Who is Sofia Qureshi and Vyomika Singh: पहलगाम इथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ६ मेच्या रात्री पाकिस्तानच्या पीओजेकेवरील ९ दहशतवादी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. साधारण २५ मिनिटांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आणि त्याचं कारणही तसंच होतं. पहलगाममधील या हल्ल्यात पुरूषांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यांच्यासोबत असलेल्या अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले. या महिलांचा आक्रोश संपूर्ण जगाने पाहिला होता. याच कारणाने या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे, भारतीय लष्कराने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी या ऑपरेशनबाबत माहिती दिली आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी लष्कराने केलेल्या या कारवाईबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे. ही कारवाई कुठे, कशी पार पाडली गेली याची सविस्तर माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांबाबत जाणून घेऊ…
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी…
कर्तबगार अधिकारी अशी कर्नल सोफिया कुरेशी यांची ओळख आहे. सोफिया यांचं लहानपणापासूनच वायुसेनेत दाखल होण्याचं स्वप्न होतं. त्या मूळच्या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहेत. बायो-केमिस्ट्री या विषयात त्यांनी पदवी घेतली आहे. १९९९ मध्ये चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून सोफिया यांची भारतीय लष्करात प्रवेश केला. सर्वात उल्लेखनीय म्हणजे बहुराष्ट्रीय लष्करी सराव फोर्स-१८ मध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. पुण्यात झालेल्या फील्ड ट्रेनिंग सरावात सहभागी झालेल्या १७ देशांमधील तुकड्यांमध्ये त्या एकमेव महिला प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी ४० सदस्यांच्या भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. सोफिया कुरेशी यांनी २००६ मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही काम केले आहे. सोफिया यांचे आजोबा सैन्यात होते आणि त्यांचे पतीदेखील मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमधील लष्करी अधिकारी आहेत.
विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत?
विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा हवाई दलातील प्रवास त्यांच्या लहानपणीच्या स्वप्नापासूनच सुरू झाला होता. सिंग नॅशनल कॅडेट कॉर्प्स अर्थात एनसीसी उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. सशस्त्र दलात सामील होणाऱ्या व्योमिका या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या सदस्य आहेत. १८ डिसेंबर २०१९ रोजी त्या फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी कार्यरत झाल्या.
संवेदनशील आणि अतिजोखमीच्या परिसरात काम करण्याचा अनुभव असलेल्या त्या पायलट आहेत. त्यांनी २५०० हून अधिक तास उड्डाण केले आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येसह काही कठीण भूभागात त्यांनी चेतक आणि चीता यासारखी हेलिकॉप्टर्स चालवली आहेत. त्यांनी अनेक बचाव मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये अरूणाचल प्रदेशातील मोहिमेचे त्यांनी नेतृत्व केले होते. हे ऑपरेशन उंचावर, कठीण हवामानात आणि दुर्गम ठिकाणी करण्यात आले. अशा भागांमध्ये जीव वाचवण्यासाठी हवाई मदत अत्यंत महत्त्वाची ठरते.
ऑपरेशनचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त सिंग यांनी अनेक आव्हानात्मक भूमिकांमध्ये सशस्त्र दलांचे प्रतिनिधित्वही केले आहे. २०२१ मध्ये २१ हजार ६५० फूट उंचीवर असलेल्या माउंट मणिरंग इथे त्या महिला गिर्यारोहण मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. अशा विविध मोहिमांमधील त्यांचा सहभाग भारतातील विविध क्षेत्रांत महिला नेतृत्वाचा वाढता सहभाग दर्शवितो. आज झालेल्या पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सशस्त्र दलाद्वारे हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आहे. नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करत उद्ध्वस्त करण्यात आले.”