुलैच्या अखेरीस अमरेलीमध्ये सिंहाच्या तीन पिल्लांचा मृत्यू झाला. २०१८ साली संसर्गजन्य विषाणूमुळे होणाऱ्या ‘कॅनाइन डिस्टेंपर’ आणि ‘प्रोटोझोअल’ संसर्गासह अनेक आरोग्यविषयक समस्यांमुळे गुजरातमध्ये एका महिन्यात ३० हून अधिक सिंहांचा मृत्यू झाला. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ दरम्यान १४३ बछड्यांसह २८६ सिंहांचा मृत्यू झाला.

जीवशास्त्रज्ञांच्या शिफारशी कोणत्या?

काही आशियाई सिंहांना गिरपासून दूर अन्य एखाद्या ठिकाणी स्थलांतरित करावे. तसे केल्यास तिथेही सिंहांची संख्या वाढेल, अशी शिफारस काही जीवशास्त्रज्ञांनी केली होती, मात्र गुजरात सरकारने त्यास विरोध केला. सर्वोच्च न्यायालयानेदेखील सिंह इतरत्र स्थलांतरित करण्यासंदर्भात आदेश दिले होते. एप्रिल २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही सिंहांना सहा महिन्यांत गिरहून कुनो येथे स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. मात्र, गुजरातने आद्याप इतर कोणत्याही राज्यात आशियाई सिंह पाठविण्यास होकार दर्शवलेला नाही. या आदेशाला १२ वर्षे लोटली, पण संबंधित सर्वांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय निवडला. गिरपासून १०० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या बर्दा येथे सिंहांसाठी दुसरा अधिवास विकसित केला जात आहे. मात्र, तो सिंहांच्या वास्तव्यासाठी योग्य नसल्याची टीका जीवशास्त्रज्ञांनी केली आहे. त्याचे क्षेत्रफळ २०० चौरस किलोमीटरपेक्षाही कमी आहे.

सिंह तणावाखाली आहेत का?

या वर्षी २१ मे रोजी आशियाई सिंहांच्या ताज्या गणनेचे निकाल जाहीर करण्यात आले. पाच वर्षांत त्यांची संख्या ६७४ वरून ८९१ झाली आहे. सिंहगणनेच्या कागदपत्रांत असा दावा करण्यात आला आहे की, सिंहांची संख्या २०२० च्या तुलनेत सुमारे १६ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, अभ्यासकांच्या मते त्यांनी गिरपासून सर्वांत दूर असलेल्या सिंहांच्या अधिवासांना जोडून या क्षेत्राची गणना केली. गणनेनुसार सिंहांच्या एकूण संख्येपैकी ४४ टक्के सिंह जंगल नसलेल्या भागांत (पडीक जमीन, शेतीची जमीन, नदीकाठचे क्षेत्र, मानवी वस्ती) आढळले. आशियाई सिंहांची संख्या ज्या भागांत वाढली आहे, तिथे बहुतेक शहरी भाग आहे. परिणामी हे परिसर सिंहांना राहण्यासाठी फारसे योग्य नाहीत, असे जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अशा ठिकाणी सिंह राहिल्यास अनेक आव्हाने निर्माण होतात. जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण होते. या भागांतील सिंह तणावाखाली आहेत. ते वारंवार आक्रमक होतात आणि लोकांवर हल्ला करतात. सिंहांनी एका माणसावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना अलीकडेच घडली. लोक सिंहांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि अनेकदा सिंहांना त्रास देतात. अशा स्थितीत सिंह माणसांवर हल्ला करण्यास उद्याुक्त होतात, असे जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.