-कुलदीप घायवट
सागरी किनारा मार्ग प्रकल्पामुळे बाधित होण्याची शक्यता असलेल्या वरळी आणि हाजीअली समुद्रकिनाऱ्याजवळील प्रवाळांचे दोन वर्षांपूर्वी कुलाब्यातील नेव्ही नगर परिसरात स्थलांतर करण्यात आले होते. त्यानंतरही हाजीअली समुद्र किनारी परिसरात प्रवाळांचे अस्तित्व कायम आहे. प्रदूषण, हवामान बदल, वाढते तापमान यातही समुद्री जिवांचे, प्रवाळांचे अस्तित्व कायम राहिल्याचे दिसून येते.
प्रवाळ म्हणजे काय?
प्रवाळ हे अपृष्ठवंशीय असून समुद्राच्या तळाशी, खडकाळ भागांत असतात. सामान्यतः कठीण प्रवाळ आणि मृदू प्रवाळ असे त्याचे दोन प्रकार असतात. काही ठिकाणी एकाच प्रवाळांच्या अनेक जाती एकत्र असतात तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे रुजतात. प्रवाळ खडकाळ समुद्र आणि किनारपट्टीदरम्यान लाटांचा प्रभाव रोखतात आणि किनारपट्टीला धूप होण्यापासून वाचवतात. अनेक प्रजातींचे मासे, कासव, कोलंबी, ऑक्टोपस, खेकडे या जिवांचे प्रवाळ आश्रयस्थान आहे. समुद्री जिवांना अन्न पुरवण्याचे कामही प्रवाळ करतात. त्यामुळे ती मत्स्य उत्पादनाचा कणाही आहेत. प्रवाळांना १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात आले आहे.
मुंबईत कुठे आणि कोणते प्रवाळ आहेत?
मुंबईच्या सागरी भागात सुमारे पाचशेहून अधिक सागरी जिवांच्या प्रजाती आहेत. मुंबईच्या समुद्र किनारी भागात प्रवाळांचे साधारण ११ प्रकार आढळत असल्याची नोंद आहे. मुंबईतील वांद्रे, कफ परेड, हाजी अली, जुहू, मलबार हिल, मरिन ड्राईव्ह, वरळी या समुद्र किनारी भागात प्रवाळ आढळते. मुंबईतील आंतरभरतीच्या भागात फ्लॉवरपाॅट कोरल, फाॅल्स पिलो कोरल, साॅफ्ट कोरल, स्टोनी कोरल, कॅरिओफिलीड, राहिझॅगिलीड, कुलिका, प्लेक्सारिड, टुबास्ट्रोड, वेरेटिलीड, स्कुटेलियम या प्रकारातील प्रवाळ आढळतात.
मुंबईतील प्रवाळांच्या अस्तित्वाविषयी प्रश्न का उपस्थित झाला?
सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी राष्ट्रीय विज्ञान संस्थेने (एनआयओ) अभ्यास प्रवाळांचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर प्रवाळ स्थलांतरित करण्यात आले. मात्र, या गडबडीत प्रवाळांचे अस्तित्व टिकून राहण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आता दिसणारे प्रवाळ हे फक्त कागदोपत्रीच जिवंत राहण्याची शक्यता आहे असा दावा काही पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे.
स्थलांतरित प्रवाळांची स्थिती काय?
हाजीअली, वरळी, कुलाबा येथून नेव्ही नगर येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या प्रवाळांच्या ३२९ जिवंत वसाहतींपैकी ३०३ वसाहती (एकूण ९२%) सुदृढ आहेत. एका वर्षानंतरही हे प्रवाळ निरोगी असल्याचा अहवाल एनओने प्रकाशित केला होता, अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र तिवारी यांनी दिली.
प्रवाळ परिसंस्था ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहेत का?
प्रवाळ हे नैसर्गिक तटरक्षकाचे काम करतात. वातावरणातील बदल, प्रदूषण, पाण्यातील गाळ, अतिमासेमारी व बेजबाबदार सागरी पर्यटनामुळे प्रवाळ खडकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. हजारो मैलांवरील मानवी क्रियाकलापांचा प्रवाळांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाळ हे ऐतिहासिकदृष्ट्या मर्यादित स्वरूपात विखुरले आहेत. सामान्यत: ते उष्ण कटिबंधात, जेथे समुद्राचे तापमान १८ ते २४ डिग्री सेल्सिअस आहे अशा ठिकाणी आढळतात. मात्र तज्ज्ञांच्या मते गेल्या १० वर्षांत अल निनोच्या प्रभावामुळे समुद्राचे तापमान २९.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले. तज्ज्ञांच्या मते २९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामध्ये कोरलचे ब्लिचिंग होते म्हणजे प्रवाळ पांढरे पडते व तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास प्रवाळ परिसंस्थेचा ऱ्हास होतो.
प्रवाळ वाचवण्यासाठी कोणते उपाय?
राज्याच्या किनारपट्टीवरील ३५ हेक्टर क्षेत्रावर प्रवाळ भित्तिकांच्या पुनर्स्थापन संभाव्यतेसाठी कांदळवन कक्षामार्फत करार करण्यात आला आहे. राज्याच्या किनारपट्टीवरील प्रवाळ खडकांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेची (एनआयओ) नियुक्ती केली आहे. धोका असलेले प्रवाळ क्षेत्र ओळखणे आणि त्याच्या नोंदी करणे, प्रवाळ परिसंस्थेवर ताण आणणाऱ्या कारणांचा शोध घेणे, परिसंस्थेवरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून एका वर्षासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या माध्यमातून राज्याच्या किनाऱ्यावरील भरती ओहोटीच्या प्रदेशात प्रवाळ पुनर्स्थापनेसाठी योग्य ठिकाणांचा तसेच संभाव्य अस्तित्वात असलेल्या उच्च दर्जाच्या प्रवाळ क्षेत्रांचा शोध घेण्यात येणार आहे.