जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक असलेल्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) एका भव्य लष्करी परेडची तयारी सुरू केली आहे. येत्या ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या परेडमध्ये नवीन क्षेपणास्त्रे, ड्रोन तसेच इतर अत्याधुनिक स्वदेशी शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन केलं जाणार आहे. चीनच्या या वाढत्या लष्करी क्षमतेवर भारतासह अमेरिका आणि जगभरातील इतर देशांचं बारकाईनं लक्ष आहे. बुधवारी (२० ऑगस्ट) बीजिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या जॉइंट स्टाफ डिपार्टमेंटचे उपसंचालक मेजर जनरल वू झेके यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, चीनकडून लष्करी परेडची तयारी का केली जात आहे? भारताशेजारील या देशाकडे कोणकोणती अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आहेत? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

चीन लष्करी परेड का घेत आहे?

चीन आपल्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त ही भव्य लष्करी परेड आयोजित करत आहे. चीनच्या इतिहासात या दिवसाला मोठे महत्त्व आहे. १९३१ मध्ये चीनवर हल्ला करणाऱ्या जपानी साम्राज्याच्या शरणागतीनंतरच दुसरे महायुद्ध संपले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती शी जिनपिंग तियानानमेन स्क्वेअर येथे उपस्थित राहणार आहेत. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनादेखील कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. १ सप्टेंबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक होणार आहे. या बैठकीला हजर असलेले इतर देशांतील नेतेही कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी माहिती चिनी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

२०१९ मध्येही चिनी सैन्याची झाली होती परेड

२०१९ च्या राष्ट्रीय दिनाच्या लष्करी परेडमध्ये चीनने आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकलसह मध्यम-श्रेणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि पहिले पाण्याखालील ड्रोन सादर केले होते. गेल्या आठवड्यात चिनी सैन्याने बीजिंगमध्ये सराव केला होता. यादरम्यान चीनच्या लष्करी ताकदीची झलक पाहायला मिळाली, ज्यामध्ये नवीन हायपरसोनिक क्षेपणास्त्रे व ड्रोनचा समावेश होता. तर इतर लष्करी सामग्री मोठ्या ताडपत्रीने झाकलेली होती. मेजर जनरल वू यांच्या माहितीनुसार- यंदाच्या परेडमध्ये चिनी सैन्यातील नवीन रणगाडे तसेच जमिनीवर, समुद्रात आणि हवेत वापरली जाणारी क्षेपणास्त्रांची झलक दाखवली जाणार आहे.

आणखी वाचा : अमेरिकेचा भारताविरोधी डाव, पाकिस्तानशी वाढवली जवळीक; पण शेवट निराशेतच होणार?

चिनी अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

पीपल्स लिबरेशन आर्मीतील सेंट्रल थिएटर कमांडच्या परेड कमांड ऑफिसचे कार्यकारी उपसंचालक मेजर जनरल झू गुइझोंग यांनी अलीकडील एका पत्रकार परिषदेत सांगितले की- या परेडमध्ये १०,००० हून अधिक सैनिक आणि १०० पेक्षा अधिक विमाने सहभागी होतील. तसेच इतर १०० वेगवेगळ्या उपकरणांचा समावेश असेल. अलीकडेच ऑनलाइन प्रसारित झालेल्या काही फोटो आणि व्हिडीओंमधून चीनकडील काही अत्याधुनिक शस्त्रांची झलक पाहायला मिळाली आहे, ज्यामध्ये नवीन पिढीचे रणगाडे, पाण्याखालील आणि जमिनीवरील वाहनांचा समावेश होता.

चीनकडे कोणकोणती अत्याधुनिक क्षेपणास्त्र?

चीनच्या ३ सप्टेंबरच्या लष्करी परेडमध्ये ‘ईगल स्ट्राइक’ मालिकेतील नवीन क्षेपणास्त्रे सहभागी होण्याची शक्यता आहे. ही क्षेपणास्त्रे जहाजे किंवा विमानांमधून सहजपणे डागता येतात. चिनी सैन्याच्या सरावादरम्यान, ‘ईगल स्ट्राइक’ क्षेपणास्त्रांसह तीन हायपरसोनिक क्षेपणास्त्रे- ‘YJ-17’, ‘YJ-19’ आणि ‘YJ-20’ देखील दिसून आली. ‘न्यूजवीक’च्या वृत्तानुसार- ‘YJ-15’ एक सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असून ते आवाजाच्या वेगापेक्षा अधिक म्हणजे सुमारे ७६८ मैल प्रतितास वेगाने उडते. तर YJ-17 आणि YJ-19 ही क्षेपणास्त्रे आवाजाच्या वेगाच्या पाच पटीने अधिक वेगाने उडण्यास सक्षम आहेत आणि उड्डाणादरम्यान ते आपली दिशाही बदलू शकतात, त्यामुळे त्यांना रोखणे अत्यंत कठीण मानले जाते. परेडच्या सरावादरम्यान चिनी सैन्यांकडे एक नवीन ‘ट्रान्सपोर्टर-इरेक्टर-लॉन्चर’ वाहन दिसले. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार- ही एक नवीन आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे.

चीनकडून कोणती शस्त्रे प्रदर्शित केली जातील?

चीनच्या लष्करी परेडमध्ये फक्त जमिनीवरील शस्त्रेच नव्हे, तर समुद्रातील अत्याधुनिक ड्रोन आणि नवीन पिढीचे रणगाडेदेखील सादर केले जाणार आहेत. ‘नेव्हल न्यूज’ या नौदल तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रकाशन संस्थेनुसार- चिनी सैन्याच्या सरावादरम्यान त्यांच्याकडे सर्वात प्रगत रणगाडे, पाणबुड्या, सक्रिय संरक्षण प्रणाली, लेसर शस्त्र आणि हवाई संरक्षण तोफ यांसारखी शस्त्रास्त्रे दिसून आली. चीनकडील नवीन पाणबुड्या साधारणपणे ६० फूट लांबीच्या आहेत. आकाराने लहान व वजनाने हलक्या असलेल्या या पाणबुड्या शत्रूंची नजर चुकवून अगदी सहजपणे त्यांच्यावर हल्ला करू शकतात.

China weapons military parade news
यंदाच्या परेडमध्ये चिनी सैन्यातील नवीन रणगाडे तसेच जमिनीवर, समुद्रात आणि हवेत वापरली जाणारी क्षेपणास्त्रांची झलक दाखवली जाणार आहे.

चीनकडे अत्याधुनिक लढाऊ विमानं आणि ड्रोन

चीनच्या लष्करी परेडच्या सरावादरम्यान अत्याधुनिक लढाऊ विमानं व काही ड्रोन्स दिसून आली. संरक्षण तज्ज्ञांच्या मते- ही विमानं चीनच्या ‘FH-97’ किंवा ‘Feihong-97’ लढाऊ विमानांसारखीच आहेत, तर ‘लॉयल विंगमॅन’ हे ड्रोन युद्धावेळी पायलटला मदत देण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. गुप्त माहिती गोळा करणे व युद्धात मदत करणे यांसारखी कामे हे ड्रोन करू शकतात. ‘लॉयल विंगमॅन’ ड्रोनचा उद्देश पायलटचा ताण कमी करणे आणि मानवी जीवाला असलेला धोका कमी करणे हा आहे. अमेरिकेचे ‘XQ-58A’ हे ड्रोन २०२९ पर्यंत युद्ध-सज्ज होण्याची अपेक्षा आहे. चिनी तज्ज्ञ अँड्रियास रूप्रेचट यांच्या मते- चीनच्या परेडच्या सरावाने त्यांच्या अपेक्षांनाही मागे टाकलं आहे. चिनी सैन्याने केलेला परेडचा सराव अपेक्षेपेक्षा खूपच चांगला होता असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७० मिनिटांच्या परेडमध्ये चीन आपली सर्वात आधुनिक शस्त्रे जगाला दाखवण्यासाठी सज्ज आहे. चिनी सैन्याचं हे प्रदर्शन त्यांच्या प्रतिस्पर्धी देशांसाठी चिंतेचं ठरू शकतं, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला धक्का बसणार? चीनचं स्टेबलकॉइन्स आहे तरी काय?

चीन तयार करणार जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य?

चीन जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य तयार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. यासाठी त्यांनी आपल्या लष्करी रचनेत मोठे बदल केले आहेत. चीनने आपल्या सर्व लष्करी भागांना पाच ‘थिएटर कमांड’मध्ये विभागलं आहे. यापैकी भारताच्या सीमेला लागून तैनात असलेल्या लष्करी तुकडीचे नाव ‘वेस्टर्न थिएटर कमांड’ आहे. या कमांडमध्ये चीनचे लष्कर व वायुदल एकाच वेळी तैनात आहेत. १९८० पासून चीनने आपल्या सैन्याचं आधुनिकीकरण सुरू केलं होतं. जागतिक दर्जाचे सैन्य तयार करण्यासाठी शी जिनपिंग यांनी २०१५ मध्ये दोन मोठे बदल केले. पहिला बदल ‘ऑर्गनायझेशनल, कमांड आणि कंट्रोल रिफॉर्म’ होता. याआधी चीनच्या लष्करात ‘पीएलए आर्मी, पीएलए नेव्ही, पीएलए एअरफोर्स आणि रॉकेट फोर्स’ या चारच मुख्य सेना होत्या. ‘ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स २०२५’ नुसार- अमेरिका आणि रशियानंतर चीनकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. चीनकडे २,०३५,००० सैनिक, ३,३०९ विमाने, ६,८०० रणगाडे, ३,४९० ‘सेल्फ-प्रोपेल्ड आर्टिलरी’ व २,७५० ‘मोबाईल रॉकेट प्रोजेक्टर’ आहेत.