|| स्वदेश घाणेकर

आजचा सूर्योदय हा रशियासाठी निराळा आणि ऐतिहासिक असेल. रशियाला प्रथमच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद लाभले आहे.  गेल्या सहा-सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर या स्पर्धेला १४ जूनला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. अमेरिका, इंग्लंड, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कोलंबिया आदी अनेक देशांतून येथे पर्यटकांचा ओघ सुरु झाला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने जमलेल्या या मंडळींची संस्कृती विभिन्न असली तरी फुटबॉल हा समान दुवा त्यांना पुढील महिनाभर जोडून ठेवणार आहे. या लाखोंच्या संख्येने जमलेल्या मंडळींमध्ये हजारो भारतीयही असतील यात शंका नाही. विश्वचषकाच्या निमित्ताने या मंडळींना जणू एक सण साजरा करण्याची संधी मिळते. रशियातील १२ शहरांमध्ये जिथे विश्वचषकाच्या लढती खेळवल्या जाणार आहेत, तेथे उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी यांच्यामुळे सख्ख्या मित्रांमध्ये होणारी भांडणे अनुभवण्याचा हाच काळ. बऱ्याच कुटुंबीयांना एकत्र आणणारा हाच तो काळ. पुढील महिनाभर रशियात दिसणाऱ्या चित्राची छबी भारतातही उमटेल हे नक्की.

रशियाला या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले, त्यावेळी अनेक मतमतांतरे व्यक्त करण्यात आली. मागील काही वर्षांमध्ये ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेकडून तेथे होणारे हल्ले, हे त्यामागचे प्रमुख कारण. त्यात इंग्लंड आणि रशिया यांच्यातील राजकीय घडमोडींनंतर निर्माण झालेली क्लिष्ट परिस्थितीची भर पडली. आणखी आव्हान म्हणजे हुल्लडबाज गटांना पांगवण्याचे आणि परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेचे. पण या सर्वासाठी येथील सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या ध्यानीमनी केवळ फुटबॉलचाच विचार सुरू आहे. आवडत्या खेळाडूला क्लब जर्सीत खेळताना पाठिंबा देणारा हाच प्रेक्षक आज राष्ट्रीय संघासोबत असताना त्या खेळाडूच्या विरोधात उभा राहिलेला दिसणार आहे. येथे देशापेक्षा कुणी मोठा नाही. अन्य खेळांसारखी व्यक्तिपूजा येथे नाही. येथे आहे ती केवळ सांघिक भावना. ९० मिनिटांचा हा खेळ पुढील महिनाभर सर्व फुटबॉल प्रेमींना अनोखी मेजवानी ठरणार आहे. कुणाच्या आनंदासमोर गगनही ठेंगणे वाटेल, तर कुणासाठी तो क्षण भावनिक असेल. हीच फुटबॉलची जादू आहे. ती अनुभवण्याची संधी चार वर्षांनी संपूर्ण जगाला मिळते. त्यामुळेच फुटबॉलच्या या महाकुंभमेळ्यासाठी प्रत्येक फुटबॉलप्रेमी आतूर असतो. पुढील चार वर्षांची तहान भागेल इतके आनंदाचे-भावनिक क्षण तो आपल्या मनात साचवण्याचा प्रयत्न करतो. १४ जून ते १५ जुलै हा काळ फुटबॉलप्रेमींचाच आहे आणि तो त्यांच्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.

भारतातील कोलकाता, गोवा, पूर्वाचल, कोची अशा काही भागांमध्ये विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलमय वातावरण दिसू लागले आहे. या लगबगीत कुमार विश्वचषक स्पर्धेतील जॅक्सन सिंगचा गोल आठवतो. २०१७च्या कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील यजमान भारताचा तो एकमेव गोल. त्या स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व पाठिंबा पाहून आपण खरेच क्रिकेटवेडय़ा देशात राहतो का, हा प्रश्न पडणे साहजिक होते. मात्र स्पर्धा संपली आणि फुटबॉलमय वातावरणाची वेगाने आलेली हवा तितक्याच वेगाने निघूनही गेली. गेल्या आठवडय़ात मुंबईत झालेल्या चार देशांच्या आंतरखंडीय स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी भारताचा कर्णधार सुनील छेत्रीला विनंती (पाठिंब्यासाठी हात पसरावे) करावी लागली. त्याला प्रतिसाद देत प्रेक्षकही मोठय़ा संख्येने आले. गेली अनेक वष्रे भारतीय फुटबॉल संघ सातत्यपूर्ण कामगिरी करूनही प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद आपल्याला अस्तित्वाची जाण करून देणारा आहे. पण तूर्तास तरी या रशियन ‘फुटबॉल क्रांती’त अप्रत्यक्षरीत्या सहभागी होण्यासाठी भारतीय सज्ज झाले आहेत.