scorecardresearch

Premium

विश्लेषण : सॅम बँकमन-फ्राइड या अब्जाधीशाचा रावाचा रंक कसा झाला? काय आहे एफटीएक्स दिवाळखोरी प्रकरण?

‘अ‍ॅलामेडा रिसर्च’ नावाची क्रिप्टो हेज फंड कंपनी व ‘एफटीएक्स’ हा क्रिप्टो एक्स्चेंजचा सर्वेसर्वा आणि जगातील ३० वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेला सॅम बँकमन-फ्राईडला (एसबीएफ) दोषी ठरविण्यात आले.

FTX bankruptcy case
विश्लेषण : सॅम बँकमन-फ्राइड या अब्जाधीशाचा रावाचा रंक कसा झाला? काय आहे एफटीएक्स दिवाळखोरी प्रकरण? (image – REUTERS/Eduardo Munoz//File Photo)

‘अ‍ॅलामेडा रिसर्च’ नावाची क्रिप्टो हेज फंड कंपनी व ‘एफटीएक्स’ हा क्रिप्टो एक्स्चेंजचा सर्वेसर्वा आणि जगातील ३० वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेला सॅम बँकमन-फ्राईडला (एसबीएफ) दोषी ठरविण्यात आले. शिवाय ‘एफटीएक्स’ हा आभासी बाजारचलन मंच दिवाळखोर झाला. पण नेमके काय घडले आणि आभासी चलन जगतातील आघाडीचा ‘एफटीएक्स’ हा क्रिप्टो एक्स्चेंज कसा बुडीत निघाला त्याबाबत जाणून घेऊया.

एफटीएक्स काय आहे?

एफटीएक्स हे बहामा येथील क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज आहे. सॅम बँकमन-फ्राईड (एसबीएफ) याने २०१९ मध्ये त्याची स्थापना केली होती. त्यानंतर जगभर वेगाने प्रचार-प्रसार करून त्याने मोठी भांडवल उभारणीदेखील केली. तिचे ऑक्टोबर २०२१ मध्ये २५ अब्ज डॉलरचे मूल्यांकन होते. त्यानंतर सिंगापूरस्थित टेमासेक आणि अमेरिकी कंपनी टायगर ग्लोबलकडून निधी उभारणी केली. जानेवारी २०२२ मध्ये, जपानच्या सॉफ्टबँककडून निधी उभारणी केल्यावर तिचे एकत्रित मूल्यांकन ३२ अब्ज डॉलरपर्यंत वाढले होते.

Richest Females in the world
सर्वाधिक श्रीमंत महिला कोण? अब्जाधीश महिलांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक? जाणून घ्या!
nifty close at the highest points of 22126 in stock market
भांडवली बाजार पुन्हा तेजीवर स्वार; निफ्टीचा सर्वोच्च पातळीला स्पर्श
hong kong court orders china evergrande to liquidate
जगातील सर्वाधिक कर्जबाजारी बांधकाम कंपनी ‘एव्हरग्रांद’ची दिवाळखोरी; चीनच्या वित्तीय व्यवस्थेवर अस्थिरतेचे संकट
first liquor store to open in Saudi Arabia what is the reason of country to change its policies
विश्लेषण : सौदी अरेबियामध्ये सुरू होणार पहिले मद्यविक्रीचे दुकान… या देशाने धोरणांत बदल करण्याचे कारण?

हेही वाचा – विश्लेषण : हजरजबाबी तरी वादग्रस्त; महुआ मोईत्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू! संसदेत प्रश्न विचारणे का ठरतेय चर्चेत?

एफटीएक्स क्रिप्टो एक्स्चेंज दिवाळखोर कसे झाले?

जगात कायम पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले एफटीएक्स क्रिप्टो एक्स्चेंज दिवाळखोर होण्यामागे गैरव्यवहारांची मालिका असून, सॅम बँकमन-फ्राईडसह भारतीय वंशाचे निषाद सिंग त्यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. गुंतवणूकदारांचे सुमारे १० कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे ८,०५४ कोटी रुपये एक्स्चेंजमधून गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. एक्स्चेंजचे संस्थापक असलेले सॅम बँकमन याने कोणाचीही परवानगी न घेता ही रक्कम त्यांची दुसरी कंपनी असलेल्या अल्मेडा रिसर्चकडे वळती केली. यामध्ये त्याला कंपनीतील काही अधिकाऱ्यांनीदेखील मदत केली. एफटीएक्स एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम बँकमन-फ्राईड याच्यासह नऊ विशेष सहकाऱ्यांचा यात समावेश  होता.

बायनान्ससोबतची स्पर्धा नडली?

एफटीएक्सने मोठ्या प्रमाणावर विस्तार योजना आखली होती. त्यानुसार त्यांनी जगभरामध्ये विविध कंपन्यांशी करारदेखील केले. प्रचारासाठी त्यांनी अनेक खेळाच्या स्पर्धांमध्ये जाहिराती आणि प्रायोजकत्व दिले. शिवाय प्रतिस्पर्धी क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज असलेल्या बायनान्सला खाली खेचण्यासाठी त्यांनी काही खेळी खेळल्या. बायनान्सचा एफटीएक्समध्ये असलेला हिस्सा ‘बायबॅक’ करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. शिवाय तो खरेदी करताना एफटीएक्सची करन्सी असलेल्या एफटीटीमध्ये हा निधी देण्याचे ठरविण्यात आले. सुमारे १.३ अब्ज एफटीटीमध्ये हा व्यवहार पार पडला होता. मात्र त्यानंतर बायनान्सने तरलतेची गरज असल्याचे सांगत एफटीटीची विक्री केल्याने त्यावेळी त्याचे मूल्य मोठ्या प्रमाणावर गडगडले.

सॅम बँकमन-फ्राइडला (एसबीएफ) कोणत्या आरोपासाठी दोषी ठरवण्यात आले?

फ्राइड याला गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबरोबरच त्याने स्थापन आणि नेतृत्व केलेल्या एफटीएक्स या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या पतनासाठी दोषी ठरवण्यात आले. ‘एसबीएफ’वर अमेरिकेत खटला चालू होता. क्रिप्टो इंडस्ट्रीमधील हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा म्हणता येईल. गुंतवणूकदारांच्या फसवणुकीपासून अफरातफरीपर्यंतच्या सात वेगवगेळ्या गंभीर गुन्ह्यांअंतर्गत सॅम बँकमन-फ्राइडला दोषी ठरविण्यात आले आहे.

‘एसबीएफ’चा अचानक इतका ‘डाऊनफॉल’ कसा झाला?

‘एफटीएक्स’ या क्रिप्टो एक्स्चेंजवर दहा लाख वापरकर्ते उलाढाल करत होते. मात्र या ‘एफटीएक्स’च्या सॉफ्टवेअर कोडमध्ये घोटाळा करण्यात आला.  त्यामुळे एफटीएक्सद्वारे गुंतवणूक करणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांचा पैसा एसबीएफ स्वत:च्याच ‘अ‍ॅलामेडा रिसर्च’ या हेज फंडकडे वळवत होता. शिवाय हा निधी मनमानी पद्धतीने इतर ठिकाणी गुंतवत आणि खर्च करत होता. याचबरोबर ‘एसबीएफ’ने स्वत:चा कॅसिनो सुरू करून त्यात ग्राहकांच्या पैशाने स्वत:च जुगारासाठी पैसे लावत होता. ‘एफटीएक्स’च्या युजर्सचे एकूण आठ अब्ज डॉलर (सुमारे ६४० अब्ज रुपये) हे अशा रीतीने एसबीएफने ‘अ‍ॅलामेडा’कडे गुप्तपणे वळवले. ग्राहकांनी ज्यावेळी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा ते परत करण्यास असमर्थता दर्शवली. याबाबत मात्र हा सगळा नजरचुकीने झालेला गोंधळ असल्याचे स्पष्टीकरण एसबीएफने दिले.

हेही वाचा – विश्लेषण: यंदाच्या साखर हंगामापुढील आव्हाने काय?

‘एसबीएफ’ने काय उधळपट्टी केली?

‘एसबीएफ’ने अमेरिकन फुटबॉलमधील सुपरस्टार टॉम ब्रॅडी, विनोदी कलाकार लॅरी डेव्हिड, बास्केटबॉलमधील दादा खेळाडू स्टीफन करी अशा तगड्या लोकांचा अतिशय कल्पक पद्धतीने जाहिरातींसाठी उपयोग करून घेतला. त्याबदल्यात त्यांना लाखो डॉलरचे मानधनदेखील देण्यात आले. सुमारे १३५ दशलक्ष डॉलरचा करार करून अमेरिकन बास्केटबॉल क्लब मायामी हीट यांच्या मैदानाला ‘एफटीएक्स अरिना’ नाव देण्यात आले. अशा उधळपट्टीच्या माध्यमातून तो लोकांना एफटीएक्स एक्स्चेंज वापरून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात यशस्वी झाला. याचबरोबर त्याने अमेरिकी निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात फंडिंग करून वॉशिंग्टनमध्ये क्रिप्टोसंबंधी लॉबिंग करत होता. ‘एसबीएफ’ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांचे सुमारे २५ कोटी डॉलर खर्च करून बहामाज बेटांमध्ये ३५ मालमत्ता विकत घेतल्या.

‘एसबीएफ’चा याबाबत बचाव काय होता?

स्वत:च्या बचावात साक्ष देताना, ‘एसबीएफ’ने एफटीएक्सच्या ग्राहकांची फसवणूक करण्याचा किंवा निधी चोरण्याचा हेतू नसल्याचे सांगितले. त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, अल्मेडाला एफटीएक्सच्या वापरकर्त्यांकडून निधी उधार घेण्याची परवानगी होती. गेल्या वर्षीच अटक केलेल्या  ‘एसबीएफ’ने जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण, ‘जेन स्ट्रीट कॅपिटल’ या प्रतिष्ठित गुंतवणूक फर्ममध्ये नोकरी, स्वत:ची ‘अ‍ॅलामेडा रिसर्च’ नावाची क्रिप्टो हेज फंड कंपनी व ‘एफटीएक्स’ हा क्रिप्टो एक्स्चेंज सुरू केला होता. मात्र त्याच्या गलथान व्यवस्थापनामुळे रावाचा रंक झाला. आधीच जगाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि दीर्घ मंदीच्या गर्तेत असलेल्या कूटचलन आणि तिच्या भवितव्यासंबंधी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास यातून नक्कीच डळमळीत झाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is a ftx bankruptcy case sam bankman fried convicted print exp ssb

First published on: 06-11-2023 at 08:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×