विश्वचषक १९६२ राडेबाजीप्रमाणेच एका ब्राझिलियन अवलियाच्या अदाकारीसाठीदेखील ओळखला जातो. त्याचे नाव पेले नव्हे, गॅरिंचा! ही स्पर्धा ब्राझीलने जिंकली. हे त्यांचे दुसरे जगज्जेतेपद. डाव्या मांडीला दुखापत झाल्यामुळे पेलेला दुसऱ्याच सामन्यात मैदान सोडावे लागले. स्पर्धेत नंतर तो खेळलाच नाही. त्या वेळी ब्राझिलियन आक्रमणाची जबाबदारी चिमुकल्या गॅरिंचानं उचलली. त्याच्या पाठीचा कणा काहीसा वाकलेला होता आणि त्याचा डावा पाय उजव्यापेक्षा सहा सेंटिमीटर आखूड होता. पण यामुळे त्याच्या चापल्यावर कोणत्याही मर्यादा आल्या नव्हत्या. आजही तो फुटबॉलमधील सर्वोत्तम विंगर म्हणून ओळखला जातो. चिलीविरुद्ध उपांत्य फेरीत त्याने दोन गोल केले. त्या संपूर्ण स्पर्धेत त्याने चार गोल केले. पण इंग्लंडविरुद्धचा त्याचा गोल संस्मरणीय ठरला. भलत्याच दिशेला वळून तो समोरच्याला चक्रावून सोडायचा. म्हणजे चेंडू एकीकडे नि हा दुसरीकडे! उपांत्य सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात हकालपट्टी होऊनही अंतिम सामन्यात खेळू दिला गेलेला तो बहुधा एकमेव फुटबॉलपटू.