|| सिद्धार्थ खांडेकर

फुटबॉल जगतात सध्या सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रतिभावान असलेले रोनाल्डो आणि मेसी यांच्यातील विद्यमान विश्वचषकातील तथाकथित अप्रत्यक्ष द्वंद्वामुळे इतर बातम्या झाकोळल्या जाणं स्वाभाविकच आहे. दैवतपूजन किंवा विरोधी दैवतभंजन होत नसल्यास विश्वचषकासारख्या स्पर्धेला खुमारी कशी येणार?

पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं स्पेनविरुद्धच्या पहिल्याच लढतीत गोलांची हॅटट्रिक केली. स्पेनविरुद्धच्या त्या लढतीच्या एकूण चित्रातून रोनाल्डोला वगळलं असतं, तर पोर्तुगालच्या हाती काहीच लागलं नसतं. त्या तिन्ही गोलांपैकी तिसरा गोल सर्वाधिक अद्भुत आणि सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकणारा ठरला होता. तो गोल झाला नसता, तर रोनाल्डोच्या वाटय़ाला येणारं नेहमीचं कौतुक वगळता चर्चा झाली असती ती स्पेनच्या जिगरबाज आणि कल्पक खेळाची. तसं घडलं नाही. उलट दोन मिनिटं शिल्लक असताना रोनाल्डोनं पोर्तुगालला ३-३ अशी बरोबरी साधून दिली, त्या वेळी स्पॅनिश फुटबॉलपटू (ज्यात रोनाल्डोचे रेआल माद्रिद संघातील अनेक दोस्तही होते) आणि स्पॅनिश प्रेक्षकांनीही रोनाल्डोच्या खेळाची मनमोकळी तारीफच केली.

मेसीच्या नावावर आइसलॅण्डविरुद्धच्या सामन्यात फारसं काही लागलंच नाही. एकतर आइसलॅण्डसारख्या स्पर्धेतल्या सर्वात छोटय़ा देशानं अर्जेंटिनासारख्या मातबर संघाला १-१ असं बरोबरीत रोखलं हाच एक स्वतंत्र कौतुकाचा विषय होता. मेसीनं त्यातही एक पेनल्टी गमावली हे म्हणजे फारच झालं. दुसऱ्या हाफमध्ये मिळालेल्या पेनल्टीवर मेसीचा फटका आइसलॅण्डचा गोलकीपर हॉलडॉरसननं रोखला.

रोनाल्डो ३ – मेसी ०.. खरंच?

दोन पूर्णत: भिन्न शैलीच्या आणि पूर्णपणे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये खेळणाऱ्या या दोन महान खेळाडूंमध्ये तुलना होणं हे दोघांसाठीही अन्यायकारक आहे. रोनाल्डोनं स्पेनविरुद्धच्या सामन्यात तीन गोल केले. पहिला पेनल्टीवर, दुसरा मैदानी आणि तिसरा फ्री-किकवर. यांतील तिसरा गोलच खऱ्या अर्थानं रोनाल्डोचा दर्जा दाखवणारा ठरला. पिके, रामोससारख्या उंचपुऱ्या स्पॅनिश बचावपटूंच्या ‘भिंती’ला वळसा घालून चेंडू गोलच्या डाव्या कोपऱ्यात विसावला. स्पेनचा गोलकीपर डेव्हिड डे गिया निव्वळ बघत राहिला. रोनाल्डोचा दुसरा गोल डे गियाच्या चुकीमुळे झाला. याउलट आइसलॅण्डविरुद्ध मेसीने गोलच्या दिशेने ११ फटके लगावले. एकावरही गोल होऊ शकला नाही हा विश्वचषकातील एक विक्रमच! ८०व्या मिनिटाच्या सुमारास मेसीने त्याच्या खास शैलीत, गिरकी घेत डाव्या पायाने लगावलेला जोरकस फटका चारेक इंच उजवीकडे वळला असता, तर त्याच्याही नावावर एक अफलातून गोल नोंदवला गेला असता. त्याची फ्री-किक तर आइसलॅण्डची बचावभिंतही ओलांडू शकली नाही.

मेसीनं ११ वेळा आइसलॅण्डच्या गोलच्या दिशेनं फटके लगावले. कारण अजूनही तो पारंपरिक पद्धतीने प्रतिस्पर्ध्याना चकवा देऊन, स्वत:साठी ‘अवकाश’ निर्माण करून गोल करण्याची धडपड करत असतो. आइसलॅण्डच्या संघानं त्याच्या हालचाली हेरूनच गोलक्षेत्रात बचावाची व्यूहरचना आखलेली होती. तुलनेनं चिमुकल्या मेसीजवळ मग पल्लेदार फटके लांबूनच मारण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचा उजव्या पायानं मारलेला आणखी एक फटका गोलजाळ्याच्या जवळून गेला होता. दुसरं असं, की आइसलॅण्डसारख्या संघासमोर अर्जेटिनासारख्या मातबर संघासमोर खेळताना उद्दिष्ट मर्यादित असतं. अति महत्त्वाकांक्षा घातक ठरू शकते. शिवाय पहिल्याच हाफमध्ये बरोबरी साधल्यावर केवळ आणि केवळ बचावावर लक्ष केंद्रित करणं (फुटबॉलच्या परिभाषेत पेनल्टी क्षेत्रात ‘बस’ उभी करणं) यापेक्षा अधिक चांगला पर्याय त्यांनी शोधण्याचं कारणच नव्हतं. हा संघ बचावात मुरलेला आहे. युरो २०१६च्या स्पर्धेत त्यांनी इंग्लंडविरुद्ध मिळवलेला विजय भरपूर चर्चिला जातो. पण त्यांनी (रोनाल्डोच्या!) पोर्तुगाललाही गटसाखळीत बरोबरीत रोखून दाखवलं होतं, हे फारसं कुणाला स्मरत नाही.

याउलट स्पेनचा संघ त्यांच्या नेहमीच्या शैलीत खेळला. रोनाल्डोला रोखण्याच्या वगैरे फंदात पडला नाही. दोन वेळा पिछाडीवर पडूनही बरोबरी साधणं आणि अखेरीस आघाडी घेणं या बाबी या संघाची खंबीर, निर्भीड आणि महत्त्वाकांक्षी मानसिकता दर्शवतात. दोन चुका (रोनाल्डोला पेनल्टी क्षेत्रात पाडणे आणि गोलकीपरनं तुलनेनं साधा फटका थोपवण्यात दाखवलेली हलगर्जी) झाल्या नसत्या, तर स्पेननं तो सामना जिंकलाच असता. मेसी आणि रोनाल्डो यांची तुलना करण्याची इच्छा असलेल्यांनी या दोन भिन्न पाश्र्वभूमी समजून घ्याव्यात.

रोनाल्डो हा ‘मुक्त’ फुटबॉलपटू आहे. त्याची विशिष्ट  अशी पोझिशन नाही. गोलक्षेत्रात कोणत्याही कोनातून, दिशेनं तो शिरकाव करतो. मैदानात उजवीकडे, मध्ये किंवा डावीकडे तो खेळू शकतो. अशी सवलत त्याला प्रशिक्षक सांतोस यांनी दिलेली आहे. त्याचं गोल करण्याचं कौशल्य आणि गोलांची भूक वादातीत असल्यामुळे त्याच्या मुक्तसंचाराचा पोर्तुगालला फायदाच झालेला आहे. मेसीला अशा प्रकारची सवलत विद्यमान प्रशिक्षक साम्पाओली किंवा आधीच्या प्रशिक्षकांनी दिलेली नाही. त्यामुळे बचाव भेदून गोल करण्याचा प्रयत्न करणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट  असतं. तो ड्रिब्लिंगच्या बाबतीत रोनाल्डोपेक्षा श्रेष्ठ असेल, पण रोनाल्डोकडे अधिक वैविध्य आहे. वेळ पडल्यास बायसिकल किकनंही रोनाल्डो गोल करू शकतो. मेसीची प्रकृती तोळामासास आहे. याउलट रोनाल्डो उंच आणि बऱ्यापैकी दणकट आहे. त्याला रोखण्यापूर्वी समोरच्याला स्वत:च्या हाडांचंही भान ठेवावं लागतं!

आणखी एक मुद्दा मानसिक कणखरपणाचा आहे. युरो २०१६ जिंकल्यामुळे रोनाल्डोचा आत्मविश्वास काही पटींनी वाढलेला आहे. याउलट अर्जेंटिनाच्या गणवेशात आपल्याला पुरेशी चमक दाखवता आलेली नाही, हे कुठेतरी मेसीला सतत जाणवतं असा त्याचा खेळ असतो. विश्वचषक २०१४ मध्ये अर्जेटिनाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. परंतु त्या सामन्यात किंवा बाद फेरीच्या कोणत्याही सामन्यात मेसीला गोल करता आला नव्हता. कोपा अमेरिका २०१५ आणि कोपा अमेरिका सेंटेनॅरियो २०१६ या दोन्ही स्पर्धाच्या अंतिम फेरीत अर्जेटिनाचा चिलीविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाला. दोन्ही सामन्यांत पूर्ण वेळेत मेसीला गोल करता आला नव्हता. रोनाल्डोही युरो २०१६चा अंतिम सामना पूर्णवेळ खेळू शकला नाही. पण जायबंदी होऊन ‘डगआऊट’मध्ये बसण्याऐवजी तो साइडलाइनवर उभा राहून संघाचा हुरूप वाढवत होता. जिंकण्याची ही भूक, उत्कटता ‘स्वार्थी’ रोनाल्डोमध्ये जशी आढळते, तशी ती अजून तरी मोक्याच्या सामन्यांमध्ये मेसीमध्ये दिसलेली नाही. कौशल्याच्या बाबतीत नाही, तरी आत्मविश्वासाच्या बाबतीत रोनाल्डोची कामगिरी मेसीपेक्षा अलीकडे सरस झालेली आहे. रोनाल्डोवर कुरघोडी करण्यासाठी नव्हे, तर स्वत:ला अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय जर्सीमध्ये एकदाचं सिद्ध करण्यासाठी तरी मेसीला हा अडथळा पार करावाच लागेल. तसं झाल्यास मेसीला हनुवटीवर नसलेली दाढी कुरवाळून रोनाल्डो किंवा इतर कोणाला खिजवून दाखवण्याची गरजही भासणार नाही!

siddharth.khandekar@expressindia.com