युद्धात आवश्यक असते, ती गतिमानता. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गतिमान आणि चपळ हालचालींनी शत्रूला अनेकदा चकित केले आणि युद्धात जय मिळविला. नुकत्याच झालेल्या कारगिल विजयदिनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘रुद्र’ ब्रिगेड, ‘भैरव लाइट कमांडो बटालियन’, ‘शक्तिबान आर्टिलरी रेजिमेंट’, ड्रोनच्या विशेष प्लाटूनची घोषणा केली. युद्ध अधिक चपळ, गतिमान यामुळे होईल आणि मारक क्षमताही वाढेल. दहशतवाद्यांविरुद्धची लढाई अधिक संहारक, अचूक आणि शत्रूची नुकसान करणारी ठरेल.
‘ऑपरेशन सिंदूर’चे महत्त्व
भारताने पाकिस्तानविरुद्ध राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले असले, तरी आताच्या आधुनिक युद्धपद्धतीची तयारी दीर्घ काळापासून होत आहे. तिन्ही दलांतील समन्वय वाढण्याकडे लक्ष दिले गेले आहे. संरक्षण दलप्रमुख पदाची (सीडीएस) निर्मिती होण्याबरोबरच सायबर आणि अचूक हल्ले करण्याच्या तंत्रातही आपण मोठी प्रगती केली आहे. ‘रुद्र’ ब्रिगेडसह ‘भैरव लाइट कमांडो बटालियन’सह इतर बदलांची जी घोषणा झाली, ती पाहता दीर्घ काळापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त रूप मिळाले आहे. सैन्याला सीमेवर गतीने आणण्यासंदर्भात आणि मर्यादित युद्धपद्धतीच्या दृष्टीने सैद्धांतिक पातळीवरील चर्चेला २० वर्षांपूर्वीच सुरुवात झाली. एकात्मिक लढाई गट (इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप, आयबीजी) तयार करण्याचा विचार दीर्घ काळापासून होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी चालू वर्ष हे संरक्षण दलांतील बदलांचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्या दृष्टीने येत्या काळात आणखी बदल होणे अपेक्षित आहे.
‘रुद्र’ ब्रिगेड, ‘भैरव लाइट कमांडो बटालियन’
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘रुद्र’ ब्रिगेडमध्ये पायदळ, चिलखती दल, रणागाडे, तोफा, विशेष कमांडो, अभियंते, सिग्नल युनिट्स असे सर्व काही एकाच ठिकाणी असेल. शत्रू प्रदेशात जलद घुसणे त्यामुळे सोपे जाणार आहे. सध्याच्या ‘सिंगल आर्म ब्रिगेड’चे रूपांतर ‘ऑल आर्म ब्रिगेड’मध्ये यामुळे होईल. एरव्ही युद्धसरावावेळी किंवा प्रत्यक्ष युद्धावेळी एकत्र येणाऱ्या या ब्रिगेड आता कायमस्वरूपी एकत्र असतील. ‘भैरव लाइट कमांडो बटालियन’ ही विशेष कमांडोंनी सज्ज असेल. शत्रू प्रदेशात छुपी कारवाई करायची असेल, तर ही बटालियन त्यासाठी उपयुक्त ठरेल. अत्याधुनिक शस्त्रांनी या बटालियन सज्ज असतील. शत्रूला आश्चर्यचकित करणे, अचानक शत्रूवर तुटून पडणे यासाठी हे कमांडो निष्णात असतील.
ड्रोन प्लाटून
बदलत्या युद्धपद्धतीमधील ड्रोनचे महत्त्व लक्षात घेऊन लष्कराने पायदळ ड्रोनने सुसज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ड्रोनचा वापर शत्रूवर हल्ला करण्याबरोबरच इतर अनेक कामांसाठी करता येतो. ड्रोनच्या यशस्वी वापरामुळे युद्धाचे पारडे फिरू शकते.
शक्तिबान आर्टिलरी रेजिमेंट
या रेजिमेंट ‘दिव्यास्त्र बॅटरी’ने (तोफांसह इतर सामग्री असणारे एक युनिट) सुसज्ज असतील. शत्रूवर अचूक हल्ला करणे, मानवरहित विमानांनी टेहळणी करणे, शत्रूवर दारुगोळ्याची बरसात करणे आदींसाठी ही रेजिमेंट सज्ज असेल. सीमेपलीकडील हल्ल्यासाठी ही रेजिमेंट सज्ज असेल.
एकत्रित लढाई गट (आयबीजी)
संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन पराक्रम’ राबविले होते. दोन्ही देशांत तेव्हा युद्ध झाले नसले, तरी युद्धाचे वातावरण तयार झाले होते. या ‘ऑपरेशन पराक्रम’अंतर्गत लष्कर सीमेवर आणण्यात आले. मात्र, लष्कराची सीमेवर जमवाजमव करण्यात जितका वेळ गेला, ते पाहता ‘आयबीजी’ अर्थात ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप’ची संकल्पना पुढे आली. नंतर ‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’ची चर्चा सुरू झाली. ‘कोल्ड स्टार्ट’ ही संकल्पना म्हणजेच अधिकाधिक गतिमानतेने लष्कराची जमवाजमव करून लष्कराची मारक क्षमता वाढविणे. दीर्घ काळापासून असलेली बचावात्मक रणनीती बदलून तिला थोडी धार देण्याचा प्रयत्न होता. या बाबींची चर्चा होत असली, तरी प्रत्यक्षात बदल होण्यास वेळ लागत होता. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या काळात ‘आयबीजी’च्या निर्मितीला पुन्हा चालना मिळाली. जनरल रावतच पुढे पहिले संरक्षण दल प्रमुख झाले. तिन्ही दलांतील समन्वयाच्या दिशेने त्यांच्या काळात मोठी चालना मिळाली. पाकिस्तान आणि चीनचे आव्हान लक्षात घेता अशा प्रकारचे ‘आयबीजी’ मोठ्या प्रमाणावर उभारण्याची गरज आहे.
आव्हाने
लष्करात नव्याने हे बदल करताना कुठलीही नवी भरती करण्यात आलेली नाही. सध्या असलेल्या रचनेमध्येच बदल केला आहे. उपलब्ध साधने वापरून मारक क्षमता अधिक करण्याचा हा प्रयत्न आहे. संरक्षणासाठीच्या वार्षिक निधीमध्ये त्यामुळे मोठा फरक पडण्याची शक्यता कमी आहे. आधुनिक काळातील युद्धपद्धती खर्चिक आहे. हवाई सुरक्षा भेदणे मोठे जोखमीचे काम आहे. एखादे महासंहारक क्षेपणास्त्र गर्दीच्या भागात पडले, तर किती नुकसान होईल, याचा अंदाज न केलेलाच बरा. ही आव्हाने पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मोठी तरतूद येत्या काळात होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचे आव्हान पाहता स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीवरही भर देणे गरजेचे आहे.
पुढे काय?
या बदलांमुळे ‘थिएटर कमांड’च्या निर्मितीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. ‘थिएटर कमांड’ हा बदलांचा निर्णायक टप्पा असेल. तिन्ही दलांमध्ये त्यावरही एकमत झाल्याची चर्चा आहे. ‘थिएटर कमांड’ची निर्मिती झाली, तर संरक्षण दलांची एकूण रचनाच बदलणार आहे. बदलत्या युद्धपद्धतीवर आणि कराव्या लागणाऱ्या आवश्यक सुधारणांवर ‘सीडीएस’ जनरल चौहान यांच्यासह लष्करप्रमुख द्विवेदी यांनी नजीकच्या काळात सविस्तर भाष्य केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बदललेल्या वातावरणाबाबत ते जनतेला सांगत आहेत. बदललेले हे युद्ध सीमांवरच नसून, ते सर्वांना मिळून एकत्रितपणे लढायचे आहे. हे आव्हान मोठे आहे. त्यासाठी सर्वांनी सज्ज असायला हवे.
prasad.kulkarni@expressindia.com