फिफा विश्वचषक स्पर्धेत आज फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया असा अंतिम सामना रंगणार आहे. क्रोएशियाचा संघ हा प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर फ्रान्सचा संघ गेल्या २० वर्षात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत खेळणार आहे. या दोनही संघांचा या स्पर्धेतील प्रवास पाहता हा सामना ‘कांटे की टक्कर’ होणार, हे नक्की. आज भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ८.३० वाजता हा सामना सुरु होणार असून या सामन्यात चाहत्यांनी आणि क्रीडारसिकांनी आपल्या आवडत्या संघाला आपला पाठिंबा जाहीर करायला सुरुवात केली आहे.

या साऱ्या रणधुमाळी दरम्यान बार्सिलोना क्लबकडून खेळणारा क्रोएशियाचा मधल्या फळीतील खेळाडू इवॅन रॅकिटीक याने एक अजब घोषणा केली. शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत तो बोलत होता. त्यावेळी त्याला पत्रकारांनी टॅटूंबाबत प्रश्न विचारला. त्यावर इवॅन म्हणाला की रविवारच्या सामन्यात आम्ही जिंकावे, अशी माझी अपेक्षा आहे. आणि तसे झाले, तर मी नक्कीच टॅटू काढून घेईन.

‘सध्या माझ्या शरीरावर कपाळ हा भाग मोकळा आहे. जर क्रोएशिया जगज्जेता झाला, तर मी कपाळावर टॅटू काढून घेईन. पण अर्थातच या टॅटूला माझ्या बायकोची हरकत नाही, याची मला खातरजमा करायला हवी,’ असेही तो मिश्कीलपणे म्हणाला.