PM Modi Honors Rajendra Chola I at Gangaikonda Cholapuram: आधुनिक कालखंडातील एखादा पंतप्रधान, एखाद्या प्राचीन मंदिराला भेट देतो आणि प्राचीन काळातील एका सामर्थ्यवान सम्राटाला अभिवादन करतो, त्यावेळेस इतिहास पुन्हा जिवंत झाला आहे, असं मानलं जातं. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत, आज रविवार हा त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. रविवार, २७ जुलै रोजी त्यांनी गंगईकोंडा चोलपुरम येथील बृहदीश्वर मंदिराला भेट दिली, तसेच राजेंद्र चोल पहिला यांच्या जयंती सोहळ्यात ते सहभागीही झाले. त्याच पार्श्वभूमीवर नेमका हा प्राचीन सम्राट कोण होता आणि २०२५ मध्ये त्याची इतक्या थाटामाटात त्याची जयंती का साजरी केली जात आहे, या प्रश्नाचा घेतलेला हा आढावा.

सम्राट अशोकाच्या शिलालेखात उल्लेख

चोल हा दक्षिण भारतातील एक प्राचीन सुप्रसिद्ध वंश आहे. अशोकाच्या शिलालेखात चोलांचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख आहे. इसवी सनाच्या ९ व्या शतकात राजराज चोल याच्या कालखंडात चोलांना पुन्हा ऊर्जितावस्था आली. राजराजाने चेर व पांड्य राजांचा पराभव केला, मालदीव बेट जिंकले आणि श्रीलंकेवर स्वारी करून त्यांचा उत्तर भाग व्यापला. त्याने वेंगीच्या सिंहासनावर आपला हस्तक शक्तिवर्मा याला बसवून तेथेही आपली सत्ता स्थापन केली.

चोल साम्राज्याचा पाया रचला

राजराज चोल याने राज्यकारभारात व जमाबंदी खात्यांत सुधारणा घडवून आणल्या. एकंदरीत त्याने पुढील चोल साम्राज्याचा पक्का पाया घातला. त्याने कित्येक भव्य मंदिरे बांधली. तंजावरचे राजराजेश्वर (सध्याचे बृहदीश्वर) मंदिर त्या कालखंडातील स्थापत्य व शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यानंतर त्याचा उत्तराधिकारी राजेंद्र चोल हा गादीवर आला.

राजेंद्र चोल पहिला कोण होता?

राजेंद्र चोल पहिला (इ.स. १०१४–१०४४) हा फक्त एक राजा नव्हता, तर एक अशी शक्ती होती ज्याने चोल साम्राज्याच्या सीमा समुद्रापलीकडे विस्तारल्या. राजराज चोल पहिला यांचा पुत्र असलेल्या राजेंद्राने सिंहासनावर बसताच महत्त्वाकांक्षी समुद्री लष्करी मोहीम हाती घेतली. राजेंद्राने उत्तरेत गंगेपर्यंत आणि आजच्या मलेशियातील केदाहपर्यंत मजल मारली. या विजयामुळे त्याला गंगईकोंडन (गंगा जिंकणारा) आणि केदारमकोंडन (केदाह जिंकणारा) ही बिरुदे मिळाली. परंतु, त्याचे कौशल्य फक्त रणांगणापुरते मर्यादित नव्हते. त्याने गंगईकोंडा चोलपुरम ही आपली राजधानी स्थापन केली. भव्य मंदिर बांधले. तब्बल २५० वर्षांहून अधिक काळ हे राजधानीचे शहर तमिळ संस्कृती, शैव धर्म, कला आणि प्रशासनाचे केंद्र म्हणून बहरत होते.

पंतप्रधान मोदी मंदिरात

रविवारी पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने या युनेस्को वारसा स्थळावर पोहोचले. त्यांचे पूर्णकुंभाने स्वागत करण्यात आले. मंदिर प्रांगणात ओदुवरांनी गायलेल्या तिरुमुराईतील थेवरम स्तोत्रांनी वातावरण दुमदुमले. पंतप्रधानांनी राजेंद्र चोल पहिल्याच्या स्मरणार्थ नाणे आणि थेवरम गीतेवरील पुस्तिका प्रकाशित केली. त्यामुळे प्राचीन तमिळ भक्ती साहित्य आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल, अशी आशा आहे.

सांस्कृतिक संदेश

पंतप्रधान मोदी यांची ही भेट केवळ राजकीय नसून सांस्कृतिक संदेश म्हणूनही त्याकडे पाहिले जात आहे. ही भेट तमिळ गौरव आणि भारताच्या प्राचीन साम्राज्यांच्या वैभवाशी सुसंगत आहे. यावर्षीच्या कार्यक्रमात राजेंद्र चोलाच्या आग्नेय आशियातील समुद्री मोहिमेला १,००० वर्षे पूर्ण होत असल्याचे आणि चोल साम्राज्याच्या स्थापत्य वैभवाचे प्रतीक असलेल्या गंगईकोंडा चोलपुरम मंदिराच्या बांधकामाच्या प्रारंभाचे स्मरण केले जात आहे.

शैव भक्तीगीतांनी स्वागत

२३ जुलैला सुरू झालेल्या आदी तिरुवातिरै महोत्सवाचा भव्य समारोप आज रविवारी, २७ जुलैला होत आहे. शिवाचार्य आणि ओथुवमूर्ती (शैव आगमग्रंथात प्रशिक्षित आध्यात्मिक गुरु) यांनी शैव भक्तिगीते गाऊन पंतप्रधानांचे उत्साहाने स्वागत केले. या प्रसंगी गंगईकोंडा चोलपुरम परिसर सुंदर सजवण्यात आला होता. मंदिरापर्यंत जाणाऱ्या हिरव्या कमानी फुलांनी नटलेल्या होत्या, तर संपूर्ण परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजेंद्र चोल यास अभिवंदना

राजेंद्र चोल पहिला या भूमीवरून चालत गेला, त्याला हजार वर्षे उलटली असतील, पण त्याची परंपरा आजही मंदिरांच्या गाभाऱ्यात, इतिहासाच्या पानांमध्ये आणि आता राष्ट्रीय बातम्यांमध्येही घुमत आहे. बृहदीश्वर मंदिराच्या उंच शिखराखाली उभे असताना पंतप्रधान मोदी यांची ही कृती केवळ एक राजकीय संकेत नव्हता, तर भारताच्या व्यापक आणि अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या सांस्कृतिक गाभ्याला वाहिलेली अभिवंदना म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.