scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण : वाढीव खेळाडू, मॅटचा वापर – खो-खोमध्ये बदलांचे संकेत

महासंघाने आता १२ ऐवजी प्रत्येकी १५ खेळाडूंचा समावेश करण्याला मुभा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर खो-खोतील या आमूलाग्र घडामोडींचा घेतलेला वेध

लोकसत्ता विश्लेषण : वाढीव खेळाडू, मॅटचा वापर – खो-खोमध्ये बदलांचे संकेत
आता १२ ऐवजी प्रत्येकी १५ खेळाडूंचा समावेश असणार

– ऋषिकेश बामणे
गेल्या काही काळापासून वाढत्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी खो-खो क्रीडा संघटक सातत्याने प्रयत्न करत आहेत. खेळाच्या नियमांमध्ये बदल करण्यावरून सध्या दोन गट निर्माण झाले असले तरी भारतीय खो-खो महासंघाने खेळाडूंच्या संख्येत वाढ करून एक प्रकारे भविष्यातील बदलांचे संकेत दिले आहेत. करोनाचे सावट, मॅटवर खेळताना होणाऱ्या दुखापती आणि वेगवान खेळामुळे उद्भवणारा धोका यांसारख्या कारणांमुळे महासंघाने आता १२ ऐवजी प्रत्येकी १५ खेळाडूंचा समावेश करण्याला मुभा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर खो-खोतील या आमूलाग्र घडामोडींचा घेतलेला वेध –

खो-खोमध्ये खेळाडूंच्या संख्येत वाढ कशासाठी?
डिसेंबर महिन्यात जबलपूर (मध्य प्रदेश) येथे मॅटवर खेळवण्यात आलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रतीक वाईकर, मिलिंद कुरपे या प्रमुख खेळाडूंना दुखापत झाली. त्याशिवाय आणखी काही खेळाडूही दुखापतग्रस्त झाल्याने रेल्वेविरुद्धच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला तंदुरुस्त नऊ खेळाडू खेळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. याव्यतिरिक्त आणखी काही संघांनाही पुरेशा तंदुरुस्त खेळाडूंंची उणीव जाणवली. भविष्यातही असंख्य स्पर्धा मॅटवरच होणार आहेत. तसेच खेळाडूंंना करोनाची लागण होण्याचा धोका आहेच. त्यामुळे अनेक संघटनांनी विनंती केल्यामुळे महासंघाने आता कोणत्याही स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड करण्याची परवानगी दिली. एप्रिल महिन्यापासून प्रत्येक संघात प्रत्यक्षात खेळणारे नऊ आणि सहा राखीव असे एकूण १५ खेळाडू असतील. यापूर्वी फक्त तीनच राखीव खेळाडूंना स्पर्धेला घेऊन जाता येत होते. प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि अन्य सहाय्यकांच्या संख्येत मात्र वाढ करण्यात आलेली नाही.

मॅटमुळे खेळाडूंच्या संख्येत वाढ का करण्यात आली?
विश्वातील बहुतांश नामांकित स्पर्धा प्रामुख्याने मातीवर खेेळवण्यात येतात. परंतु युवा पिढीला आकर्षित करण्यासह खेळाला अधिक प्रकाशझोत मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने काही वर्षांपूर्वी मॅटवर खो-खोचे सामने होण्यास सुरुवात झाली. खो-खोसारख्या वेगवान खेळात खेळाडू पायात बूट घालून खेळू लागले. परंतु मॅटमध्ये धावताना पडल्यास त्यांचे हात, पाय अडकून इजा होण्याची शक्यता अधिक आहे. मातीत खेळाडू आधीपासूनच खेळत असल्याने अनेकदा पावसामुळे काहीशा ओलसर झालेल्या भागातही खो-खोपटू खेळतात. परंतु मॅटवर पाणी पसरल्यास खेळाडू बूट घसरून खांबावर आदळल्याचे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दिसून आले. महाराष्ट्रातील बहुतांश खो-खोपटू आताही मातीवर खो-खो खेळण्याला अधिक प्राधान्य देतात.

खो-खोमध्ये नियम बदलण्याचा अ्ट्टाहास का?
क्रिकेट, कबड्डी या खेळांप्रमाणेच खो-खोचीही लीग सुरू करण्याच्या उद्देशाने सध्या खो-खोतील नियमांत बदल करण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खो-खोपटूंना रोजगाराच्या अधिक संधी मिळाव्या, कमी वेळेत सामन्यांचे निकाल लागावे, चाहत्यांची उत्कंठा वाढवण्याबरोबरच खो-खो खेळाला आशियाई स्पर्धेत प्रवेश मिळवून द्यावा, यासाठी अल्टिमेट लीगचे आयोजन मोलाची भूमिका बजावेल. मात्र काही राज्य संघटनांनी खो-खो पारंपरिक नियमांप्रमाणेच खेळवण्यात यावा, असा पावित्रा स्वीकारल्यामुळे महासंघाने खो-खोच्या मूळ नियमांत अद्याप काहीही बदल केलेले नाहीत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rules of kho kho will be changed scsg 91 print exp 0122