– सुशांत मोरे
रेल्वे भरती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. नवीन वर्षातही रेल्वे भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले असून बिहार, उत्तर प्रदेशमध्ये परीक्षार्थींनी भरती प्रक्रियेतीतील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक सध्या या दोन राज्यात दिसत आहे. देशभरात २०१९ मध्ये रेल्वेच्या विविध ३५ हजार २८१ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले. प्रत्यक्षात परीक्षा आणि निकाल जाहीर होण्यासाठी चार वर्षे लागली. या निमित्ताने रेल्वेची भरती होते कशी, त्याची प्रक्रिया काय, सध्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भरती प्रक्रियेवरून होणारा गोंधळ यावर सविस्तर चर्चा होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

रेल्वेत नोकरी मिळवण्याचे तीन मार्ग कोणते?
देशात सर्वात मोठी कर्मचारी संख्या असलेली सरकारी आस्थापना म्हणजे भारतीय रेल्वे आहे. या रेल्वेत नोकरी मिळवण्याचे तीन मार्ग आहेत. यात पहिला मार्ग म्हणजे देशपातळीवर संघ लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेणाऱ्या सिव्हिल सर्विस आणि इंजिनियरिंग सर्विसच्या माध्यमातून रेल्वे सेवेत येता येते. या परीक्षेच्या माध्यमातून रेल्वे सेवेकरीता निवड झालेल्या उमेदवारांना राजपत्रित क्लास वन दर्जाचे अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येते. दुसरा मार्ग म्हणजे रेल्वे भरती मंडळाच्या (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड-आरआरबी) माध्यमातून भारतीय रेल्वेत नोकरी. या माध्यमातून क वर्गात तांत्रिक (टेक्निकल) आणि बिगरतांत्रिक (नाॅन टेक्निकल) प्रकारच्या विविध पदांकरीता कर्मचारी व पर्यवेक्षक म्हणून भरती प्रक्रिया राबवली जाते. क वर्गातून निवड झालेले उमेदवार रेल्वेत दाखल होऊ शकतात. तर प्रत्येक रेल्वे विभागाच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या माध्यमातून होणारी नोकर भरती हा तिसरा मार्ग आहे. यातून निवड झालेले उमेदवार पूर्वीच्या ड प्रवर्गातील विविध पदांसाठी निवडले जातात.

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

किती व कोणती पदे बोर्डाकडून भरली जातात?
देशभरातील वेगवेगळ्या भागांत रेल्वे भरती करण्यासाठी २१ ठिकाणी रेल्वे भरती बोर्ड स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, अहमदाबाद, अजमेर, अलाहाबाद, बेंगळुरु, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंडीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू, कोलकता, मालदा, मुझफ्फरपूर, रांची, सिंकदराबाद, सिलिगुडी व तिरुअनंतपुरम यांचा समावेश आहे. बिगरतांत्रिक (नाॅन टेक्निकल) वर्गात आरक्षण कारकून, तिकीट तपासनीस, लघुलेखक (हिंदी व इंग्लिश), राजभाषा सहाय्यक, प्रचार निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक, वाहतूक निरीक्षक, गार्ड, लेखा कारकून, स्टाॅक व्हेरिफायर, शिक्षक, विधि सहायक, लेखा सहाय्यक, तर तांत्रिक (टेक्निकल) प्रवर्गात प्लंबर, वायरमन, पेंटर, सहाय्यक लोको पायलट, कनिष्ठ अभियंता, सेक्शन अभियंता, छायाचित्रकार, एक्सरे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, रेल्वे रुग्णालय परिचारिका, फार्मासिस्ट इत्यादी विविध प्रकारची भरती रेल्वे भरती बोर्डाकडून केली जाते.

रेल्वे भरतीचा गोंधळ सुरूच?
रेल्वे बोर्डाकडून फेब्रुवारी २०१९ मध्ये देशभरात अतांत्रिक श्रेणीतील स्टेशन मास्तर, गार्ड, वरिष्ठ वाणिज्य कारकून, कनिष्ठ लेखाखाते सहाय्यक इत्यादीची भरती करण्याचा निर्णय घेतला. ३५ हजार २८१ पदांसाठीची अधिसूचना जारी केली. नियमानुसार रिक्त जागांच्या २० टक्के अधिक उमेदवारांना स्तर दोन परीक्षेसाठी निवडण्याचा निर्णय घेतला. २०१५ पर्यंत हेच प्रमाण दहा टक्के होते. त्यानंतर हे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. २०१९ मध्ये २० टक्के करण्यात आले. बिगरतांत्रिक श्रेणीतील काही पदांसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतो. तर काही पदांसाठी पदवीधर असणे गरजेचे आहे. परंतु पदवीधर उमेदवाराला बारावी पास श्रेणीतील पदांसाठी अर्ज करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे रेल्वे भरती बोर्डाचे म्हणणे आहे. त्यामुळे पदवीधर उमेदवार सर्व पदांसाठी अर्ज करू शकतो. परंतु यासह अन्य मुद्द्यांवरून सध्या बिहार, उत्तर प्रदेश आणि देशभरातील काही भागांत रेल्वे भरती परीक्षांर्थींमध्ये गोंधळ सुरू झाला आणि त्यांनी वर्षानुवर्षे होत असलेल्या भरती प्रक्रियेतील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. रेल्वे भरतीतील अतांत्रिक श्रेणीतील ३५ हजार २८१ पदांसाठी १ कोटी २५ लाख अर्ज आले. यातील ७ लाख ५ हजार ४६६ उमेदवारांना म्हणजेच २० टक्के उमेदवारांना परीक्षेसाठी निवडण्यात आले. अनेक उमेदवारांनी एकहून अधिक पदांसाठी अर्ज केले होते आणि इथूनच गोंधळाला सुरुवात झाली. रेल्वेची भरती प्रक्रिया गोंधळ, अनियमितता आणि आंदोलन काही नवीन नाही. रेल्वेच्या भरतीविरोधात स्थानिकांना डावलले जाते आणि परप्रांतियांची भरती होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातही राजकीय पक्षांनी यापूर्वी आंदोलने केली आहेत.

भरती प्रक्रियेवर उमेदवारांचे आक्षेप का?
अतांत्रिक श्रेणीतील काही पदांसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतो. तर काही पदांसाठी पदवीधर असणे गरजेचे आहे. परंतु पदवीधर उमेदवाराला बारावी पास श्रेणीतील पदांसाठी अर्ज करण्यापासून रोखण्यात यावे. ज्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी निवडण्यात आले नाही, त्यांनी यासह अन्य काही आक्षेप नोंदवून जोरदार विरोध प्रदर्शन केले आहे. रिक्त जागांच्या २० टक्के अधिक उमेदवारांनाच टप्पा दोन परीक्षेसाठी निवडण्याचा घेण्यात आलेला निर्णयही चुकीचा असून ज्या उमेदवारांनी एकाहून अधिक पदासाठी अर्ज केले आहेत, त्यांचा केवळ एकाच पदासाठीचा विचार करण्यात यावा, त्यामुळे सर्वांना संधी मिळेल हेदेखील आक्षेपाचे आणि आंदोलनाचे प्रमुख कारण ठरले आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ही १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी रेल्वेच्या भरती प्रक्रियेच्या नियमावर आक्षेप घेत रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेविरोधात उत्तर प्रदेश व बिहारमध्ये उमेदवारांकडून जोरदार विरोध प्रदर्शन केले जात आहे.

भरती प्रक्रियेच्या विलंबावरही बोट?
फेब्रुवारी २०१९ मध्ये देशभरातील ३५ हजार २८१ पदांसाठी रेल्वे भरती बोर्डकडून अधिसूचना काढण्यात आली. परंतु त्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाली नाही. २०२०मध्ये पहिल्या टप्प्यातील परीक्षा पार पडली आणि २०२२मध्ये पहिल्या टप्प्यात घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला. तीन वर्षे भरती प्रक्रिया सुरूच असल्याने त्यावरही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. देशभरातील विविध प्रकारच्या होणाऱ्या निवडणुका, त्यांचे मतदान, निकाल याचे नियोजन होत असतानाच रेल्वे भरतीच्या परीक्षेलाच विलंब का, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. करोनामुळे ही भरती रखडल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. परंतु या भरतीसाठी आलेले अर्ज आणि त्यातून घेतलेली परीक्षा, निवड यामुळे विलंब झाल्याचे कारण रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. यूपीएससी, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांसाठी आठ ते दहा लाख अर्ज येतात. परंतु रेल्वेच्या भरतीसाठी एक कोटी २५ लाख अर्ज आले. त्यातून परीक्षेसाठी केलेली निवड व अन्य प्रक्रिया पारदर्शकपणे पुढे नेताना विलंब झाल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

समितीवरच बोळवण?
परीक्षांर्थीच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे त्यांच्याकडून अहवल दिला जाईल. तसेच या परीक्षेच्या नियमावलीसंदर्भात ज्या उमेदवारांना आक्षेप आहेत, त्यांनी आपल्या तक्रारी, सूचना २८ जानेवारी, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला त्या-त्या क्षेत्रीय रेल्वेच्या भरती बोर्डाकडे सादर करण्यास सांगितले आहे.

रेल्वेतील नोकरीसाठी प्रतिसाद का?
रेल्वेकडून केल्या जाणाऱ्या भरतीलाच नेहमी भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतो. नियमित वेतन, अन्य भत्ते, सुरक्षेची हमी आणि रेल्वेच्या नोकरीचे आकर्षण. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरतीची घोषणा होताच त्यात संधी मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात अर्ज केले जातात. यात देशभरात सर्वाधिक उत्तर प्रदेश, बिहारमधूनच नोकरीसाठी अर्ज करण्यात आघाडी आहे. या दोन्ही राज्यांत रेल्वे भरतीसाठी तयारी करून घेणाऱ्या खासगी शिकवण्यांचे मोठे जाळे आहे. त्यामुळेच अर्ज करणाऱ्यांची संख्याही महाराष्ट्र, गुजरातपेक्षा अधिक आहे. शिवाय त्या भागात बेरोजगारीही अधिक असल्याने रेल्वेची भरती होताच त्वरित त्यासाठी अर्ज केले जातात. रेल्वे भरती मंडळाने २०१९ च्या आधीही २०१८ मध्ये २ लाख ८३ हजार ७४७ रिक्त जागांसाठी परीक्षा घेतली. त्यातून १ लाख ३२ हजार पदे भरण्यात आली. त्यावेळीही उत्तर प्रदेश, बिहारमधूनच अर्जाची संख्या जास्त होती. आता अतांत्रिक पदांच्या ३५ हजार २८१ जागांसाठी सव्वा कोटी अर्ज आले आणि रेल्वेची ही भरती या कारणांवरूनही चर्चेत आली.