भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात वेगवेगळे दावे केले जातात. या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्यांना न्यायालयाने शिक्षादेखील ठोठावलेली आहे. मात्र राजीव गांधी यांच्या जाण्याने देशाची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याचे सर्वमान्य आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर सोनिया गांधी (राजीव गांधी यांच्या पत्नी ) राजीव गांधी यांच्या सुरक्षेबाबत कायम दक्ष, सतर्क आणि चिंतेत असायच्या. मात्र दुर्दैवाने २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची श्रीपेरंबुदूर येथे हत्या झाली होती. हत्येच्या दोन दिवस अगोदर गांधी कुटुंबात काय घडत होते? राजीव गांधी यांच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेऊ या…

१६ महिन्यांत देशाला दोन पंतप्रधान

१९८९ ते १९९१ या कालावधीत अवघ्या २१ महिन्यांत देशाने दोन पंतप्रधान पाहिले होते. १९८९ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या १६ महिन्यांनी व्ही. पी. सिंह यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी भाजपा, डाव्यांच्या पाठिंब्याने सरकारची स्थापना केली होती. त्यानंतर चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या सरकारला काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता. मात्र राजीव गांधी यांच्यावर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि चंद्रशेखर यांच्यात मतभेद झाले, परिणामी चंद्रशेखर यांचेही सरकार कोसळळे. त्यानंतर १९९१ साली लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या.

love jihad, Bhayander, Woman arrested,
लव्ह जिहादची धमकी देऊन मागितली ३० लाखांची खंडणी, भाईंदरमध्ये महिलेला अटक
Wayanad, Rahul Gandhi, Vinod Tawde,
वायनाडमधील पराभवाच्या भीतीने राहुल गांधींचा रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय – विनोद तावडे
INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार

१९९१ ची निवडणूक काँग्रेससाठी नामी संधी

काँग्रेसने १९८४ सालची लोकसभा निवडणूक प्रचंड बहुमतात जिंकली होती. मात्र १९८९ साली काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागले होते. १९९१ सालच्या मध्यावधी निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची नामी संधी होती. याच कारणामुळे राजीव गांधी धडाडीने निवडणुकीचा प्रचार करत होते. ते देशभरात विविध ‘राज्यांमध्ये’ जाऊन नागरिकांना भेटत असत. जाहीर सभांना संबोधित करत.

…आणि प्रचारासाठी राजीव गांधी बाहेर पडले

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक २०, २२ आणि २६ मे अशा तीन टप्प्यांत घेण्याची घोषणा केली होती. निवडणुकीची घोषणा होताच राजीव गांधी प्रचारासाठी घराबाहेर पडले. १ मेपासून राजीव गांधी पुढच्या वीस दिवसांत ६०० ठिकाणी भेट देणार होते. १९ मे रोजी राजीव गांधी यांची भोपाळला एक सभा होणार होती. या सभेनंतर प्रचारासाठी ते दक्षिणेतील राज्यांत जाणार होते. राजीव गांधींचा दक्षिण दौरा प्रचार मोहिमेचा शेवटचा टप्पा होता. प्रचार संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीसाठी राजीव गांधी यांचे पुत्र राहुल गांधी २३ मे रोजी भारतात परतणार होते. त्यानंतर राजीव गांधी, सोनिया गांधी, कन्या प्रियांका गांधी आणि राहुल गांधी दिल्लीत पुन्हा एकदा एकत्र भेटणार होते.

सोनिया गांधी झाल्या होत्या अस्वस्थ

लोकसभेच्या १९९१ सालच्या मध्यावधी निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड बहुमताने विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला जात होता. सोनिया गांधी, राजीव गांधी यांनादेखील असेच वाटत होते. २० मे रोजी राजीव आणि सोनिया गांधी या दोघांनीही मतदान केले. राजीव गांधी मतदानकेंद्रावर आल्यानंतर तेथे गर्दी झाली होती. काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक राजीव गांधी यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते. राजीव गांधी आणि सोनिया गांधी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जात, तेव्हा सोनिया गांधी आजूबाजूच्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवायच्या. मतदानकेंद्रावर उभे असताना त्यावेळी पक्षातील एक तरुण राजीव गांधी यांच्याजवळ पूजेची थाळी घेऊन आला होता. या तरुणाला राजीव गांधींचे औक्षण करायचे होते. मात्र समोर प्रत्यक्ष राजीव गांधी उभे असल्यामुळे तो तरुण गांगरला असावा. गडबडीत त्या तरुणाच्या हातातून पूजेची थाळी निसटली. ही थाळी जमिनीवर आदळल्यामुळे मोठा आवाज झाला. या आवाजामुळे सोनिया गांधी दचकल्या. या प्रकारामुळे सोनिया गांधी काहीशा अस्वस्थ झाल्या होत्या. त्यानंतर राजीव गांधी यांनी सोनिया गांधींसाठी पेलाभरून पाणी मागवले. प्रत्यक्ष मतदानावेळी सोनिया गांधींना काँग्रेसचे पक्षाचे चिन्हच दिसत नव्हते. त्यांनी गोंधळाचा हा सर्व प्रकार नंतर राजीव गांधी यांना सांगितला. हे ऐकून राजीव गांधी हसायला लागले होते. मात्र त्यांनी सोनिया गांधी यांचा हातात हात धरून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी यांनी सोनिया गांधींना दिलासा देण्याची ती शेवटची वेळ असावी. कारण घरी परतल्यानंतर राजीव गांधी लगेच आपल्या नियोजित दौऱ्यांसाठी रवाना झाले होते.

दक्षिणेकडे रवाना होण्याआधी राहुल गांधींना फोन

२० मे रोजी राजीव गांधी दिल्लीला परतणे अपेक्षित होते. पुढच्या दोन दिवसांत दक्षिणेकडील राज्यांत मतदान होणार होते. अपेक्षेप्रमाणे राजीव गांधी २० मे च्या रात्री दिल्लीतल्या त्यांच्या घरी आले. त्यांनी राहुल गांधी यांना फोन केला. त्यावेळी राहुल गांधी अमेरिकेत शिक्षण घेत होते. या फोन कॉलमध्ये “राहुल तुला परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आहे. तू लवकर घरी परत येणार आहेस म्हणून मी खूश आहे. आपली ही उन्हाळ्याची सुट्टी खूप चांगली जाणार आहे. आय लव्ह यू बेटा” असे राजीव गांधी राहुल गांधींना म्हणाले आणि त्यांनी फोन ठेवला. मुलगी प्रियांका हिलादेखील जवळ घेतलं आणि ते दक्षिणेकडे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यासाठी रवाना झाले होते.

घरी थांबण्याची सोनिया गांधींची विनंती

दक्षिणेकडे रवाना होताना सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांना थांबण्याची विनंती केली होती. ‘तुम्ही न गेल्यास निवडणुकीचा निकाल बदलणार नाही’ असे सोनिया गांधी राजीव गांधींना उद्देशून म्हणाल्या होत्या. मात्र नियोजित दौरे असल्यामुळे मला जावे लागणार असे राजीव गांधींनी सोनिया गांधी यांना सांगितले होते. “आता हे शेवटचे दोन दिवस आहेत. त्यानंतर आपण पुन्हा विजयी होऊ. मग आपण एकत्रच असणार आहोत,” असे राजीव गांधी सोनिया गांधींना उद्देशून म्हणाले होते.

गुप्तचर विभागाने दिली होती सूचना

दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांनी ओडिसामधील वेगवेगळ्या शहरांना भेट दिली. त्यानंतर ते तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदुर येथे सभेसाठी जाणार होते. थकवा आल्यामुळे त्यांना श्रीपेरुंबुदुरची सभा रद्द करावी, असे वाटत होते. शिवाय रात्रीच्या वेळी तामिळनाडूतील सभांना जाऊ नका, कारण त्या राज्यातील बरेच स्थानिक लोक एलटीटीईला समर्थन करतात, असे गुप्तहेर खात्याच्या एका अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले होते. मात्र श्रीपेरुंबुदुर येथील सभा यशस्वी व्हावी यासाठी तेथील काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने मोठी मेहनत घेतली होती. याच कारणामुळे या लोकांना नाराज न करण्याच्या उद्देशाने राजीव गांधी यांनी या सभेला जाण्याचे ठरवले.

विमानात तांत्रिक बिघाड, अनेक खेड्यांत सभा

२१ मे रोजी राजीव गांधी तामिळनाडूकडे निघाले होते. त्यासाठी ते विमानात बसलेही होते. मात्र तांत्रिक बिघाड असल्यामुळे विमान जाऊ शकणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले होते. प्रवासासाठी थोडा वेळ असल्यामुळे राजीव गांधी आपल्या कारमध्ये बसून शासकीय डाकबंगल्याकडे आराम करण्यासाठी निघाले होते. मात्र मध्येच एका पोलीस अधिकाऱ्याने विमानातील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला आहे, असे राजीव गांधींना सांगितले. त्यानंतर राजीव गांधी रात्री साडे आठ वाजता तामिळनाडूतील मद्रासला (आता चेन्नई) पोहोचले. तेथे एक छोटी पत्रकार परिषद घेऊन ते पुढच्या प्रवासासाठी निघाले. वाटेत त्यांनी एका खेड्यात थांबत सभेला २० मिनिटे संबोधित केले.

राजीव गांधींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी

शेवटी रात्री साधारण दहा वाजता राजीव गांधी श्रीपेरुंबुदुर या छोट्याशा खेड्यात पोहोचले. ते सभास्थानी ठरलेल्या वेळेच्या साधारण दोन तास उशिराने पोहोचले होते. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी अंगरक्षक प्रदीप गुप्ता हे लोकांना राजीव गांधी यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र लोक राजीव गांधी यांना हात लावण्याचा प्रयत्न करत होते. कोणी त्यांच्या गळ्यात हार टाकत होते. तर कोणी राजीव गांधींकडे पुष्पमाला फेकत होते. विशेष म्हणजे राजीव गांधीदेखील उत्साहित जनतेला तेवढ्याच नम्रतेने अभिवादन करत होते.

महिला राजीव गांधींचे पाय धरण्यासाठी वाकली आणि…

मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलीस प्रशासन लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. याच जमावात साधारण तिशीतल्या दोन महिला होत्या. यातील एक महिला बुटकी सावळी असून तिचे नाव धनू होते. ही महिला गर्भवती असल्यासारखी दिसत होती. मात्र तिच्या स्थूलतेमागे काही वेगळे कारण असेल, असे कोणालाही तेव्हा वाटले नाही. तसा संशयही कोणाला आला नाही. प्रत्यक्षात मात्र धनू नावाच्या या महिलेच्या पोटाला ९ व्होल्ट्सची एक बॅटरी बांधलेली होती. यासह एक डिटोनेटर आणि सहा ग्रेनेड बांधून ठेवलेले होते. राजीव गांधी लोकांना अभिवादन करत सभेच्या मंचावर जात होते. तेवढ्यात हातात फुलांचा हार घेऊन धनू गर्दीतून पुढे आली आणि तिने राजीव गांधी यांच्या गळ्यात हार टाकला. राजीव गांधी यांनी या महिलेचे आभार मानले. नंतर त्यांनी गळ्यातील हार काडून पाठीमागे उभ्या असलेल्या एक सहकाऱ्याकडे दिला. दुसरीकडे धनू राजीव गांधी यांच्या पायाला हात लावण्यासाठी खाली वाकली. यावेळी राजीव गांधीदेखील खाली वाकून त्या महिलेला ‘माझे पाय धरू नको,’ असे सांगत होते. मात्र त्याच वेळी तार खेचून त्या महिलेने डिटोनेटरला कार्यान्वित केले आणि क्षणात सगळं काही उद्ध्वस्त झालं.

अंगरक्षकाच्या मृतदेहाजवळ राजीव गांधींचा बूट आढळला

सभास्थानी मोठा स्फोट झाला. या स्फोटात पोटाला बॉम्ब लावून आलेली धनू नावाची महिला, राजीव गांधी आणि आणखी सतरा लोक मृत्युमुखी पडले. सगळीकडे एकच खळबळ उडाली. हा फक्त एकच बॉम्बस्फोट आहे की आणखीही स्फोट होणार आहेत, हे पोलिसांना समजत नव्हते. सगळीकडे धूर, धूळ पसरली होती. काही वेळाने धूळ स्थिरावल्यानंतर या स्फोटाची भीषणता दिसू लागली. सगळीकडे हातपाय, शरीराचे आवयव, जळलेल्या वस्तू विखुरलेल्या होत्या. या घटनेत लोकांना राजीव गांधी यांचा अंगरक्षक प्रदीप गुप्ता सापडले. ते अद्याप जिवंत होते. वेदनांनी तळमळत होते. मात्र काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप गुप्ता यांच्या शरीराखाली नंतर राजीव गांधी यांचा बूट सापडला होता. या बुटावरूनच राजीव गांधी यांचा मृत्यू झाला हे समजले होते.

निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश

दरम्यान, स्फोटानंतर १५ मिनिटांनी राजीव गांधी यांचे निवासस्थान असलेल्या दिल्लीमधील १० जनपथ येथील फोन खणखणला आणि ही बातमी सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांना सांगण्यात आली. २० मे रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले होते. मात्र राजीव गांधी यांच्या हत्येमुळे उर्वरित ठिकाणचे मतदान पुढे ढकलण्यात आले. १२ आणि १५ जून रोजी उर्वरित मतदान दोन टप्प्यांत पार पडले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले. काँग्रेसचा एकूण २३२ जागांवर तर भारतीय जनता पार्टीचा १२० जागांवर विजय झाला. जनता दल पक्षाला ५९ जागा मिळाल्या तर सीपीएम ३५ आणि सीपीआय पक्षाला १४ जागा मिळाल्या. पुढे काँग्रेसने नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापना केलं.

(वरील स्टोरीसाठी ‘सोनिया गांधी’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादातून संदर्भ घेण्यात आले आहेत. हे पुस्तक मूळ स्पॅनिश लेखक हाविएर मोरो यांनी लिहिलेले आहे. तर या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद पीटर जे. हर्न, मराठी अनुवाद सविता दामले यांनी केलेला आहे.)