कृत्रिम बुद्धीमत्तेवर काम करणाऱ्या ओपन एआय या कंपनीच्या चॅट जीपीटी या चॅटबोटचा वापर कोट्यवधी लोक करतात. कोणतीही अडचण आल्यास त्यावर समाधान शोधण्यासाठी या मंचाचा हमखास वापर केला जातो. मात्र आता काही लोक आरोग्यविषयक समस्या तसेच या समस्यांवर उपाय शोधण्यासाठीदेखील चॅट जीपीटीचा वापर करत आहेत. पण कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून आरोग्यविषयक समस्यांवर समाधान शोधणे योग्य आहे का? चॅट जीपीटी अशा समस्यांवर योग्य मार्गदर्शन करते का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…

आरोग्यविषयक समस्येचे उत्तर शोधण धोकादायक ?

कोणत्याही आरोग्यविषयक समस्येवरचे समाधान गुगल किंवा चॅट जीपीटीवर शोधणे मुळात धोकादायक ठरू शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन या क्षेत्रातील अभ्यासकांनी वापरकर्त्यांना योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे चॅट जीपीटीच्या फ्री व्हर्जनवर आरोग्यविषय समस्यांचे समाधान शोधणे धोकादायक ठरू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. कारण काही आजारांच्या बाबतीत चॅट जीपीटी किंवा कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित तत्सम चॅटबोट चुकीची, अपूर्ण माहिती देऊ शकते.

आरोग्यविषयक प्रश्नांची चुकीची उत्तरे

चॅट जीपीटी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित प्रश्नांची उत्तरे योग्य प्रकारे देते का? याचा लाँग आयलँड युनिव्हर्सीटीने अभ्यास केला. जीपीटीने साधारण तीन चतुर्थांश प्रश्नांची उत्तरे अपूर्ण, चुकीची दिल्याचे या अभ्यासातून समोर आले.

१० प्रश्नांची दिली अचूक उत्तरे

अभ्यासकांनी चॅट जीपीटीला औषधांशी संबंधित एकूण ३९ प्रश्न विचारले. त्यानंतर चॅट जीपीटीने दिलेल्या उत्तरांची तुलना या क्षेत्रातील तज्ज्ञ फार्मासिस्टने दिलेल्या उत्तरांशी करण्यात आली. या अभ्यासातून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. एकूण प्रश्नांपैकी १० प्रश्नांची उत्तरे चॅट जीपीटीने बरोबर दिली. उर्वरित २९ प्रश्नांची उत्तरे ही एक तर चुकीची किंवा अपूर्ण होती. काही प्रश्नांची उत्तरं तर चॅट जीपीटीला देता आली नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष मंगळवारी (१२ डिसेंबर) कॅलिफोर्नियातील अमेरिकन सोसायटी फॉर हेल्थ-सिस्टम फार्मासिस्टच्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आले.

फक्त ८ संदर्भ दिले

चॅट जीपीटीने या प्रश्नांची उत्तरे नेमकी कशी दिली, हे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी संदर्भ मागितले. मात्र चॅट जीपीटीने एकूण ३९ प्रश्नांपैकी फक्त आठ प्रश्नांचेच संदर्भ दिले. तर उर्वरित प्रश्नांच्या उत्तरांसाठी अस्तित्त्वात नसलेल्या स्त्रोतांचा संदर्भ दिला.

चॅट जीपीटीने दिली चुकीची माहिती?

या अभ्यासकांनी चॅट जीपीटीने दिलेल्या एका विशेष प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले . चॅट जीपीटीने एका प्रश्नाचे उत्तर देताना Paxlovid नावाचे औषध आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करणारे verapamil या औषधांत कोणताही अभिक्रिया होत नाही, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र रुग्णाने ही दोन्ही औषधं सोबत घेतल्यास त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांनी काय सांगितले?

आरोग्य तसेच औषधांची माहिती चॅट जीपीटीवर शोधावी का? याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. “रुग्णाला औषध देण्यासाठी चॅट जीपीटीची मदत घेणे हे धोकादायक ठरू शकते. यामुळे नको असलेल्या दोन औषधांत अभिक्रिया होऊ शकते,” असे LIU मधील औषधनिर्माण शास्त्रातील सहाय्यक प्राध्यापीका सारा ग्रोसमॅन यांनी सांगितले. चॅट जीपीटीच्या फ्री व्हर्जनची कार्यक्षमता कमी आहे. त्यामुळे चॅट जीपीटीवर जुन्या औषधांची माहिती मिळू शकते. वैद्यकीय क्षेत्रात रोज नवनवे शोध लागतात. या क्षेत्रात रोज प्रगती होत आहे. असे असताना औषधांबाबतची जुनी माहिती ही धोकादायक ठरू शकते.

तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचे

लाँग आयलँड युनिव्हर्सीटीने काढलेल्या निष्कर्षांनुसार रुग्ण, आरोग्य क्षेत्रात काम करणारी व्यक्ती किंवा अन्य कोणी औषधांविषयीची माहिती चॅट जीपीटीवर शोधत असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी अगोदर या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतला पाहिजे. आरोग्यविषयक सल्ला हवा असेल तर थेट तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य आहे, असे सांगितले जात आहे.

ओपन एआयची नेमकी भूमिका काय?

या अभ्यासानंतर ओपन एआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वैद्यकीय मदत म्हणून चॅट जीपीटीचा वापर करू नये असा सल्ला आमच्याकडून दिला जातो, असे ओपन आएयच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या प्रवक्त्यांनी ओपन एआयच्या धोरणांसदर्भातही माहिती दिली आहे. आमच्या कंपनीचे मॉडेल्स योग्य आणि सर्वोत्तम वैद्यकीय माहिती देतील अशी नाहियेत. लोकांनी चॅट जीपीटीचा उपयोग रोगाचे निदान, उपचार तसेच अन्य गंभीर आरोग्यविषय समस्येचे समाधान शोधण्यासाठी करू नये, असे ओपन एआयने आपल्या धोरणांत सांगितलेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी काळात चॅट जीपीटी प्रसिद्ध

कृत्रिम बुद्धीमत्तेवर चालणाऱ्या चॅट जीपीटी या मंचाला अगदी कमी काळात अधिक प्रसिद्धी मिळाली. ओपन एआय या कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅट जीपीटीची सुरुवात केली होती. अवघ्या दोन महिन्यांत चॅट जीपीटीच्या वापरकर्त्यांची संख्या तब्बल १०० दशलक्षापर्यंत पोहोचली होती. मात्र चॅट जीपीटीबाबत उत्तरांत खोटी माहिती, भेदभाव, बौद्धिक संपदेशी संबंधित समस्या, फसवणूक अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याच कारणामुळे फेडरल ट्रेड कमिशनने जुलै महिन्यात चॅट जीपीटीची अचुकता तसेच ग्राहक संरक्षणाच्या बाबतीत चौकशी सुरू केली होती.