Cultural significance of buffaloes in India: तलाव, नद्या, दलदली आणि भात लागवडीसाठी असलेल्या ओलसर भागांत म्हशी मोठ्या प्रमाणावर दिसतात. याउलट गायींना कोरड्या जंगलातील प्रदेश आवडतो. भारतात कोरडी जंगले आणि ओलसर नदी- खोऱ्यांचा भाग तेवढाच मोठा आहे. कोरड्या भागात गहू आणि ज्वारी-बाजरीची शेती होते, तर ओलसर भागात भात लागवड होते. त्यामुळे गायी आणि बैल हे भारतातील दोन वेगवेगळ्या परिसंस्थांचे प्रतीक मानले जातात. भटकंती करणारे लोक गायींबरोबर फिरतात, तर शेतकरी म्हशींशी जोडलेले असतात, कारण म्हशींना त्यांच्या पाणथळ अधिवासापासून दूर जाणे आवडत नाही.
भारतात बैलांचे खच्चीकरण केले जाते, त्यानंतर त्यांचा वापर गाड्या ओढण्यासाठी केला जातो आणि कठीण जमिनीची नांगरणी करण्यासाठी केला जातो. परंतु म्हशींच्या नरांचे खच्चीकरण करण्याची गरज नसते. त्यांना नाकातल्या कडीद्वारे नियंत्रणात ठेवता येते. काही म्हशींना ओझी वाहण्यासाठी आणि पाण्यात बुडालेल्या भातखाचरांची नांगरणी करण्यासाठीही वापरले जाते. भारतात बहुतेक लोक गायींकडे लक्ष देतात, पण म्हशींचे देशाच्या अर्थव्यवस्थेतले महत्त्व आणि विधी, कला व संस्कृतीतले योगदान आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.
हडप्पाकालीन मुद्रांवरही म्हैस/ रेडा

म्हशींची चित्रे हडप्पाकालीन मुद्रांवर आढळतात. या चित्रांच्या माध्यमातून त्या पाळीव होत्या हे समजते. सुमारे ४,५०० वर्षांपूर्वी त्या हडप्पा संस्कृतीचा भाग होत्या हे स्पष्ट होते. त्या नदीत वावरणार्‍या म्हशी होत्या. त्यांच्या दुधापासून दही, लोणी आणि तूप तयार केले जात होते. म्हशींचा वापर मांसासाठीही केला जात होता (आजही भारत म्हशींच्या मांसाचा मोठा निर्यातदार आहे), तर त्यांच्या हाडांचा वापर वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी केला जात होता.

प्रजननक्षमतेचे प्रतीक

प्रसिद्ध पशुपतिनाथाच्या मुद्रेवर म्हैस/रेडा आढळतो, म्हैस/रेडा समोर बसलेल्या त्या तपस्व्याकडे पाहत आहे, ज्याच्या डोक्यावर म्हशींची/रेड्याची शिंगे आहेत. इतर शिक्क्यांवरही म्हशींची शिंगे दिसतात, जी शक्ती आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक मानली जातात.

जैन आणि हिंदू पुराणकथांमधील म्हैस/रेडा

सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी ऋग्वेदात (४.१८.१३) सोमपानाने उत्साही झालेल्या बलाढ्य इंद्राची तुलना एका रानटी म्हशीशी करण्यात आली आहे. साधारण २,००० वर्षांपूर्वी तामिळ संगम साहित्यातील कुरुंतोकै (६५) या कवितेत, कमळाच्या तलावातील म्हशीची/रेड्याची तुलना अशिक्षित पुरुषाशी करण्यात आली आहे, त्या पुरुषाला त्याच्याशी विवाह करणार्‍या सुसंस्कृत मुलीचे महत्त्व कळत नाही. यावरून उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत भारतीय सांस्कृतिक कल्पनाशक्तीत म्हशीचे किती महत्त्वाचे स्थान होते हे स्पष्ट होते.

Cultural significance of buffaloes in India

महिष जातकाचे चित्रण अजिंठ्याच्या भित्तीचित्रांवर केलेलं आढळते. ही कथा एका सौम्य स्वभावाच्या म्हशीची आहे. एक खोडकर माकड या सध्या, सरळ स्वभावाच्या म्हशीला त्रास देत असतं. वृक्षदेवता किंवा यक्षाने तिला या त्रासदायक माकडाला धडा देण्याचं सुचवलं. परंतु, तिने तसं केल नाही. एकेदिवशी तिच्या जागी दुसरी म्हैस असते. परंतु, त्या दोन म्हशींमधला फरक माकडाला कळत नाही आणि तो नेहमी प्रमाणे म्हशीच्या खोड्या काढतो. परिणाम वेगळाच होतो. ती दुसरी म्हैस त्या माकडाला चिरडून टाकते.

जैन पुराणकथांमध्ये म्हैस ही १२ वे तीर्थंकर वसुपूज्य यांच्याशी संबंधित आहे. जैन यक्षी ज्वालामालिनीला म्हशीवर स्वार झालेली दाखवले जाते. एका कथेनुसार, ज्वालामालिनी आपल्या मागील जन्मात एक निष्ठावंत जैन होती. ती जैन साधूंना भोजन द्यायची, परंतु तिचा नवरा तिच्याशी वाईट वागत असे. त्यामुळे तिचा पुढचा जन्म यक्षी म्हणून झाला आणि ती त्या म्हशीवर स्वार होते. तिच्या नवर्‍याचा त्या म्हशीच्या रूपात जन्म झाला होता.

हिंदू पुराणकथांमध्ये म्हशीची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. ती यमराजाची, म्हणजे मृत्यूच्या देवतेची वाहन मानली जाते. म्हैस/रेडा महिषासुर या राक्षसाच्या रूपातही प्रसिद्ध आहे, महिषासुराचा वध बहुभुजा दुर्गा देवीने केला होता. या देवीने राक्षसाचा वध केलेली सर्वात जुनी प्रतिमा राजस्थानात सापडली असून तिचा कालखंड इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील आहे. कुशाण काळातील अनेक मातीच्या मूर्तींमध्ये देवीला नुसत्या हातांनी म्हशीचा वध करताना दाखवले आहे.

नंतरच्या काळात या प्रतिमा अधिक भव्य झाल्या. देवीला सिंहावर स्वार होऊन आपल्या पायांनी म्हशीला दाबून तिचा वध करताना दर्शवले जाते. अशा प्रतिमा गुप्त, चालुक्य आणि पल्लव मंदिरांमध्ये आढळतात. आता या प्रतिमा नवरात्रीच्या सणाचा अविभाज्य भाग आहेत. नवरात्र दरवर्षी शरद ऋतूमध्ये संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

लोकउत्सवांमध्ये म्हशीची बळी/बली

दख्खन भागातील अनेक लोकउत्सवांमध्ये तरुण रेड्याचा देवीला बळी दिला जातो. देवी प्रसन्न होण्यासाठी हा बळी दिला जातो. हा बळी मुलांचे वाघापासून संरक्षण करण्यासाठी दिला जातो. बलिदान दिल्यानंतर रेड्याचा एक पाय तोंडात ठेवून देवीसमोर सादर केला जातो. अशी प्रथा नेपाळमध्येही आढळते. त्याच वेळी, एक नवीन नर रेडा निवडला जातो आणि पुढील वर्षी देवीला अर्पण करण्यासाठी तो संपूर्ण वर्षभर पोसला जातो. अशा विधींमुळे भूमीची फलनक्षमता कायम राहते: जुने जीवन संपून नवीन जीवन सुरू होते, असे मानले जाते.

केरळमध्ये स्थानिक देव अय्यप्प, जो हर (शिव) आणि हरि (विष्णू) यांचा पुत्र मानला जातो, तो बहीण महिषीचा वध करतो. महाराष्ट्रात गावदेवीचा पती मानल्या जाणाऱ्या म्हसोबा या म्हशीच्या देवतेची पूजा केली जाते. असे दिसते की देवीचा रेड्यावर स्वार होणारा वर मारला जातो आणि ती बैलावर स्वार होणाऱ्या शिवाला पती म्हणून निवडते.

दख्खन भागातील अनेक लोकदेवतांचे तरुण पुजारी पोतराज किंवा buffalo king म्हणून ओळखले जातात. पोतराज देवीच्या सन्मानार्थ निघणाऱ्या मिरवणुकीचे नेतृत्व करतात. पोतराज हा चाबकांसह क्रूर योद्ध्याप्रमाणे शृंगार करतो आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणा भागात साजऱ्या होणाऱ्या बोनालू सारख्या उत्सवांत दिसतो. या व्यक्तीला कधी कालीचा पुत्र, कधी तिचा पती मानले जाते, तर तो स्वतःला तिचा सेवक म्हणतो.

विषयाशी संबंधित प्रश्न

  • हडप्पा कालखंडातील मुद्रांवर तसेच प्रसिद्ध पशुपती मुद्रेवर असलेले म्हशीचे चित्रण नेमकं काय सूचित करते?
  • जैन आणि हिंदू पुराणकथांमध्ये स्वरूप कसे आहे आणि त्यावरून भारताच्या सांस्कृतिक कल्पनेत म्हशींचे महत्त्व कसे दिसून येते?
  • हिंदू पुराणकथांमध्ये म्हशीचे चित्रण कसे बदलत गेले? बहुभुजा दुर्गा देवीने वध केलेल्या असुरापासून ते नवरात्रीपर्यंत म्हशीचे बदलत जाणारे स्वरूप कसे आहे?
  • दक्षिणेतील लोकपर्वांमध्ये दिला जाणारा म्हशीचा बळी हा सुपीकता आणि संरक्षणाविषयीच्या संकल्पनाचे कसे दर्शन घडवतो?
  • केरळमधील महिषीची कथा आणि महाराष्ट्रातील म्हसोबा यांची परंपरा म्हशीच्या चित्रणातील प्रादेशिक वैविध्य कसे दर्शवतात?