China Develops Pregnancy Robot : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्या मानवी जीवन अधिक सुलभ आणि स्मार्ट होत आहे. स्वयंचलित उपकरणे व कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडताना दिसून येत आहे. आतापर्यंत तुम्ही विज्ञानाचे अनेक आविष्कार पाहिले असतील, पण रोबोट्सच्या मदतीने कधी एखाद्या बाळाचा जन्म झाल्याचं ऐकलं किंवा वाचलं आहे का? ही बाब एखाद्या चित्रपटातील कथेसारखी वाटत असली तरी चीनमध्ये हा आविष्कार घडणार आहे. जगातील पहिला ‘प्रेग्नन्सी रोबो’ तयार करण्यासाठी चीनचे शास्त्र प्रयत्न करीत आहेत. हा रोबो एका कृत्रिम गर्भाशयात बाळाला वाढवून त्याला जन्म देऊ शकतो, असा दावा चिनी शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, नेमका कसा असेला हा रोबो? तो नऊ महिने बाळाला कसं वाढवणार? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

‘चोसन बिझ’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चिनी शास्त्रज्ञ जगातील पहिला ‘प्रेग्नन्सी रोबो’ तयार करीत आहेत. हा एक मानवासारखा दिसणारा रोबो असून, त्याच्या शरीरात एक कृत्रिम गर्भाशय बसवण्यात आले आहे. या गर्भाशयात तो बाळाला वाढवू शकतो आणि नंतर त्याला जन्म देऊ शकतो. या रोबोमध्ये एक विशेष प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे एका नळीच्या मदतीने गर्भाला आवश्यक पोषक तत्वे पुरवली जातात. भविष्यात हा रोबो मानवी गर्भधारणेप्रमाणे पूर्ण नऊ महिने गर्भाला आपल्या कृत्रिम गर्भाशयात वाढवू शकेल आणि नंतर बाळाला जन्म देऊ शकेल, असा दावा चिनी शास्त्रज्ञांनी केला आहे.

रोबो आई होणार?

आज एआय आपला सहकारी किंवा मित्र म्हणून काम करत असला तरी भविष्यात तो ‘आई’ची भूमिकाही निभावेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे संशोधन यशस्वी झाले तर विज्ञान आणि मानवी जीवनात हे एक मोठे पाऊल ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, या तंत्रज्ञानामुळे विज्ञान आणि नैतिकता यावर नवीन वादविवाद सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या चीनमधील शास्त्रज्ञ हा रोबो तयार करण्यासाठी वेगाने काम करीत असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा : China Hangor to Pakistan: चीन- पाकिस्तानची भारताविरुद्ध नवीन खेळी; हँगोर पाणबुड्या भारतासाठी आव्हान ठरणार?

‘प्रेग्नन्सी रोबो’ कसा काम करेल?

चीनमधील ग्वांगझू येथील ‘काइवा टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे संस्थापक डॉ. झांग किफेंग यांनी या ‘प्रेग्नन्सी रोबो’ची संकल्पना मांडली आहे. सर्व काही योजनेनुसार चालले तर पुढील वर्षी या रोबोचा प्रोटोटाइप म्हणजेच नमुना सादर केला जाणार आहे. डॉ. झांग यांच्या कल्पनेनुसार, हा रोबो फक्त इन्क्युबेटर नसून अगदी मानवासारखा दिसणारा आहे, जो गर्भधारणेपासून ते बाळाला जन्म देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया करू शकतो. ‘चोसन बिझ’ या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. किफेंग म्हणाले की, कृत्रिम गर्भाशय तंत्रज्ञान आधीच प्रगत अवस्थेत आहे. आता ते रोबोटच्या पोटात बसवण्याची गरज आहे, जेणेकरून एक सामान्य व्यक्ती आणि रोबो यांच्यात संवाद साधून गर्भधारणा शक्य होईल आणि गर्भाला आतमध्ये वाढता येईल.

नैसर्गिक गर्भधारणेत अडचण असलेल्यांना दिलासा?

  • सध्याच्या काळात ज्या दाम्पत्यांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करण्यात अडचणी आहेत, त्यांच्यासाठी हा रोबोट मोठी संधी ठरू शकतो.
  • या मानवरूपी रोबोटचा प्रोटोटाईप पुढील वर्षी विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, त्याची किंमत सुमारे एक लाख युआन (सुमारे १२ लाख रुपये) असेल.
  • डॉ. झांग यांनी स्पष्ट केलंय की, ही संकल्पना पूर्णपणे नवीन नाही. यापूर्वी केलेल्या प्रयोगांमध्ये शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम गर्भाशय तयार केले होते.
  • एका प्लास्टिकच्या पिशवीसारख्या दिसणाऱ्या या तंत्रज्ञानाला ‘बायोबॅग’ असं नाव देण्यात आलं.
  • या बायोबॅगमध्ये शास्त्रज्ञांनी अकाली जन्मलेल्या मेंढीच्या कोकरांना अनेक आठवडे जिवंत ठेवले होते.
  • विशेष बाब म्हणजे- या बायोबॅगने गर्भाला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे आणि रक्ताचा पुरवठा केला.
  • या बायोबॅगमध्ये संरक्षणासाठी अॅम्निओटिक फ्लुइड असल्यामुळे आईच्या शरीराबाहेरही कोकरांची वाढ सुरूच राहिली.
pregnancy robot china
चिनी शास्त्रज्ञ जगातील पहिला ‘प्रेग्नन्सी रोबो’ तयार करीत आहेत. (छायाचित्र एआय)

‘प्रेग्नन्सी रोबो’वरील नैतिक वादविवाद

चीनमध्ये सुरू असलेले ‘प्रेग्नन्सी रोबो’चे संशोधन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूपच आकर्षक असले तरी त्यामुळे कायदेशीर आणि नैतिक वादविवाद सुरू झाले आहेत. या तंत्रज्ञानाचे समर्थक व विरोधक दोन्ही बाजूंकडून वेगवेगळी मते मांडत आहेत. या तंत्रज्ञानाचे समर्थन करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, हे रोबो भविष्यातील वैद्यकीय सेवा आणि कौटुंबिक जीवनात क्रांती घडवून आणू शकतात. चीनसारख्या देशासाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहे, जिथे वंध्यत्वाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २००७ मध्ये हे प्रमाण ११.९ टक्के होते, जे २०२० पर्यंत १८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ज्या जोडप्यांना पारंपरिक उपचारांनी गर्भधारणा होत नाही, त्यांच्यासाठी ‘प्रेग्नन्सी रोबो’ एक आशेचा किरण आहे. सोशल मीडियावरही अनेक वापरकर्त्यांनी या मताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा : संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊ नका; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा, प्रकरण काय?

‘प्रेग्नन्सी रोबो’वर अनेकांचं प्रश्नचिन्ह

दुसरीकडे, या तंत्रज्ञानावर टीका करणारे लोक अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करीत आहेत. गर्भाला आईच्या प्रेमळ स्पर्शापासून वंचित ठेवणे क्रूर आणि अनैसर्गिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रक्रियेसाठी अंडी (eggs) कोठून आणली जातील असा प्रश्नही ते विचारत आहेत. प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका अँड्रिया ड्वर्किन यांनी अशा तंत्रज्ञानाबद्दल आधीच धोक्याची सूचना दिली होती. त्यांना भीती होती की, यामुळे महिलांचे आई होण्याचे अधिकार हिरावले जाऊ शकतात. २०१२ मध्ये त्यांनी लिहिले होते, “महिलांकडे पुरुषांना संपवण्याची ताकद आहे, पण त्यांनी आपल्या सामूहिक शहाणपणाने त्यांना जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. आता खरा प्रश्न हा आहे की, एकदा कृत्रिम गर्भाशय परिपूर्ण झाले की पुरुष महिलांना त्यांच्यासोबत ठेवू इच्छितील का?”

२०२२ मध्ये तज्ज्ञांनी काय इशारा दिला होता?

२०२२ मध्ये चिल्ड्रन्स हॉस्पिटल, फिलाडेल्फिया येथील संशोधकांनीही याबाबत इशारा दिला होता. कृत्रिम गर्भाशयामुळे नैसर्गिक गर्भधारणा ही एक वैद्यकीय समस्या म्हणून पाहिली जाईल, ज्यामुळे एक नैसर्गिक प्रक्रिया केवळ अभियांत्रिकी प्रक्रियेसारखी होईल, असं ते म्हणाले होते. या सर्व चिंता असूनही चिनी संशोधकांनी ‘प्रेग्नन्सी रोबो’ची कल्पना अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. ग्वांगडोंग प्रांतात या रोबोच्या नैतिक आणि कायदेशीर परिणामांविषयी चर्चा सुरू आहे. या संदर्भात औपचारिक प्रस्तावदेखील सादर करण्यात आले असून, धोरण आणि कायद्याच्या चर्चेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.