प्राचीन इजिप्शियन फॅरो रामेसेस दुसरा याच्या विशाल शिल्पकृतीचा शिराकडील भाग पुरातत्वशास्त्रज्ञांना अलीकडेच सापडला. उपलब्ध माहितीनुसार, हे अवशेष कैरोच्या दक्षिणेस सुमारे १५५ मैल (२५० किलोमीटर) अंतरावर असलेल्या हर्मोपोलिस (आधुनिक काळातील अल-अशमुनेन) या प्राचीन शहराच्या परिसरात सापडले आहेत. या शिल्पकृतीचे हरवलेले अवशेष सुमारे १२.५ फूट (३.८ मीटर) उंचावर सापडले असून ही शिल्पकृती इसवी सनपूर्व १२७९-१२१३ या कालखंडात राज्य करणाऱ्या रामसेस दुसरा याची असल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे. या शिल्पकृतीच्या डोक्यावर असलेला मुकुट दुहेरी असून आणि त्यावर कोरलेला शाही नाग हे या मुकूटाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, असा तपशील इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालयाने जारी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?

या शिल्पकृतीची मागील बाजू चित्रलिपींनी सुशोभित केलेली आहे. रामसेस दुसरा याच्या पदव्यांचा तपशील या चित्रलिपीमध्ये आढळतो. विशेष म्हणजे पूर्वी सापडलेला या शिल्पकृतीच्या धडाचा भाग १९३० साली जर्मन पुरातत्वशास्त्रज्ञ गुंथर रोडर यांनी शोधला होता. रामसेस दुसरा याच्या कारकीर्दीत अनेक विशाल शिल्पकृती घडविण्यात आल्या. यात दक्षिण इजिप्तमधील अबू सिंबेल मधील सुमारे ६६ फूट (२० मीटर) उंच असलेल्या काही शिल्पकृतीचा समावेश होतो. शिल्पकृतीचा शिराकडील भाग उघड करणारे उत्खनन इजिप्शियन-अमेरिकन टीमने केले, या उत्खननाचे नेतृत्व इजिप्शियन पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाचे पुरातत्वशास्त्रज्ञ बासेम गेहाड आणि कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील क्लासिक्सचे सहाय्यक प्राध्यापक यवोना त्रन्का-अम्रेन यांनी केले होते. रामसेस दुसरा याच्या हरवलेल्या शिल्पकृतीच्या शोधामुळे इजिप्तच्या इतिहासातील अनेक अनभिज्ञ पैलू समोर येण्यास मदत होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर रामसेस दुसरा नक्की कोण होता? त्याची इतिहासातील नेमकी भूमिका काय होती? या विषयी जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.

रामसेस दुसरा इतका प्रसिद्ध का आहे?

रामसेस दुसरा प्राचीन इजिप्तच्या महान फेरोंपैकी एक प्रसिद्ध फेरो आहे. त्याची लष्करी आणि सांस्कृतिक कामगिरी लक्षणीय होती. त्याला स्मारके आणि मंदिरे बांधण्याचा छंद होता.

रामसेस द ग्रेट

संपूर्ण जगाला ज्या संस्कृतीच्या इतिहासाचे आकर्षण वाटते, ती संस्कृती म्हणजे ‘इजिप्तची संस्कृती’. मोठ मोठाले पिरॅमिड, त्यांच्या आतील दफनं अशा एक ना अनेक रंजक गोष्टींसाठी इजिप्तची संस्कृती ओळखली जाते. याच संस्कृती मधला एक प्रसिद्ध राजा म्हणजे ‘रामसेस दुसरा’. याची कारकीर्द अनेकार्थाने उल्लेखनीय होती. हा राजा त्याच्या मुत्सद्देगिरी आणि व्यापक जनसंपर्कासाठी ओळखला जातो. कर्नाक आणि अबू सिंबेल हे जगभरात वास्तूशैलीसाठी प्रसिद्ध आहे. या वास्तूंचे बांधकाम रामसेस द्वितीय याच्या कालखंडात झाले होते. इजिप्तच्या इतिहासात रामसेस द्वितीय याची ओळख ‘शासकांचा शासक’ अशी आहे. त्याने इतर शासकांच्या तुलनेत अधिक स्मारके आणि शिल्पकृती उभारल्या इतकेच नाही तर कुठल्याही फेरोपेक्षा त्याची अधिक अपत्ये होती, याला इजिप्शियन लोक ‘रामसेस द ग्रेट’ म्हणून ओळखतात आणि त्याच्या ६६ वर्षांच्या शासनकाळात इजिप्तने सामर्थ्य आणि वैभव अनुभवले.

रामसेस द ग्रेट एक चांगला राजा का होता ?

रामसेस हा एक चांगला राजा म्हणून ओळखला जातो. नेतृत्व कसे करायचे, इजिप्तच्या सीमांचा विस्तार करणाऱ्या सैन्याची व्यवस्था कशी करायची आणि शांतता कशी राखायची हे त्याला माहीत होते. त्याचे दरबारी आणि अधिकारी त्याच्याशी एकनिष्ठ होते. त्यामुळेच इतिहासात तो एक लोकप्रिय राजा म्हणून ओळखला जातो.

रामसेस पहिला हे रामसेस दुसरा याचे आजोबा होते. किंबहुना त्यांच्या पराक्रमामुळे त्यांचे कुटुंब या पदापर्यंत पोहचले होते. रामसेस दुसरा याचे वडील सेती पहिले यांनी खाणकामातून देशाची संपत्ती वाढवली. त्यांच्या कालखण्डात त्यांनी हित्तींविरोधात (तुर्कस्तानमधील एक जमात) उत्तरेकडील सीमा मजबूत केली. रामसेस दुसरा हा वयाच्या १४ व्या वर्षी सिंहासनावर आरूढ झाला. या तरुण राजाने हित्तीं विरोधात दिलेला लढा इतिहासात अजरामर आहे.

इजिप्तच्या मंदिरांच्या भिंतींवर रामसेस दुसरा याच्या पराक्रमाचे चित्रण करण्यात आलेले आहे. रामसेस दुसरा आणि हित्ती यांच्यातील वाद अनेक वर्ष सुरु राहिला. शेवटी अनेक वर्षांच्या वाटाघाटीनंतर, रामसेस द्वितीय याने हित्तींसोबत शांतता करार केला. हा सर्वात जुना शांतता करार होता ज्याचा मजकूर आजतागायत टिकून आहे. या कराराची एक प्रत चित्रलिपीमध्ये, कर्णकच्या मंदिरातील एका दगड स्तंभावर कोरलेली होती. मातीच्या गोळ्यावर अक्कडियन भाषेत लिहिलेली दुसरी प्रत १९०६ मध्ये तुर्कस्तानामध्ये सापडली.

अधिक वाचा: विश्लेषण: भारत आणि पाकिस्तानात अकबर आणि औरंगजेब यांच्या परस्परविरोधी प्रतिमा का आढळतात?

रामसेस याने केलेले बांधकाम

रामसेस दुसरा याच्या कालखंडातील समृद्धी त्याने केलेल्या भव्य बांधकाम मोहिमेतून स्पष्ट होते. कर्नाक आणि अबू सिंबेल येथील मंदिरे इजिप्तच्या महान आश्चर्यांपैकी एक आहेत. त्याच्या पिरॅमिड मध्ये- रामेसियममध्ये सुमारे १० हजार पॅपिरस स्क्रोलची एक भव्य लायब्ररी होती. ॲबिडोस येथे मंदिरे पूर्ण करून त्याने आपल्या वडिलांचा आणि स्वतःचा सन्मान केला. त्याच्याच कामाची पोचपावती म्हणून त्यानंतरच्या नऊ फेरोनीं सिंहासनावर आरूढ झाल्यावर त्याचे नाव घेतले आणि इजिप्तच्या राज्यकर्त्यांमध्ये “महान” म्हणून त्याची प्रतिमा अधिक मजबूत केली.

रामसेस दुसरा हा इजिप्तशियन राजावंशांतील महत्त्वाचा फेरो होता. रामेसेस दुसरा याच्या काळात इजिप्त हे आधुनिक काळातील सुदान ते सीरियापर्यंत पसरलेले एक विशाल साम्राज्य म्हणून विकसित झाले होते. ईशान्य इजिप्तमधील कांटीर येथे पी-रॅमेसेस या नवीन राजधानीच्या अवशेषांमुळे या कालखंडाविषयी माहिती मिळते, याच कालखंडात रामेसेस दुसरा याने हित्तींशी शांतता करार केला आणि हित्ती राजकन्येशी विवाहाने या करारावर शिक्कामोर्तब केले,असे इतिहासाचे प्राध्यापक पीटर ब्रँड यांनी त्यांच्या ‘रामसेस टू, इजिप्तस अल्टिमेट फॅरो” (लॉकवुड प्रेस, २०२३) या पुस्तकात नमूद केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the riddle of the past many years be solved now who was ramses ii why is the world attracted to him svs
First published on: 29-03-2024 at 08:57 IST