काझान : ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातील वाटचाल कायम राखायची असेल तर डेन्मार्कवर विजय मिळवणे अनिवार्य बनले आहे. मात्र त्यासाठी डेन्मार्कचा आक्रमक ख्रिस्टियन एरिक्सनला रोखणे आणि सरस खेळ करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

क-गटातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला फ्रान्सकडून २-१ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे बाद फेरीत जाण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत डेन्मार्कवर विजय आवश्यक बनला आहे. त्याबाबत ऑस्ट्रेलियाचा माइल जेडिनॅकने आम्ही एरिक्सनला रोखण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार असलो तरी केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करणार नसल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलिया त्यांचा युवा प्रतिभावान आक्रमक डॅनियल अरझानीला या सामन्यात खेळवण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे डेन्मार्कने पहिल्याच सामन्यात पेरूवर विजय मिळवलेला असल्याने ते सकारात्मक मानसिकतेतून खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना अधिक आक्रमकपणे खेळतानाच काही बदल करून खेळण्याचीदेखील चिन्हे आहेत. डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर श्मेइकल हादेखील ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या मार्गातील अजून एक अडथळा ठरू शकतो.

सामना क्र. २१

गट  क

डेन्मार्क वि. ऑस्ट्रेलिया

स्थळ : कझान मैदान

वेळ : सायंकाळी ५.३० वा.