स्वस्तिक हे चिन्ह हिंदू धर्मियांसाठी पवित्र. पण अॅडॉल्फ हिटलरच्या नाझी राजवटीने आर्य वर्चस्ववादातून हे प्रतीक बदनाम केले. त्यामुळे युरोपातून ते सर्वस्वी हद्दपार झाले. अपवाद फिनलंडचा. अमेरिकी प्रभावाखालील ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ (नाटो) या लष्करी संघटनेत दोन वर्षांपूर्वी फिनलंडचा अधिकृत प्रवेश झाला. आता नाटोचा भाग असल्याने फिनिश हवाई दलाच्या काही तुकड्यांच्या ध्वजावर असलेले निळे स्वस्तिक काढून टाकण्यात येत आहे. नाटो सदस्यत्वानंतर पाश्चात्य मित्रराष्ट्रांशी एकात्मता वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ध्वजावरील स्वस्तिक काढून टाकण्याचा नेमका उद्देश काय, याबाबत…
फिनलंडच्या हवाई दलाचा निर्णय
फिनलंड हवाई दलाच्या काही तुकड्यांच्या ध्वजांवर पांढऱ्या पार्श्वभूमीवर निळे स्वस्तिक चिन्ह आहे. स्वस्तिक चिन्हाचा संबंध नाझी जर्मनीशी येतो. ॲडॉल्फ हिटलरच्या नाझी पक्षाने वापरलेले हे चिन्ह द्वेष आणि विध्वंसाचे प्रतीक बनले. मात्र १९१८ पासून विविध फिनिश हवाई दलाच्या तुकड्यांच्या ध्वजांवर निळे स्वस्तिक असून त्याचा नाझी जर्मनीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असे फिनलंडच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र नाटो सदस्यत्वानंतर पाश्चात्त्य मित्र राष्ट्रांशी एकात्मता वाढण्याच्या उद्देशाने हे चिन्ह हटवण्याचा आणि या ध्वजांमध्ये बदल करण्याचा निर्णय फिनलंड सरकारने घेतला आहे.
हा निर्णय घेण्यामागे नेमके कारण काय?
स्वस्तिक हे एक प्राचीन प्रतीक आहे आणि फिनलंडच्या हवाई दलाने नाझी जर्मनीच्या जन्माच्या अनेक वर्षांपूर्वी ते वापरण्यास सुरुवात केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बदल सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी हवाई दल कमांडच्या युनिट चिन्हावरून स्वस्तिकचा लोगो शांतपणे काढून टाकण्यात आला होता. परंतु काही फिनिश हवाई दलाच्या ध्वजांवर स्वस्तिक चिन्ह अजूनही आहे, ज्यामुळे नाटो सहयोगी, पर्यटक आणि लष्करी कार्यक्रमांमध्ये ते पाहणारे इतर परदेशी लोक आश्चर्यचकित होतात. ‘‘आपण या ध्वजासह पुढे जाऊ शकलो असतो, परंतु कधीकधी परदेशी पाहुण्यांबरोबर विचित्र परिस्थिती उद्भवू शकते. काळाबरोबर जगणे शहाणपणाचे ठरू शकते,’’ असे मत फिनलंडच्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. हवाई दलाच्या युनिटच्या ध्वजांचे नूतनीकरण करण्याची योजना २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती, ज्या वर्षी फिनलंड नाटोमध्ये सामील झाला होता. नाटो सदस्यांसाठी वाईट देखावा निर्माण होऊ नये, हवाई दलाची सध्याची ओळख चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्यासाठी ध्वजांवरील चिन्हांचे अद्यावतीकरण करणे हा यामागील उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
फिनलंड हवाई दलाच्या ध्वजांवर स्वस्तिक
फिनलंड हा ईशान्य युरोपातील स्कँडिनेव्हियन देशांपैकी एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश. मात्र या देशावर शतकाहून अधिक काळ रशियन राजवट होती. रशियन राजवटीनंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९१८ मध्ये या देशाने स्वस्तिक चिन्ह स्वीकारले आणि अनेक ध्वजांवर त्याचा वापर करण्यात आला. फिनलंडच्या हवाई दलाने १९१८ ते १९४५ पर्यंत त्यांच्या सर्व विमानांवर राष्ट्रीय चिन्ह म्हणून पांढऱ्या पृष्ठभागावर निळ्या स्वस्तिक चिन्हाचा वापर केला. दुसऱ्या महायुद्धानंतर काही हवाई दलाच्या युनिट ध्वजांवर आणि सजावटींवर तसेच हवाई दल अकादमीच्या चिन्हांवर कित्येक दशके ही प्रतिमा कायम राहिली. पण आता फिनलंडच्या नाटोशी एकीकरणानंतर जर्मनी, नेदरलँड्स आणि फ्रान्ससारख्या देशांच्या सैन्याशी अधिक एकरूप होण्याची गरज आहे. त्यामुळे स्वस्तिक हे नकारात्मक प्रतीक काढून टाकण्याचा निर्णय धोरणकर्त्यांनी घेतला आहे.
नाझी जर्मनीशी संबंध नसल्याचा दावा…
फिनलंडच्या हवाई दलात वापरल्या जाणाऱ्या स्वस्तिकांचा नाझी स्वस्तिकशी काहीही संबंध नाही, असे हेलसिंकी विद्यापीठातील जागतिक राजकारणाचे प्राध्यापक तेवो तेवनेन यांचे मत आहे. स्वस्तिकचा इतिहास सांगणारे तेवनेन यांचे नवे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. स्वस्तिक हे प्राचीन उत्पत्तीचे प्रतीक असून हिटलरच्या नाझी ध्वजाचा केंद्रबिंदू बनण्यापूर्वी विविध संस्कृतीमध्ये त्याचा वापर केला जात असे. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून स्वस्तिक चिन्ह वापरले जाते. फिनलंड हवाई दलाच्या ध्वजांवर नाझी जर्मनीच्या जन्मापूर्वी स्वस्तिकचा वापर केला जात असल्याचा दावा आहे. मात्र नाझींचे चिन्ह म्हणून आंतरराष्ट्रीय संदर्भात विध्वंसाचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जात असल्याने हे चिन्ह काढून टाकण्यात येत आहे.
sandeep.nalawade@expressindia.com