5,000-Year-Old Sealed Wine Jars Discovered in Egypt: इजिप्तमध्ये लागलेल्या एका शोधामुळे प्राचीन वाईन निर्मितीच्या कलेविषयी माहिती मिळण्यास मदत झाली आहे. पुरातत्त्वज्ञांनी अलीकडेच अबीडॉस येथे असलेल्या राणी मेरिट-नेइथच्या थडग्यातून ५,००० वर्षे जुनी सीलबंद वाईनची भांडी शोधून काढली आहेत. अबीडॉस हे इजिप्तमधील सर्वात प्राचीन राजेशाही दफन स्थळांपैकी एक मानले जाते. हा शोध केवळ प्राचीन काळातील वाईन निर्मितीशी संबंधित नाही, तर प्राचीन इजिप्तशियन समाजाने वापरलेल्या प्रगत तंत्रज्ञानावरही प्रकाश टाकतो.
प्राचीन वाईन निर्मितीची झलक
व्हिएन्ना विद्यापीठातील ख्रिस्तियाना कोहलर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उत्खननात वाईनच्या शेकडो भांड्यांचा शोध लागला आहे. त्यापैकी अनेक भांडी दफन झाल्यापासून आजपर्यंत सीलबंद राहिली होती. ही भांडी योग्य स्थितीत आहेत. या भांड्यांमध्ये द्राक्षांच्या बिया आणि मूळ झाकण पूर्णावस्थेत आहेत, तसेच किण्वन पद्धती आणि कदाचित काही अतिरिक्त पदार्थ वापरण्यात आल्याचे संशोधकांना लक्षात आले आहे. “अबीडॉस येथे सापडलेल्या सीलबंद आणि सुरक्षित वाईनच्या भांड्यांसह चांगल्या स्थितीत सापडलेल्या द्राक्षबिया आपल्या प्राचीन भूमध्य सागर आणि उत्तर आफ्रिकेमधील वाईन निर्मिती, वापर आणि व्यापाराच्या सुरुवातीच्या टप्प्यांबाबतच्या भरपूर नवीन माहिती देतात,” असे इंग्लंडमधील इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल स्टडीजमधील पुरातत्त्वज्ञ एमलिन डॉड यांनी सांगितले.
भांड्यांमध्ये सापडलेल्या द्राक्षबिया विशेषतः महत्त्वपूर्ण मानल्या जातात. शास्त्रज्ञांना आशा आहे की, या बियांच्या आधारे प्राचीन द्राक्षांच्या जातींचा उगम शोधता येईल आणि त्यांचा आधुनिक जातींशी संबंध जोडता येईल. “उदाहरणार्थ, भांड्यांच्या आत उरलेल्या अवशेषांचे विश्लेषण केल्यास त्या वाईनची रासायनिक रचना समजू शकते, ज्यामुळे त्याची चव आणि वापरलेले घटक उघड होतील,” असे डॉड यांनी पुढे सांगितले.
वाईन कसा झाला संस्कृतीचा कणा?
प्राचीन इजिप्तमध्ये वाईन हे केवळ एक पेय नव्हते. ते सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पेय होते. राणी मेरिट-नेइथच्या दफन संकुलात सापडलेल्या वाईनच्या भांड्यांवरून हे स्पष्ट होते की, इजिप्तमधील धार्मिक आणि अंत्यसंस्कार विधींमध्ये वाईन महत्त्वाची होती. पुरातत्त्वज्ञांच्या मते, वाईन प्रामुख्याने उच्चवर्गीयांच्या समारंभांमध्ये वापरली जात असे, त्यामुळे सामाजिक स्थानाचे प्रतीक आणि श्रेणीव्यवस्थेचे बळकटीकरण होत असे. हजारो वर्षे वाईन सुरक्षित ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न हा त्यासाठीचा महत्त्वाचा पुरावा आहे. ही वाईन केवळ धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध नव्हती. तर, ती परलोकात घेवून जाण्यासाठीही महत्त्वाची होती, असा तत्कालीन समज होता. ही भांडी राजघराण्यातील थडग्यात आढळत असल्याने वाईन हा इजिप्तच्या उच्चवर्गीय संस्कृतीचा अविभाज्य भाग होता, हे लक्षात येते.
ते केवळ पेय नव्हते, तर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये त्याला अनन्यसाधारण महत्त्व होते. या नव्या शोधातून असे लक्षात येते की, वाईन हे केवळ साधारण पेय नव्हते तर प्रतिष्ठेचे प्रतीक, विधींमध्ये अर्पण करण्याची महत्त्वाची वस्तू आणि कदाचित चलनाच्या स्वरूपात वापरला जाणारा घटक होता.
व्यापार आणि तंत्रज्ञानाविषयीचे आकलन
हा अद्भुत शोध प्राचीन इजिप्तमधील प्रारंभिक व्यापारी जाळे आणि तांत्रिक प्रगतीबद्दल महत्त्वाचे संकेत देतो. वाईन निर्मिती ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती, त्यासाठी अँफोरा (वाईनच्या साठवणुकीसाठीचे विशिष्ट भांडे), सीलिंगसाठी लागणारे पदार्थ, तसेच किण्वन आणि साठवण तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक होते. यावरून असे दिसते की, इजिप्तच्या आरंभीच्या राजवंशीय काळात व्यापार आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांत उच्च दर्जाची प्रगल्भता आली होती. भांड्यांची उत्तम जपलेली स्थिती दर्शवते की, इजिप्तशियन समुदायाने वाईन उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी पद्धती विकसित केल्या होत्या आणि ही संकल्पना आजच्या आधुनिक वाईनमेकिंगमध्येही अत्यावश्यक आहे. सीलबंद कंटेनर सूचित करतात की, त्यांना सूक्ष्मजीवशास्त्र व त्याच्या साठवणुकीच्या तंत्रांबद्दल भरपूर ज्ञान होते.
तसेच, वाईन निर्मितीचे हे ज्ञान भूमध्य समुद्र प्रदेशात सर्वत्र त्याकाळात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते इतर प्राचीन परंपरांशी एकरूप झाले आणि आज आपल्याला ज्ञात असलेल्या वाइननिर्मिती पद्धतींच्या विकासात त्याचा मोठा वाटा असल्याचे लक्षात येते.