FIFA World Cup 2018 FINAL : विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाच्या संघावर ४-२ने मात केली आणि फ्रान्स जगज्जेते ठरले. फ्रान्सकडून पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल करण्यात आले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल करण्यात आला. या सामन्यात एक मजेशीर आणि पण एका खेळाडूसाठी नाराज करणारी गोष्ट ठरली. क्रोएशियाचा खेळाडू मारियो मॅन्झुकिच याने या सामन्यात चक्क दोंन्ही संघाच्या गोलपोस्टमध्ये गोल करण्याचा ‘पराक्रम’ केला.

सामना सुरु झाल्यापासून दोनही संघ एकमेकांच्या गोलपोस्टवर आक्रमण करत होते. याच दरम्यान पूर्वार्धात सामन्याच्या १८व्या मिनिटाला फ्रान्सला फ्री किकची संधी मिळाली. अनुभवी ग्रीझमनने चेंडू गोलपोस्टच्या दिशेने मारला आणि फ्रान्सला मिळालेल्या फ्री किकचा बचाव करताना क्रोएशियाकडून मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला. त्याच्या या गोलमुळे फ्रान्सला सामन्यात आघाडी मिळाली आणि मध्यंतरापर्यंत २-१ अशी आघाडी राखण्यात फ्रान्सला यश आले.

याच सामन्यात उत्तरार्धात फ्रान्स ४-१ अशी आघाडी घेऊन खेळत होते. त्यावेळी सामन्यात पहिला आत्मघातकी ओन गोल करणारा मॅन्झुकिच याने ६९व्या मिनिटाला गोल करत क्रोएशियाला थोडा दिलासा दिला. मात्र फ्रान्सने सामना संपेपर्यंत क्रोएशियाला त्यापुढे जाऊ दिले नाही. अखेर रेफरीची शिट्टी वाजली आणि फ्रान्सने सामना ४-२ने जिंकला.

त्याच्या या कारनाम्यामुळे मॅन्झुकिचने दोनही संघांच्या गोलपोस्टमध्ये गोल केले. अंतिम सामन्यात असे करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी १९७८ साली नेदरलँड्सच्या अर्नी ब्रँड्स यांनी इटलीविरुद्ध हा ‘पराक्रम’ केला होता.

दरम्यान, मॅन्झुकिचने केलेला गोल हा या सामन्यातील क्रोएशियाकडून दुसरा गोल होता. त्या आधी पेरिसीचने संघासाठी पहिला गोल केला होता.