प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

विश्वचषकाचा थरार अंतिम पाच दिवसांवर येऊन पोहोचला असताना सारे विश्व फुटबॉलमय झाले आहे. सर्वाचे आवडीचे संघ स्पध्रेतून बाहेर पडल्याने प्रत्येक फुटबॉल समर्थकाने उपांत्य फेरीतील एक संघ आपला म्हणून निवडलेला आहे. त्यामुळे खेळाचे आकर्षण मात्र तसूभरही कमी झालेले दिसत नाही. ज्या-त्या देशांचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशाच्या सामन्यास खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रशियात दाखल होतात, हे एक चांगले आहे. उपांत्यपूर्व सामन्यात क्रोएशियाच्या महिला राष्ट्राध्यक्षा कोलिंडा ग्रॅबर किटारोव्हिच यांनी खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन विजय साजरा केला. त्यामुळे खेळाडूंनाही एक प्रकारचे प्रोत्साहन मिळते.

बुधवारी उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात माजी विजेत्या इंग्लंडशी क्रोएशिया दोन हात करीत आहे. या स्पध्रेत आत्तापर्यंत क्रोएशियाने नायजेरिया, अर्जेटिना, डेन्मार्क, रशिया या तुल्यबळ संघांना पराभूत केले, तर आइसलँडशी बरोबरी केली. या सर्व संघांवर क्रोएशियाने ‘टायब्रेकर’व्यतिरिक्त ९ गोल केले व त्यांच्यावर ३ गोल झाले. याउलट इंग्लंडने पनामा, टय़ुनेशिया, कोलंबिया, स्वीडन यांना पराभूत केले. मात्र बेल्जियमकडून या संघाला पराभूत व्हावे लागले. इंग्लंडने या स्पध्रेत आत्तापर्यंत ११ गोल केले, तर त्यांच्यावर ४ गोल झालेले आहेत. यापूर्वी इंग्लंड व क्रोएशिया यांच्यामध्ये ७ वेळा लढत झाली. यापकी इंग्लंडने ४ वेळा तर क्रोएशियाने २ वेळा विजय संपादन केला, एक वेळा सामना बरोबरीत सुटला आहे. २००४च्या युरो चषक स्पध्रेमध्ये दोन्ही संघांत लढत झाली होती. या लढतीत इंग्लंडने ४-२ असा विजय संपादन केला होता. चालू स्पध्रेचा विचार केला, तर इंग्लंडपेक्षा क्रोएशियाला प्राथमिक फेरीपासून तगडय़ा आव्हानाला सामोरे जावे लागले, तरीही स्पध्रेत ते अद्याप अपराजित आहेत. इंग्लंडला मात्र तुलनेने दुबळ्या संघांशी मुकाबला करावा लागला, पण एका सामन्यात ते पराभूत झालेले आहेत. उपांत्यपूर्व फेरीतील स्वीडनविरुद्धचा त्यांचा विजय हा सफाईदार विजय म्हणावा लागेल. तुलनेने क्रोएशियाचा रशियाविरुद्धचा विजय पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला.

या सामन्यात दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांची खरी कसोटी लागणार आहे. ते यापूर्वीचीच व्यूहरचना कायम ठेवतात, की बदल करतात यावर सामन्याचे भवितव्य ठरणार आहे. या स्पध्रेत इंग्लंडचा संघ प्रथमपासून ३-५-२ या व्यूहरचनेनुसार खेळत आलेला आहे, तर क्रोएशियाचा संघ ४-२-३-१ या व्यूहरचनेनुसार खेळत आहे. क्रोएशियाचा गोलरक्षक सुबासिच ही एक क्रोएशियाची जमेची बाजू आहे, तर इंग्लंड संघाचा प्रमुख कणा आक्रमक फळीतील हॅरी केन व रहिम स्टìलग हे आहेत. क्रोएशियन प्रशिक्षक डॅलिच यांनी या दृष्टीने व्यूहरचना केलेली आहे. ‘‘अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात आम्ही मेस्सीला जखडून ठेवल्याने विजय मिळाला. तसेच आम्ही हॅरी केन व स्टìलगला जखडून ठेवण्यात यशस्वी होऊ. केन व स्टìलग यांना क्रोएशियाच्या चार बचावात्मक खेळाडूंना भेदून आक्रमण करावे लागेल.  विशेषत: डोमागोज विडा व डिजान लव्हरेन यांचे आव्हान असेल,’’ असे डॅलिच म्हणाले.

लव्हरेन हा एक संयमी व पहाडासारखा उभा राहणारा खेळाडू असून त्याला भेदून गोल करणे म्हणजे महाकठीण; पण क्रोएशियाचा बचावात्मक खेळाडू सिमे वर्साल्जकोला गुडघ्याला दुखापत झालेली असल्याने या सामन्यात त्याच्याऐवजी वेद्रान कोर्लुकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.  क्रोएशियाच्या व्यूहरचनेचा एक फायदा इंग्लंड संघाला मिळू शकतो. त्यांच्या मध्यफळीत कर्णधार लुका मॉड्रिक व इवान रॅकटिच हे दोनच खेळाडू आहेत, तर इंग्लंडचा संघ मध्यफळीत पाच खेळाडू घेऊन खेळतो. त्यामुळे आक्रमण करतेवेळी इंग्लंडचे सात खेळाडू, तर क्रोएशियाचे सहा खेळाडू क्रोएशियाच्या ‘डी एरिया’मध्ये असतील. याचा फायदा घेऊन इंग्लंडने आक्रमणाची धार वाढवून पहिल्या १५ मिनिटांत गोल नोंदवला तर ते सामन्यावर वर्चस्व ठेवू शकतील; परंतु या स्पध्रेत क्रोएशियाकडून जे गोल झाले ते मॉड्रिच व रॅकटिच यांच्या पासेसवरच झालेले आहेत. हे दोघेही आक्रमणावेळी मारिओ मँझुकिच, अँटे रेबिच व इव्हान पेरिसिच यांना प्रतिस्पध्र्याच्या बचावपटूपासून जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इंग्लंडने आक्रमण करताना बचावाकडे दुर्लक्ष करूरुन चालणार नाही. अर्थात डावपेचाचा भाग म्हणून इंग्लंडचे खेळाडू या सामन्यात मॉड्रिच व रॅकटिच यांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतील. पण रॅबिक हा इंग्लंडवर दबाव निर्माण करु शकतो. तो वेळप्रसंगी मध्यफळीत व बचावफळीत खेळतो. त्यामुळे संघ सहकाऱ्यांना त्याची मोलाची मदत होते. इंग्लंड संघाची मदार जरी केन व स्टìलग यांच्यावर असली तरी केरॉन ट्रिपियर हा खेळाडू क्रोएशियाला दुर्लक्षून चालणार नाही. ट्रिपियर या सामन्यात नक्कीच प्रभाव दाखवेल, अशी अपेक्षा इंग्लंडच्या प्रशिक्षकांना आहे. क्रोएशियन आक्रमक इंग्लंडची उजवी बाजू कमकुवत करून आक्रमण वाढवण्याचा प्रयत्न करतील. त्याकरिता मँझुकिच डाव्या बाजूने अधिक आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात दोन्ही संघांच्या जमेच्या बाजू म्हणजे त्यांची आक्रमण फळी. क्रोएशियाची बचाव फळी आणि इंग्लंडची मध्यफळी मजबूत आहे. क्रोएशियाचा संघ गतिमान खेळात तरबेज आहे.

एकंदर पाहता या अतिमहत्त्वाच्या सामन्यात दोन्हीही संघ ‘करो या मरो’ या नीतीनुसार विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. त्यामुळे सामना अतिशय चुरशीने होईल. स्पध्रेतील दोन्ही संघांची झालेल्या सामन्यातील कामगिरी पाहता क्रोएशिया संघ वरचढ वाटतो. पूर्वेतिहास पाहिल्यास इंग्लंड संघाची कामगिरी सरस आहे; पण उपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही संघांचा खेळ पाहिला तर दोन्हीही संघांना या सामन्यात विजयाची समान संधी आहे. इंग्लंडकडून केन, स्टìलग, ट्रिपियर, कायले वॉकर, जॉर्डन हँडेरसन यांच्याकडून अपेक्षा आहेत, तर क्रोएशियाचे मॉड्रिच, रॅकेटिच, मँझुकिच, रेबिच, लव्हरेन, सुबासिच हे भरवशाचे खेळाडू आहेत.

abhijitvanire@yahoo.com