एग फ्राइड राईस हा जगभरात चवीने खाल्ला जाणारा लोकप्रिय पदार्थ. मात्र, एग फ्राइड राईस बनवण्याची पाककृती (रेसिपी) सध्या चीनच्या एका प्रसिद्ध शेफसाठी मनस्तापाचे कारण ठरले आहे. रेसिपीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यासाठी माफी मागण्याबरोबरच, ‘मी पुन्हा कधीही एग फ्राइड राईस बनवणार नाही…’ असेही त्याला जाहीर करावे लागले. कोण आहे हा शेफ आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून एग फ्राइड राईस हा तेथील कम्युनिस्ट सरकारसाठी संवेदनशील, ज्वलंत विषय बनण्यामागचे नाट्य नक्की काय…

शेफ वांग गँग कोण?

वांग गँग चीनमधील ३४ वर्षांचा एक प्रसिद्ध शेफ आहे. सिच्युआन प्रांतातील ग्रामीण भागातून आलेल्या वांगचे विबो, यू-ट्यूबसह समाजमाध्यमांवर एक कोटींहून अधिक ऑनलाइन चाहते आहेत. त्याने पोस्ट केलेल्या पारंपरिक चिनी पदार्थांच्या पाककृती जगभरातील चाहते आवडीने पाहात असतात.

iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

एग फ्राइड राईसमुळे वांगला टीकेला का सामोरे जावे लागतेय?

वांगने २७ नोव्हेंबर रोजी चिनी समाजमाध्यम विग्बोवर एग फ्राइड राईस बनवण्याच्या रेसिपीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला. पण या पदार्थाला काळा इतिहास आहे. चिनी साम्यवादी क्रांतिकारक व राज्यक्रांतीचे प्रणेते माओ झेडोंग यांचा मोठा मुलगा माओ एनिंग याचा कोरियन युद्धादरम्यान अमेरिकन हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या घटनेची थट्टा करण्यासाठी वांग याने व्हिडिओ वापरल्याचा आरोप संतप्त राष्ट्रप्रेमींनी केला आहे. वांग याने यापूर्वीही २०१८ आणि २०२० या वर्षांत याच कालावधीत वेगळ्या प्रकारच्या एग फ्राइड राईसच्या पाककृती पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे माओ समर्थकांना वांग याची ही कृती योगायोगाने नसून जाणीवपूर्वक केल्याचे वाटते.

पण माओ एनिंग आणि एग फ्राइड राईसचा संबंध काय?

१९५० मध्ये झालेल्या कोरियन युद्धात चायनीज पीपल्स व्हॉलंटियर आर्मीमध्ये (PVA) मध्ये माओ एनिंग अधिकारी म्हणून कार्यरत होता. या युद्धादरम्यान अमेरिकन हवाई सेनेच्या भीतीमुळे केवळ रात्रीच अन्न शिजविण्याचे नियम आणि आदेश होते. मात्र, २५ नोव्हेंबर १९५० रोजी सकाळी माओ एनिंगच्या नाश्त्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी एग फ्राइड राईस बनवला. त्यासाठी पेटवण्यात आलेल्या स्टोव्हच्या धुराने अमेरिकन बॉम्बर्सचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात माओ एनिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला.

वांगच्या टीकाकारांचे काय म्हणणे आहे?

माओ एनिंगच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या एग फ्राइड राईसच्या पाककृती नोव्हेबर महिन्यात पोस्ट करणे म्हणजे एनिंगच्या मृत्यूची थट्टा करणे, असे माओ झेडोंगचे समर्थक आणि काही राष्ट्रप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे वांग याला चिनी समाजमाध्यमांवर बंदी घालण्याची मागणी काहींनी केली आहे. तर काहींनी २०१८ च्या कायद्याचा हवाला देऊन ‘राष्ट्रीय नेते आणि शहिदांचा’ अपमान केल्याबद्दल वांग याला शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा… विश्लेषण: शेतकरी पॅकेज कसे ठरवले जाते? पॅकेजने खरेच फायदा होतो का?

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चिनी सरकारने २०१८ मध्ये राष्ट्रीय नेत्यांवर टीका करणाऱ्या किंवा त्यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा कायदा संमत केला आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.

वांग गँगचे याबाबत काय म्हणणे आहे?

व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आणि सर्वांच्या टिप्पण्या पाहिल्यानंतर मला या परिस्थितीबद्दल समजले. मी फक्त उत्तम पदार्थांच्या पाककृती पोस्ट केल्या आणि ते करताना माझा इतर कोणताही हेतू नव्हता, असे वांगने त्याच्यावरील टीकेला उत्तर देताना स्पष्ट केले. तसेच, त्याने माफीनामा जाहीर केला असून त्यात म्हटले की, त्याच्या टीमने त्याला न सांगताच व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमुळे प्रत्येकाला खूप त्रास झाला आणि त्याचा खूप वाईट अनुभव आला. मी अलीकडे वैयक्तिक गोष्टींमध्ये व्यग्र होतो आणि त्यामुळे व्हिडिओच्या प्रसिद्धीत सहभागी झालो नाही. ही माझी सर्वात मोठी चूक होती, असे सांगत वांगने एग फ्राइड राईसच्या पाककृतीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून काढून टाकला.

वांग समर्थकांची यावर काय प्रतिक्रिया आहे?

माओ झेडोंगचा विरोध करणारे काही चिनी नागरिक आणि गट, माओ एनिंगचा मृत्यू झालेला दिवस एग फ्राइड राईस खाऊन साजरा करतात. अशा अनेक जणांनी वांगला पाठिंबा दिला आहे. ‘तुला माफी मागण्याची गरज नाही. समाजानेच तुझी माफी मागितली पाहिजे’, असे त्याच्या समर्थकांनी म्हटले आहे. ‘नोव्हेंबरमध्ये एग फ्राइड राईस खाण्यावर आणि बनवण्यावर पूर्णपणे बंदी का घातली जात नाही. तसेच चायनीज खाद्यपदार्थांमधून एग फ्राइड राईसला वगळून का टाकले जात नाही, अशी विचारणा करत दुसऱ्या समर्थकाने वांगवरील टीकेची खिल्ली उडवली आहे.