FIFA World Cup 2018 Argentina vs Croatia Lionel Messi Failed to carry forward the legacy of Greatest of all time Diego Maradonas: आधी आईसलँड आणि मग क्रोएशियाविरुद्ध सामन्यांत माती खाल्ल्यानंतर अर्जेन्टिनाचं विश्वचषकातलं भवितव्य आता जर तर वर अवलंबून आहे. इथे काही जणांना माती खाल्ली हा शब्द पटत नसेल, पण मला हा शब्द अगदी योग्य वाटतो. कारण जर तुमच्या संघात लायनेल मेसी, सर्जियो अॅग्वेरो, गोन्झालो हिग्वेन, एंजल डी मारिया, एन्जो पेरेझ, हाविएर माशेरानो, निकोलस ओटामेंडीसारखे खेळाडू असतील आणि तुम्हाला विजय मिळवता येत नसेल तर माती नाही खाल्ली तर अजून काय केलं? क्रोएशियाविरुद्ध ३-० असा झालेला पराभव म्हणजे अर्जेन्टिना फुटबॉलला लागलेली उतरती कळाच म्हणावी लागेल. फिफा विश्वचषकात अर्जेन्टिनाचा साखळी फेरीत १९५८ सालानंतरचा हा सर्वात वाईट पराभव आहे. १९५८ च्या विश्वचषकात चेकोस्लोव्हाकियाने अर्जेन्टिनाला ६-१ अशी धूळ चारली होती. इतकेच नाही तर १९७४ नंतर अर्जेन्टिनाला पहिल्यांदाच विश्वचषकातल्या पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. ज्या लायनेल मेसीकडे डिएगो मॅराडोनाचा वारसदार म्हणून पाहिलं जात होतं, त्या मेसीला दोन्ही सामन्यांत सपशेल अपयश हाती आलं. पण खरंच लायनेल मेसीला डिएगो मॅराडोनाचा वारसदार बोलायचं का? हा प्रश्न आता उभा राहिला आहे. कारण डिएगो मॅराडोनाची कारकीर्द ही कितीही वादग्रस्त असली तरी अर्जेन्टिनासाठी खेळताना तो सर्वस्व पणाला लावून खेळायचा. इतकेच नाही तर व्यावसायिक फुटबॉलमध्ये मॅराडोनानं आपली महानता सिद्ध करुन दाखवली आहे. इटलीच्या नापोलीसारख्या संघाला मॅराडोनानं आपल्या कामगिरीच्या जोरावर युरोपमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. मॅराडोनाच्या अर्जेंटिनानं १९८६ साली फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्याआधी मारीयो केम्पस यांच्या अर्जेन्टिनानं १९७८ साली पहिल्यांदा फिफा विश्वचषक जिंकला होता. सोशल मीडियाच्या जमान्यात मेसीला केम्पस आणि मॅराडोनापेक्षा अधिक लोकप्रियता मिळाली आहे आणि अजूनही मिळत आहे. बार्सिलोनासाठी जबरदस्त खेळणाऱ्या मेसीला याच सोशल मीडियानं मॅराडोनाचा वारसदार म्हणून ठरवलं. त्यामुळं मॅराडोनानंतर  मेसी अर्जेन्टिनाला फिफा विश्वचषक जिंकून देईल अशी भाबडी आशा देशवासियांना होती. गेल्या बारा वर्षांपासून डिएगो मॅराडोनालाही अशीच काहीशी आशी मेसीकडून होती. त्यामुळेच की काय क्रोएशियाविरुद्धचा पराभव समोर पाहत असताना साक्षात मॅराडोनालाही आपले अश्रू अनावर झाले होते.

२००६ आणि २०१० साली अर्जेन्टिनानं फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तर २०१४ साली त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पण यंदा अर्जेन्टिना साखळीतचं गारद होणार का एखादा चमत्कार घडून अर्जेन्टिना बाद फेरीत धडक मारणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गोट (GOAT) अशा आशयाचा हॅशटॅग गाजतोय. गोट (GOAT) म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?  तर गोट (GOAT)  म्हणजेच ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’. मेसी की रोनाल्डो या दोन फुटबॉलवीरांमध्ये ही लढत रंगली आहे. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ मेसीला म्हणायचं की रोनाल्डोला हा पण एक भाबडा प्रश्न सर्वांना पडलाय. असो.

मेसी हा एक जबरदस्त खेळाडू आहे, पण तो एकटा सर्वकाही करु शकत नाही. फुटबॉलमध्ये तुम्हांला इतर खेळाडूंची मदत लागते, तुम्ही एकटे काहीच करु शकत नाही.
– ल्युका मॉड्रिच

का हरली अर्जेन्टिना?

क्रोएशियाचा कर्णधार ल्युका मॉड्रिचनं मेसीबाबत केलेलं हे वक्तव्य आहे. यात तथ्यही आहेच म्हणा. जोपर्यंत तुम्हाला इतर खेळाडूंची साथ लाभत नाही तोपर्यंत तुम्हाला विजय मिळवता येत नाही. आता बघा ना मेसीनं कितीही गोल करण्याचा प्रयत्न केला तरी गोलकीपर विल्यम कॅबालेरोनं केलेली घोडचूक अर्जेन्टिनाला विजय कसा मिळवून देऊ शकेल. क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात अर्जेन्टिनाला गोलकीपर सर्जियो रोमेरोची उणीव आकर्षानं जाणवली. दुखापतीमुळं ऐन विश्वचषकाच्या तोंडावर रोमेरोला माघार घ्यावी लागली. त्यात सर्जियो अॅग्वेरोसारख्या खेळाडूचं अस्तित्व निर्णायक सामन्यात कुठेच दिसलं नाही. तो या सामन्यात खेळत होता की नाही हेही जाणवत नव्हतं. अॅग्वेरोला पूर्वार्धातली अखेरची २१ मिनिटं आणि ११ सेकंद बॉलला साधा पायही लावता आला नाही. पूर्वार्धात अॅग्वेरोला केवळ ७ वेळाच बॉलला टच करता आलं. याला कारण क्रोएशियाचा भक्कम बचाव असावा वा सर्जियो अॅग्वेरोचं अपयश म्हणा. त्यात अर्जेन्टिनाच्या बचावफळीत आणि मधल्या फळीत अनुभवाची कमतरताही प्रामुख्यानं जाणवली. त्यामुळेच क्रोएशियाला एक-दोन नाही तर तीन गोल करण्याची संधी चालून आली.

संघ निवडण्यात प्रशिक्षक सॅम्पोली चुकले?

क्रोएशियाविरुद्ध झालेल्या पराभवाची सर्व जबाबदारी प्रशिक्षक जोर्गे सॅम्पोली यांनी स्वत:वर घेतली. पण सॅम्पोलीसारखे अनुभवी प्रशिक्षक संघ निवडण्यात कमी पडले का असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. एंजल डी मारिया, मार्कोस रोहो, गोन्झालो हिग्वेन, पावलो डायबाला, एवर बनेगासारख्या खेळाडूंना सॅम्पोली ऐन मोक्याच्या वेळी संघाबाहेर कसे ठेऊ शकतात. निर्णायक सामन्यात सॅम्पोली यांनी साल्वियो, पेरेझ आणि अकुना यांना संघात स्थान दिलच कसं? पेरेझने तर या सामन्यात गोल करण्याची सुवर्णसंधीही दवडली. त्यामुळे सॅम्पोली यांनी ऐन मोक्याच्या वेळी केलेले बदल त्यांना चांगलेच भोवले. जोर्गे सॅम्पोली यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते चिलीचे प्रशिक्षक होते. सॅम्पोली यांच्या मार्गदर्शनाखाली चिलीनं २०१५ साली अर्जेन्टिनाला हरवून कोपा अमेरिका ही स्पर्धा जिंकली होती.

विश्वचषकानंतर अर्जेन्टिनाचं भवितव्य काय?

जर अर्जेन्टिनाचं विश्वचषकातलं आव्हान साखळीत संपुष्टात आलं तर भविष्यकाळ हा त्यांच्यासाठी फार वाईट असू शकतो. कारण अर्जेन्टिनाच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी वयाची तिशी ओलांडली आहे. म्हणजेच विश्वचषकानंतर संन्यास घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अर्जेन्टिनाच्या संघ आघाडीवर असेल. सगळ्यात आघाडीवर नाव असेल ते म्हणजे लायनेल मेसी. मग गोलकीपर विल्यम कॅबालेरो, सर्जियो अॅग्वेरो, एंजल डी मारिया, गोन्झालो हिग्वेन, हाविएर माशेरानो, निकोस ओटामेन्डी, मेर्काजो, बिग्लिया, गुझमन, फॅजियो, एव्हर बनेगा, अर्मानी, अन्साल्डी अशी अनेक नावं आहेत जी विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून संन्यास घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं भविष्यात अर्जेन्टिनाच्या संघाची नव्यानं बांधणी करण्याचं आव्हान अर्जेन्टिनाच्या फुटबॉल संघटनेसमोर असेल.


आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या इमेल आयडीवर कळवा