Sea Level Rise हवामान बदलामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. चीनच्या किनारपट्टीचा एक-चतुर्थांश भूभाग समुद्रसपाटीच्या खाली बुडणार आहे. जमीन कमी झाल्यामुळे आणि हवामान बदलामुळे कोट्यवधी लोकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे, असे शुक्रवारी (१९ एप्रिल) सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमधील भूभाग कमी होणे हा प्रामुख्याने जलद शहरीकरणाचा परिणाम आहे. अतिरिक्त उत्खननामुळे इमारती जमिनीत धसत आहेत. हवामान बदलामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्र पातळीतील वाढ ही बाब केवळ चीनपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती एक जागतिक समस्या आहे आणि दिवसागणिक तिची व्याप्ती वाढत आहे. यूएन अहवालानुसार समुद्र पातळीत वेगाने होणारी वाढ १३० दशलक्ष ते अर्धा अब्ज लोकांवर परिणाम करणारी ठरेल, असा अंदाज आहे. हवामानातील बदलामुळे समुद्राची पातळी कशी वाढते? याचा मानवी जीवनावर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊ.

हवामान बदलामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?

जागतिक समुद्र पातळी किती वेगाने वाढत आहे?

नॅशनल ओशनिक अॅण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA)च्या अहवालानुसार, १८८० पासून जागतिक समुद्र पातळी सुमारे आठ ते नऊ इंच किंवा २१ ते २४ सेंटीमीटरने वाढली आहे. परंतु, अधिक चिंताजनक बाब म्हणजे १९९३ पासून वाढीचा हा दर वेगाने वाढत आहे. १९९३ मध्ये हा दर ०.०७ इंच किंवा ०.१८ सेंटीमीटर प्रतिवर्ष होता; जो आता ०.४२ सेंटीमीटर झाला आहे, म्हणजे हा दर दुपटीपेक्षा जास्त झाला आहे.

समुद्र पातळीत वेगाने होणारी वाढ (छायाचित्र-लोकसत्ता डिजिटल टिम)

२०२२ ते २०२३ या कालावधीत जागतिक समुद्राची सरासरी पातळी सुमारे ०.३ इंच किंवा ०.७६ सेंटीमीटरने वाढली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, एल निनोच्या (पॅसिफिक महासागरात तयार झालेली हवामान स्थिती) वाढीमुळे दोन वर्षांदरम्यान जागतिक समुद्र पातळीत मोठी वाढ झाली आहे. परंतु, आता एल निनो कमकुवत होत असल्याने, समुद्र पातळीच्या वाढीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे.

नासाच्या समुद्र पातळी बदल टीम आणि वॉशिंग्टनमधील महासागर भौतिकशास्त्र कार्यक्रमाच्या संचालक नाड्या विनोग्राडोव्हा शिफर यांच्या मते, “सध्याच्या दरांचा अर्थ असा आहे की, २०५० पर्यंत जागतिक सरासरी समुद्र पातळीत आणखी २० सेंटीमीटर वाढ होण्याची शक्यता आहे. मागील १०० वर्षांच्या तुलनेत पुढील तीन दशकांमध्ये बदलाचे प्रमाण दुप्पट होईल आणि पूर परिस्थितीचा धोका वाढेल.

हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत कशी वाढ होत आहे?

समुद्र पातळी वाढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. जगभरातील तापमान दिवसागणिक वाढत आहे. हिमनद्या व बर्फाचे थर वितळत आहेत आणि समुद्रात पाणी भरत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे महासागरदेखील अधिक उष्ण होत आहे. त्यामुळेही समुद्राची पातळी वाढत आहे.

NOAA अहवालात म्हटले आहे की, १९७० पासून बर्फ वितळणे आणि वाढती उष्णता समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचे मुख्य कारण आहे. पर्वतीय हिमनद्या आणि बर्फ वेगाने वितळत आहेत. उदाहरणार्थ, २०२३ च्या अभ्यासात असे आढळून आले की, ग्रीनलँडमधील हिमनद्या २० वर्षांपेक्षा पाच पट वेगाने वितळत आहेत. बर्फ वितळल्यामुळे २००५ व २०१२ दरम्यान समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचे प्रमाण जवळजवळ दुप्पट झालेय, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

पर्वतीय हिमनद्या आणि बर्फ वेगाने वितळत आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

समुद्र पातळी महत्त्वाची का?

समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा सर्वांत वाईट परिणाम म्हणजे किनारी भागात येणारा पूर. भारतातील किनारी शहरांचे उदाहरण द्यायचे म्हटले तर, RMSI या जागतिक जोखीम व्यवस्थापन संस्थेच्या २०२२ च्या विश्लेषणात असे आढळून आले की, मुंबई, कोची, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम व तिरुवनंतपुरममधील काही महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे २०५० पर्यंत पाण्याखाली जाईल. भारतातही समुद्राची पातळी वेगाने वाढत आहे.

इंडोनेशियासारख्या बेटयुक्त देशांची परिस्थिती तर अधिक वाईट आहे. २०१९ मध्ये इंडोनेशियाने जाहीर केले की, देशाची राजधानी जकार्ताला पुराचा धोका आहे. त्यामुळे ही राजधानी बोर्नियो बेटावरील पूर्व कालीमंतन प्रांतात हलवली जाईल. समुद्राच्या पातळीच्या वाढीमुळे अधिक तीव्र वादळे निर्माण होत आहेत. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे पूरस्थिती निर्माण होत असून, किनारी भागांचे नुकसान होत आहे.

हेही वाचा : गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?

समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे खारे पाणी गोड्या पाण्यातील जलचरांना दूषित करीत आहे. वेळीच पावले उचलली नाहीत, तर माणसासह निसर्गालाही धोका निर्माण होईल आणि पक्षी व प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sea level rise reasons and effects on humans rac