जंगलाचा राजा म्हणून दिमाखात मिरवणाऱ्या सिंहाची ‘बार्बरी’ ही प्रजाती मात्र जंगलातून नामशेष झाली आहे. हे सिंह हाताच्या बोटावर मोजण्याइतके उरले आहेत, तेही प्राणिसंग्रहालयात. यातल्या एका जोडीला नुकतीच चार पिल्ले झाली. त्या पिल्लांना पुन्हा जंगलात सोडायचे का, ते जंगलात गेले तर शिकार करून आपली प्रजाती टिकवणार का, यावर आता खल सुरू झाला आहे.
बार्बरी सिंहांच्या पिल्लांचा जन्म महत्त्वाचा का?
चेक प्रजासत्ताकातील एका प्राणीसंग्रहालयात नुकतीच चार बार्बरी जातीच्या सिंहांची चार पिल्ले जन्माला आली. बार्बरी जातीचे सिंह जंगलातून नामशेष झालेले आहेत. म्हणूनच या चार पिल्लांचा जन्म हा दुर्मीळ सिंहाच्या उरलेल्या संख्येसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. चारपैकी तीन मादी तर एक नर सिंह आहे. द्वूर क्रालोवे प्राणीसंग्रहालयात — खलीला आणि बार्ट — या जोडीने या पिलांना जन्म दिला. नामशेष प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय संवर्धन कार्यक्रमाचा भाग म्हणून ही पिल्ले इस्रायलमधील प्राणिसंग्रहालयात पाठवली जाणार आहेत.
बार्बरी सिंहांचे वास्तव्य कुठे होते?
बार्बरी सिंह हे पँथेरा लिओ लिओ या सिंहाच्या उपप्रजातीतला म्हणून ओळखले जायचे. त्याला उत्तर आफ्रिकन सिंह, ॲटलस सिंह आणि इजिप्शियन सिंह असेही म्हटले जात असे. हे सिंह मोरोक्को ते इजिप्तपर्यंतच्या भागात आढळत. ते उत्तर आफ्रिकेतील उत्तर आफ्रिकेतील अॅटलास पर्वत, मगरेबच्या पर्वत आणि वाळवंटात राहत होते.
हे सिंह नामशेष का झाले?
१९व्या शतकातील शिकारींच्या अहवालांमध्ये, बार्बरी सिंह हा सर्वात मोठा सिंह असल्याचा दावा करण्यात आला होता, ज्याचे वन्य नरांचे वजन २७० ते ३०० किलो (६०० ते ६६० पौंड) पर्यंत होते. सिंहांना मारण्यासाठी बंदुका आणि बक्षिसांचा प्रसार झाल्यानंतर या प्रजातीची लोकसंख्या हळूहळू घटू लागली. शिकार आणि या सिंहांना प्रत्यक्ष पाहिल्याच्या नोंदींचा व्यापक आढावा घेतल्यावर असे दिसून आले की अल्जीरियामध्ये १९६० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत आणि मोरोक्कोमध्ये १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सिंहांचे छोटे गट अस्तित्वात होते. आज, या प्रदेशात ते नामशेष झाले आहेत. शक्तीचे प्रतीक असलेल्या या बार्बरी सिंहांचे जंगलातील अस्तित्व मानवामुळे संपुष्टात आले. रोमन काळात अनेक सिंह ग्लॅडिएटर्सकडून मारले गेले, तर अतिरिक्त शिकार आणि अधिवासाचा नाश यामुळे ते नंतर नामशेष होण्यास हातभार लागला.
अखेरचे छायाचित्र १०० वर्षांपूर्वीचे…
या जंगली सिंहाचे शेवटचे ज्ञात छायाचित्र १९२५ मध्ये काढण्यात आले होता. मार्सेलिन फ्लँड्रिन यांनी अॅटलास पर्वतांमध्ये हे बार्बरी सिंहाचे छायाचित्र काढले होते. असे मानले जाते की १९६० च्या दशकाच्या मध्यात जंगलातील उरलेली अल्प संख्या संपुष्टात आली. सध्या या सिंहांची संख्या जगात अवघी २०० हून कमी आहे आणि जे आहेत ते प्राणिसंग्रहालयातच आहेत.
हे सिंह पुन्हा जंगलात जाणार का?
द्वूर क्रालोवे प्राणिसंग्रहालयाचे उपसंचालक जारोस्लाव ह्यायानेक यांनी सांगितले की, बार्बरी सिंहांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा आणण्याच्या दृष्टीने प्राथमिक पावले उचलण्यात आली आहेत. पण हे प्रयत्न प्रत्यक्षात येण्यास अजून बराच पल्ला गाठायचा आहे. या वर्षीच्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला मोरोक्कोमध्ये एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अॅटलास पर्वतांतील एखाद्या राष्ट्रीय उद्यानात असा कार्यक्रम राबवायचा की नाही याचा निर्णय या परिषदेत घेतला जाईल. हे सिंह अनेक वर्षे बंदिस्त आहेत. त्यांना जंगलातील अधिवासाची सवयच नाही. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी, तसेच त्यांच्या शिकारीसाठी पुरेशा संख्येने प्राणी जंगलात असणे, स्थानिक समुदायांचे सहकार्य, परवागन्या आदी अनेक टप्प्यांमधून ही योजना पुढे जाईल, त्यानंतर या सिंहांना जंगलाची वाट मोकळी होईल.