‘सारे जहॉं से अच्छा, हिंदोस्तां हमारा’ हे सुप्रसिद्ध गीत लिहिणारे मोहम्मद इक्बाल यांचे कार्य दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते पाकिस्तानचे जनक असल्यामुळे त्यांची माहिती अभ्यासक्रमात देण्यात येणार नाही, असे दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाने ठरवले आहे. काहींनी या निर्णयाला सहमती दर्शवली तर काहींनी विरोध केला. या पार्श्वभूमीवर मोहम्मद इक्बाल कोण होते आणि त्यांना ‘पाकिस्तानचे जनक’ का म्हटले जाते, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
कोण आहेत मोहम्मद इक्बाल ?
मोहम्मद इक्बाल यांचा जन्म ९ नोव्हेंबर, १९७७ मध्ये पंजाबमधील सियालकोट येथे झाला. ते लेखक, कवी, शायर, तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा त्यांची लेखणी भारताला अधिक परिचित आहे. ‘असरार-ए-ख़ुदी’, ‘रुमुज़-ए-बेख़ुदी’, ‘बंग-ए-दारा’, ‘तराना-ए-हिन्द’ (सारे जहाँ से अच्छा) या त्यांच्या काही प्रमुख रचना आहेत. त्यांचे ‘हिंदी हैं हम वतन’ ही सर्वांना एकतेचा संदेश देणारे गीत होते. तसेच पाकिस्तानकरिता त्यांनी ‘तराना-ए-मिली’ ही गीतरचना केली. त्यांच्या काही रचना इराण आणि अफगाणिस्तानमध्येही प्रसिद्ध आहेत. त्यातील प्रमुख रचना म्हणजे इक़बाल-ए-लाहौर. मोहम्मद इक्बाल यांनी इस्लाम धर्माचा धार्मिक आणि तत्त्वज्ञानाच्या अंगाने अभ्यास केला.
महाविद्यालयीन काळापासून मोहम्मद इक्बाल यांना राजकीय चळवळींचे आकर्षण होते. १९२७ मध्ये ते पंजाब विधान परिषदेवर निवडून आले होते. तसेच त्यांनी ऑल इंडिया मुस्लीम लीगमध्ये अनेक पदे भूषवली. १९४७ मध्ये त्यांना पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ‘पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी’ हा सन्मान बहाल करण्यात आला. ‘हकीम-उल-उम्मत’ (‘उम्माचे विचारवंत) आणि ‘मुफक्कीर-ए-पाकिस्तान’ (पाकिस्तानचे विचारवंत) म्हणूनही ओळखले जाते. २०१८ पर्यंत त्यांच्या जन्मदिनी पाकिस्तानमध्ये सार्वजनिक सुट्टी होती.
हेही वाचा :विश्लेषण : भारतातील चलनबंदीची गाथा…
मोहम्मद इक्बाल यांना ‘पाकिस्तानचे जनक’ का म्हणतात ?
१९२० च्या काळात मुस्लीम लीगमध्येही दुफळी निर्माण झाली होती. भारतातील मुस्लिमांना राजकीय स्थान प्राप्त करून देणे आवश्यक आहे, असे इक्बाल यांना वाटत होते. २९ डिसेंबर, १९३० मध्ये इलाहाबाद येथे इंडियन मुस्लीम लीगच्या वार्षिक अधिवेशनात इक्बाल यांनी प्रथम भारताचे विभाजन, मुस्लिमांचे संघटन आणि पर्यायाने स्वतंत्र देशाची निर्मिती या अनुषंगाने विचार मांडले. परंतु, काँग्रेस,
दिल्ली विद्यापीठाने मोहम्मद इक्बाल यांना अभ्यासक्रमातून का वगळले ?
दिल्ली विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमातून मोहम्मद इक्बाल यांना वगळले आहे. दिल्लीच्या शैक्षणिक परिषदेने शुक्रवार, दि. २६ मे रोजी अभ्यासक्रमातील बदलांसंदर्भात बैठक आयोजित केली होती. त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे बीए राज्यशास्त्र विषयाच्या सहाव्या सेमिस्टरला ‘मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट्स’ या पाठाअंतर्गत इक्बाल यांच्या कार्याचा समावेश होता. परंतु, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या प्रा. योगेश सिंह यांनी मोहम्मद इक्बाल यांना अभ्यासातून वगळण्याचा प्रस्ताव मांडला. या संदर्भात ते म्हणाले की, भारताचे विभाजन करण्याचा पाया इक्बाल यांनी रचला. त्यांना ‘पाकिस्तानचे जनक’ असेही म्हटले जाते. त्यांनी ‘मुस्लीम लीग’ला समर्थन दिले. त्यामुळे अशा व्यक्तींचे कार्य अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे.” तसेच डीयूचे रजिस्ट्रार विकास गुप्ता यांनी या मताला सहमती दर्शवली. कुलगुरूंचा हा प्रस्ताव सभागृहाने एकमताने मंजूर केला. ९ जून रोजी हा प्रस्ताव अंतिम करण्यात येईल. तसेच कुलगुरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक पोहचले पाहिजे. आदिवासी अभ्यासकेंद्रे सुरू केली पाहिजे, असेही प्रस्तावित केले.
हेही वाचा : विश्लेषण : ‘अमूल’ आणि ‘आवीन’ वाद काय आहे ? त्याला राजकीय रंग का दिला गेला ?
एखाद्या व्यक्तीला अथवा घटनेला अभ्यासक्रमातून वगळून इतिहास बदलतो का ?
शिक्षण हे मनुष्याला घडवणारे क्षेत्र आहे. आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून तौलनिक दृष्टिकोन शिक्षणामुळे मिळतो. एखादी घटना किंवा व्यक्ती चांगली की वाईट हे ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही बाजू आणि पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीचा, इतिहास अभ्यासक्रमातून काढणे, हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चुकीचे ठरणार आहे. अशामुळे विद्यार्थ्यांना केवळ इतिहासाची एकच बाजू माहीत होण्याची शक्यता आहे. विवेकनिष्ठ विचार करताना दोन्ही बाजूंचे विचार माहीत असणे आवश्यक आहे, तरच विद्यार्थी सदसद्विवेक बुद्धीचा वापर करून चांगल्या वाईट घटना ठरवू शकतो. अंतिमतः कोणत्याही व्यक्तीला पाठयक्रमातून काढून किंवा काही धार्मिक, सामाजिक स्तिथ्यंतरे अभ्यासक्रमातून वगळून मूळ इतिहास बदलला जात नाही. त्यामुळे योग्य आणि पूर्ण ज्ञान असलेला विद्यार्थी घडवण्यासाठी सत्य आणि पूर्ण इतिहास देणे आवश्यक आहे.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet muhammad iqbal who wrote saare jahan se achha dropped from du political science syllabus vvk