Fifa World Cup 2018 BEL vs TUN : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात बेल्जीयमने ट्युनिशियाचा ५-२ने धुव्वा उडवला. या विजयाबरोबर बेल्जीयमने ग गटातून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पहिल्या सामन्यात २ गोल करणाऱ्या लुकाकूने या सामन्यातही आपली लकाकी कायम ठेवत २ गोल केले. तर आक्रमणपटू हजार्डनेही जोरदार हल्ला चढवत २ गोल केले.

सामन्याच्या सहाव्या मिनिटाला पेनल्टीचा फायदा घेत हजार्डने पहिला गोल केला. त्यानंतर लुकाकूने १६व्या मिनिटाला गोल करत बेल्जीयमला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र ही आघाडी थोडी कमी करण्यात ट्युनिशियाला १८व्या मिनिटाला यश आले. ब्रॉनने गोल करत आपल्या संघाला २-१ अशा आशादायक स्थितीत नेले. ट्युनिशियाचा हा आनंद फार टिकू शकला नाही. लुकाकूने पूर्वार्धाच्या नंतर मिळालेल्या अतिरिक्त वेळेत तिसऱ्या मिनिटाला (४५ + ३) गोल केला. त्यामुळे पूर्वार्धात बेल्जीयम ३-१ असा आघाडीवर होता.

उत्तरार्धात लगेचच सामन्याच्या ५१व्या मिनिटाला हजार्डने दुसरा गोल करत हि आघाडी वाढवली. त्यानंतर बराच वेळ दोन्ही संघाना गोल करता आला नाही. पण सामन्याच्या अखेरच्या क्षणात ९०व्या मिनिटाला बेतशुआइने गोल करत बेल्जीयमला ५-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर त्यापुढच्या अतिरिक्त वेळेत तिसऱ्या मिनिटाला गोल करत खाझरीने ट्युनिशियासाठी दुसरा गोल केला.

या विजयामुळे बेल्जीयमने ६ गुणांसह बाद फेरी गाठली आहे. तर ट्युनिशियाने दोन्ही सामने गमावल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.