माजी विजेता इंग्लंड व बेल्जियम हे या गटात पहिल्या दोन क्रमांकांसाठी दावेदार आहेत. मुख्य फेरीत प्रथमच स्थान मिळवणारा पनामा व पाचव्यांदा मुख्य स्पर्धेत प्रवेश करणारा टय़ुनिशिया यांच्याकडून त्यांना आव्हान आहे. तरीही व्यावसायिक लीगमध्ये खेळणाऱ्या अनेक खेळाडूंचा समावेश इंग्लंड व बेल्जियमच्या संघात असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे.

बेल्जियम

अ तिशय नैपुण्यवान खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघास या स्पर्धेत अद्यापही उपांत्य फेरीपर्यंत पोहोचता आलेले नाही. यंदाच्या या स्पर्धेसाठी त्यांनी रॉबर्ट मार्टिनेझ या स्पॅनिश प्रशिक्षकांकडे मार्गदर्शकपदाची जबाबदारी सोपविली आहे. बेल्जियम संघास आघाडी फळीतील खेळाडूंबाबत फारशी चिंता नाही, मात्र बचाव फळीतील कमकुवतपणा हा त्यांच्यासाठी क्लेशदायक ठरणार आहे. त्यांच्या आक्रमणाची मुख्य मदार केव्हिन डी ब्रुइन, रोमेलु लुकाकु, एडेन हझार्ड यांच्यावर आहे. केविन हा मँचेस्टर सिटी क्लबकडून खेळतो. मधल्या फळीत व्हिन्सेंट कोम्पनी या नैपुण्यवान खेळाडूवर योग्य समन्वय साधण्याची जबाबदारी असणार आहे. गोलरक्षक थिबोट कुटरेल्स हा पोलादी कणा म्हणून ओळखला जातो. बचाव फळीतील उणिवा टॉबी अल्डरविअर्ड व जॉन व्हर्टोघेन कशा दूर करणार यावरच त्यांचे यशापयश आहे.

  • जागतिक क्रमवारीतील स्थान : ५
  • पात्र : युरोपियन महासंघाच्या पात्रता स्पर्धेतील ह गटाचे विजेते.
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
  • प्रशिक्षक : रॉबर्ट मार्टिनेझ
  • संभाव्य व्यूहरचना : ३-४-२-१

 

टय़ुनिशिया

  • जागतिक क्रमवारीतील स्थान : २८
  • पात्र : आफ्रिकन फुटबॉल महासंघाच्या ‘अ’ गटात तिसरे स्थान
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : पात्रता फेरीतच पराभूत.
  • प्रशिक्षक : नाबिल मालओल
  • संभाव्य व्यूहरचना : ४-२-३-१

ई गल्स ऑफ कार्थेज म्हणून ख्यातनाम असलेल्या या संघाने कांगो प्रजासत्ताक, लिबिया व गिनिआ या देशांना मागे टाकून पात्रता पूर्ण करीत अपेक्षा उंचावल्या आहेत. बारा वर्षांनंतर प्रथमच त्यांनी मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले आहे. पात्रता फेरीतील लढतींमध्ये एकही सामना त्यांनी गमावलेला नाही. अल दुहेल या व्यावसायिक संघाकडून खेळणारा युसूफ मसकानी याला दुखापतीमुळे मुख्य स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. हा त्यांच्या संघास मोठा धक्का बसला आहे. पाचव्यांदा त्यांनी मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले असले तरी त्यांची मजल नेहमी साखळी गटापर्यंतच मर्यादित राहिली आहे.

 

इंग्लंड

इंग्लंडने १९६६ मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या व्यावसायिक लीगमध्ये जगातील अत्यंत अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होत असतात, मात्र तरीही इंग्लंडकडे पुन्हा विश्वविजेते होण्यासाठी आवश्यक असणारे नैपुण्य दिसून येत नाही अशी टीका सतत केली जाते. गतवेळी साखळी गटातच आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढविली होती. २०१६ मध्ये झालेल्या युरोपियन स्पर्धेतील उपउपान्त्यपूर्व फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला होता. यंदा बऱ्याचशा युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. साउथगेट या प्रशिक्षकांनी २०१६ मध्ये मार्गदर्शकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर इंग्लंड संघाबाबत काही धाडसी निर्णय घेतले आहेत. हॅरी केन, जेमी व्हॅर्डी, रहिम स्टेर्लिग, गॅरी चॅहील, फिल जोन्स, अ‍ॅश्ली यंग, मार्कस रशफोर्ड हे खेळाडू संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.

  • जागतिक क्रमवारीतील स्थान : १२
  • पात्र : युरोपियन महासंघाच्या पात्रता स्पर्धेतील फ गटाचे विजेते
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी :मुख्य स्पर्धेतील साखळी गटातच बाद
  • प्रशिक्षक : गॅरेथे साऊथगेट ’संभाव्य व्यूहरचना : ३-४-२-१

 

पनामा

प्र्र थमच या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविल्यानंतर पनामा देशात राष्ट्रीय स्तरावर शासकीय सुट्टी देत आनंद साजरा करण्यात आला होता. त्यांनी पात्रता फेरीत कोस्टा रिकासारख्या मातबर संघावर २-१ अशी मात केली होती. जेमतेम चाळीस लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने त्यांच्या साखळी गटात अमेरिकेसारख्या बलाढय़ देशाला मागे टाकून विश्वचषकाची मुख्य फेरी गाठली आहे. त्यामुळेच त्यांना कमी लेखता येणे चुकीचे ठरणार आहे. पहिल्यांदाच मुख्य फेरी गाठली असल्यामुळे त्यांच्यावर कामगिरीबाबत कोणतेही दडपण नसणार आहे. हे लक्षात घेत मुक्तपणे चाली करीत काही अनपेक्षित कामगिरी करण्याबाबत त्यांचे खेळाडू आशावादी आहेत. त्यांचे प्रशिक्षक हर्नान यांनी यापूर्वी कोलंबिया संघाला १९९८च्या स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान मिळवून दिले होते. पाठोपाठ त्यांनी २००२ मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली इक्वेडोर संघास मुख्य फेरीत स्थान मिळवून देण्याची किमया साधली होती. आता पनामा देशास हे यश मिळवून दिले आहे.

  • जागतिक क्रमवारीतील स्थान : ४९
  • पात्र : उत्तर, मध्य अमेरिकन व कॅरेबियन बेटे यांच्या महासंघाच्या स्पर्धेतील तिसरे स्थान
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : पात्र ठरण्यात अपयशी
  • प्रशिक्षक : हर्नान दारिओ गोमेझ
  • संभाव्य व्यूहरचना : ४-४-२

 

समारा स्टेडियम, समारा

विश्वचषक स्पर्धेसाठीच हे स्टेडियम बांधण्यात आले आहे. या स्टेडियमची पूर्वरचना २०१० मध्ये करण्यात आली होती. २०१२ मध्ये या स्पर्धेसाठी समारा शहराचे नाव निश्चित झाल्यानंतर २०१४ मध्ये या स्टेडियमच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. हे स्टेडियम २०१७ मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, मात्र मार्च २०१८ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्याची चाचणी घेण्यासाठी २८ एप्रिल २०१८ रोजी येथे राष्ट्रीय स्तरावरील एक लीग सामना घेण्यात आला. क्रेलिया सोवेतोव्ह क्लबचे हे घरचे मैदान राहणार आहे.

  • प्रेक्षक क्षमता-४५ हजार
  • सामने-कोस्टा रिका वि. सर्बिया, डेन्मार्क वि. ऑस्ट्रेलिया, उरुग्वे वि. रशिया, सेनेगल वि. कोलंबिया, तसेच उपउपान्त्यपूर्व व उपान्त्यपूर्व फेरीचा प्रत्येकी एक सामना.

संकलन : मिलिंद ढमढेरे