scorecardresearch

Premium

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून वापरलेला ‘पनवती’ शब्दाचा अर्थ काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनवती असे संबोधल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. या शब्दाची उत्पत्ती ज्योतिषशास्त्रात आहे, हे तुम्हाला माहितीये का? कोणत्या देवीवरून पनवती हा शब्द निर्माण झाला?

What is panauti
पनवती म्हणजे काय? हा शब्द कधी वापरला जातो? (Photo – Wikimedia Commons)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ‘खिसेकापू’ आणि ‘पनवती’ अशा शब्दांचा वापर केल्यानंतर राजकीय वाद उफाळून आला. निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. २३ नोव्हेंबर) राहुल गांधी यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली. राजस्थानमध्ये प्रचार करत असताना राहुल गांधी यांनी हे दोन्ही शब्द वापरले होते. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी राजस्थानच्या बायतू येथील सभेत बोलताना म्हटले, “पनवती…
पनवती… आमचे खेळाडू तिथे चांगले जिंकणार होते, पण पनवतीमुळे त्यांचा पराभव झाला. टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, पण जनतेला सर्व माहीत आहे.”

निवडणूक आयोगाने राहुल गांधींना पाठविलेल्या नोटिशीत म्हटले की, लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ नुसार “पनवती” या शब्दाचा वापर भ्रष्ट प्रथेच्या व्याख्येत येतो. तसेच या शब्दांचा वापर करून एखाद्या व्यक्तीची मतदारांच्या नजरेत अध्यात्मिक निंदा करण्याचा प्रयत्न आहे.

mamta banerjee on sandeshkhali violence
संदेशखाली हिंसाचारामुळे ममतांचा तृणमूल काँग्रेस पक्ष अडचणीत, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
syama prasad mookerjee
”३७० जागा जिंकणं श्यामाप्रसाद मुखर्जींना श्रद्धांजली”; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
Mallikarjun Kharge
राज्यसभेतील मोदींच्या भाषणावर मल्लिकार्जुन खरगेंचं चोख प्रत्युत्तर; सांगितला NDA चा फुल फॉर्म!
pandit jawaharlal nehru
विश्लेषण : पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी भारतीयांना कमी लेखत होते? पंतप्रधान मोदींनी नेमकं कोणत्या भाषणांचा उल्लेख केला?

हे वाचा >> “२०१४ ला देशाला लागलेली पनवती २०२४ ला दूर होणार आहे, भाजपाने…”, संजय राऊत यांचा टोला

पनवती हा शब्द अशुभ चिन्ह या अर्थाने वापरला जातो. एखाद्या संकटाच्या प्रसंगी किंवा वाईट घटनेसाठी किंवा व्यक्तीसाठी हा शब्द सहसा वापरला जातो. पण, या शब्दाची उत्पत्ती ज्योतिषशास्त्रात आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? पनवती किंवा पनौती ही संकटाची देवी असल्याचे म्हटले जाते, याबद्दल घेतलेला हा आढावा.

ज्योतिषशास्त्रानुसार पनवती म्हणजे काय?

द इंडियन एक्स्प्रेसने आपल्या लेखात दिलेल्या माहितीनुसार, शनीच्या हालचालीमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील वाईट काळ दर्शविण्यासाठी पनवती शब्द वापरला जातो. वैदिक ज्योतिशास्त्रात एखाद्या व्यक्तीची रास ही त्याच्या जन्माच्या वेळी चंद्राच्या स्थानावरून निश्चित केली जाते. माणसाचा जन्म झाला तेव्हा चंद्र ज्या राशीत असतो, ती त्या माणसाची रास ठरत असते. जेव्हा शनी एखाद्या राशीमध्ये विशिष्ट हालचाल करतो, तेव्हा त्या राशीच्या व्यक्तीचा पनवती किंवा साडे साती काळ सुरू असल्याचे म्हटले जाते.

डॉ. दीपकभाई ज्योतिषाचार्य हे गुजरातच्या वापीमध्ये पराशर ज्योतिशालय चालवितात. त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, साडे साती किंवा मोठी पनवती यामध्ये अडीच वर्षांच्या तीन कालावधींचा समावेश असतो. जन्म राशीच्या किंवा चंद्र राशीच्या बाराव्या स्थानात शनीचा प्रवेश झाल्यानंतर त्या राशीला साडे साती सुरू झाली, असे म्हटले जाते. शनी जेव्हा व्यक्तीच्या जन्म राशीमधून जातो, तेव्हा साडे सातीचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे म्हटले जाते आणि शनीने दुसऱ्या राशीत प्रवेश करताना साडे सातीचा तिसरा टप्पा असल्याचे मानले जाते.

जेव्हा शनीचे मार्गक्रमण व्यक्तीच्या जन्म राशीपासून चौथ्या किंवा आठव्या राशीत होते, तेव्हा त्या वेळेला ढैय्या किंवा छोटी पनवती असे म्हटले जाते. या काळाला दुर्दैवाचा छोटा फेरा असे म्हटले जाते. जो अडीच वर्षांचा असतो.

हे वाचा >> ‘पनवती’ शब्दाचा संबंध मोदींशी का जोडता? पटोलेंचा भाजपाला सवाल, म्हणाले..

पनवती शब्दाचा वापर कसा केला जातो?

सध्या पनवती शब्द अगदी सहजपणे वापरला जातो. कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही प्रसंगात किंवा एखाद्या कठीण प्रसंगासाठी पनवती शब्द वापरण्याची पद्धत सुरू झाली आहे. दीपकभाई ज्योतिषाचार्य यांनी बडोद्याच्या एमएस विद्यापीठातून फलज्योतिष विषयात पीएचडी संपादन केली आहे. त्यांनी सांगितले की, शनी हा शिक्षा किंवा वाईट वेळ आणत नाही, तर एखाद्या व्यक्तीने या जन्मात किंवा मागच्या जन्मात केलेल्या चुकीच्या कामांसाठी तो न्याय करतो. दीपकभाईंनी पुराणातील एका आख्यायिकेचा दाखला दिला. ते म्हणाले, “सूर्यदेव शनीचे वडील आहेत. एकदा त्यांचे सूर्यदेवाशी भांडण झाले आणि त्यानंतर शनीदेव यांनी घर सोडले. त्यानंतर शनीने महादेवाची तपश्चर्या केली आणि जे लोक चुकीचे काम करतात, त्यांच्याशी न्याय करण्याचे वरदान शनीने मागितले. शनीच्या तपश्चर्येनंतर महादेवाने शनीला इच्छित असलेले वरदान दिले.” त्यामुळेच जेव्हा एखाद्याला शनीच्या प्रभावाचे दुष्परिणाम जाणवतात, तेव्हा खरे तर त्यांची अध्यात्मिक पत स्वच्छ होत असते.

पनवतीचे भौतिक स्वरुप आहे का?

संकटाच्या देवीला पनवती किंवा पनौतीच्या स्वरुपात ओळखले जाते. साडे साती किंवा पनवतीच्या प्रभावाखाली असलेले लोक भगवान हनुमानाचा धावा करतात आणि भगवान हनुमान त्यांना या त्रासापासून मुक्त करतो, असे मानले जाते. काही मंदिरांमध्ये पनवती ही हनुमानाच्या पायाखाली चिरडलेली दिसते. गुजरातमधील सारंगपूर येथे असलेल्या हनुमान मंदिरात याचे दृश्य दिसते.

राजकोट येथील ज्योतिषी कौशिक त्रिवेदी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, पनवती जन्म ब्रह्माच्या कल्पनेतून झाला. हिंदू पौराणिक कथानुसार तिला संकटाची देवी असे म्हटले जाते. त्रिवेदी यांनी पुढे म्हटले, “प्रत्येक माणसाच्या आयुष्यात साडे सात वर्षांच्या अंतराने पनवती तीन वेळा येते. पनवती व्यक्तीचे हृदय, मेंदू आणि पायांवर आघात करते, ज्यामुळे व्यक्तीची भावना, निर्णयक्षमता आणि गतिशीलता प्रभावित होते.”

त्रिवेदी यांच्या म्हणण्यानुसार कठीण काळातून बाहेर येण्यासाठी भगवान हनुमान मदत करतात. “शनी हा सूर्यदेवाचा पुत्र आहे आणि हनुमान सूर्यदेवाचा शिष्य आहे. हनुमानाची आराधना करणाऱ्या व्यक्तीचे शनी आणि पनवतीच्या प्रभावापासून रक्षण होईल, असा आशीर्वाद सूर्यदेवाने हनुमानाला दिला आहे”, अशी पौराणिक आख्यायिका असल्याचे त्रिवेदी यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is panauti the word used by rahul gandhi for pm narendra modi kvg

First published on: 24-11-2023 at 15:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×