अनिश पाटील

इस्लामिक स्टेट ऑफ इराक ॲण्ड सीरिया (आयसिस) या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ट्रामाडॉल’च्या सुमारे साडेदहा लाख गोळ्यांची तस्करी नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी मुंबई सीमाशुल्क विभागाने बंगळूरु येथील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह तिघांना अटक केली. आरोपीने ‘टॅमोल-एक्स-२२५’ या कॅल्शियम कार्बोनेटच्या गोळ्या असल्याचे दाखवून फायटर ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निर्यात होण्यापूर्वीच सीमाशुल्क विभागाने गोळ्या जप्त केल्या. साडेपाच कोटी रुपयांच्या या गोळ्या जप्त केल्यानंतर या प्रकरणी बंगळूरु व मुंबई येथे शोधमोहीम राबवण्यात आली होती. जगभरातील विविध देशांनी प्रतिबंधित केलेल्या ‘ट्रामाडॉल’ या गोळ्यांना काळ्याबाजारात प्रचंड मागणी आहे.

Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
Seawoods construction blast
सीवूड्समध्ये बांधकाम प्रकल्पातील नियंत्रित स्फोट बंद करण्याची पालिकेची सूचना, अन्यत्र ठिकाणी मात्र दुर्लक्ष
South Mumbai
आमचा प्रश्न – दक्षिण मुंबई : जर्जर इमारती, चिंचोळ्या गल्ल्या अन् अरूंद रस्ते

‘ट्रामाडॉल’ची तस्करी कशी उघडकीस आली?

मुंबईतील सहार एअर कार्गो संकुल परिसरातून सीमाशुल्क विभागाने निर्यात करण्यापूर्वी संशयित गोळ्या जप्त केल्या होत्या. दक्षिण सुदान येथील जुबा येथे मेसर्स फर्स्ट वेल्थ सोल्युशन्समार्फत या गोळ्या पाठवल्या जात होत्या, असे तपासात उघड झाले. कागदपत्रानुसार टॅमोल-एक्स-२२५ च्या साडेदहा लाख गोळ्यांची २१ पाकिटे असल्याचे जाहीर करण्यात आले होते. गोळ्यांबाबत चुकीची माहिती दिल्याचे लक्षात आल्यावर सीमाशुल्क विभागाने कारवाई केली. जप्त केलेल्या गोळ्यांची किंमत साडेपाच कोटी रुपये आहे. तपासणीसाठी गोळ्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या. त्यात या गोळ्या ‘ट्रामाडॉल’च्या असल्याचे स्पष्ट झाले. या गोळ्या जप्त केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले. चौकशीत गुडीपती सुब्रह्मण्यम याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने त्याला अटक केली. आर्थिक फायद्यासाठी तो हे करत होता. यापूर्वीही त्याने ट्रामाडॉलची परदेशात तस्करी केल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी बंगळूरु व मुंबईत शोधमोहीम राबवून आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

याला आयसिसचे ‘फायटर ड्रग’ का म्हणतात ?

युद्धात जखमी झाल्यानंतर वेदना मारून लढत राहता यावे, यासाठी आयसिसचे दहशतवादी ‘ट्रॅमाडॉल’ घेत असत. त्यामुळे या गोळ्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया अर्थात आयसिसमध्ये ‘फायटर ड्रग’ म्हणून प्रचलित आहेत. जागतिक दहशतवादी संघटना असलेली आयसिस जगभरातील स्रोतांकडून या गोळ्या मागवत होती. या गोळ्यांचा नशेसाठीही वापर होत असल्यामुळे जवळपास सर्वच देशांत त्यावर बंदी आहे. भारतातही एप्रिल, २०१८मध्ये या गोळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. जगभरात या गोळ्यांच्या विक्रीवर निर्बंध लादण्यात आल्यामुळे या गोळ्यांचा तुडवडा निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांचे भाव अनेक पटींनी वाढले.

भारतातून या गोळ्यांची तस्करी का होते?

जगभरातील विविध देशांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. २०१७मध्ये अनेक देशांनी ट्रामाडॉल या गोळ्यांवर बंदी घातली असली तरी तेव्हा भारतात गोळ्यांवर बंदी नव्हती. किमतीपेक्षा तीन ते चार पटींनी अधिक पैसे देऊन भारतातून या गोळ्या मागवल्या जात असत. त्याचा मोठा साठा आयसिस या दहशवादी संघटनेकडून मागवला जात असल्याच्या चर्चा आहेत. २०१८मध्ये भारतानेही गोळ्या प्रतिबंधित केल्यानंतर गोळ्यांचा भाव दसपट वाढला आणि तस्करी कमी होण्याऐवजी उलट वाढली. भारतातील विविध यंत्रणांनी मिळून २०१७-१८ या वर्षात ट्रामाडॉलच्या सात कोटी गोळ्या जप्त केल्या. त्यानंतरही छुप्या मार्गाने या गोळ्या परदेशात पाठवण्याचे उद्योग सुरूच आहेत.

ट्रामाडॉलची निर्मिती करणाऱ्यांवर काय कारवाई झाली?

मुंबईतून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात होत असल्यामुळे इतर गोळ्यांच्या नावाने ट्रॉमाडॉलच्या गोळ्या इथूनच छुप्या मार्गाने परदेशांत पाठवल्या जातात. मुंबई परिसरातील औद्यागिक क्षेत्रांमध्येच अवैधरीत्या त्यांचे उत्पादन केले जाते. यापूर्वी मुंबई व परिसरातून मोठ्या प्रमाणात ट्रामाडॉलचा साठा जप्त करण्यात आला होता. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या पथकाने पालघर येथील एका कारखान्यावर तसेच नवी मुंबईतील द्रोणागिरी परिसरातील एका गोदामावर छापे टाकून सहा कोटी १६ लाख ४१ हजार गोळ्या जप्त केल्या होत्या. या गोळ्या प्रथम आफ्रिका खंडातील देशांत, तेथून आखाती देशांत पाठवण्यात येणार होत्या. चार वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी चौघांना अटक करून सुमारे दोन लाख गोळ्या जप्त केल्या होत्या. २०१८ मध्ये एका कारवाईत एक लाख ३० हजार गोळ्यांचा साठा हस्तगत करण्यात आला होता.