टोकियो : अखेरच्या क्षणांमध्ये केवळ दुर्दैव आड आले म्हणून जपान सामन्यात पराभूत झाला असला तरी आमच्या खेळाडूंनी त्यांच्या दमदार खेळाने आणि चांगल्या वागणुकीने प्रेक्षकांची मने जिंकली, असे कौतुकोद्गार जपानी प्रसारमाध्यमांनी आणि समाजमाध्यमांनी काढले आहेत.

या सामन्याने अक्षरश: अनेकांना देहभान विसरायला लावले. अखेपर्यंत वर्चस्व गाजवलेल्या सामन्यात जपानला केवळ नशिबाने दगा दिल्यामुळेच बाहेर पडावे लागल्याची भावनादेखील समाजमाध्यमांमध्ये बोलून दाखवली जात होती. ‘‘जपानच्या कामगिरीने खरोखरच प्रभावित झालो आहे. ते पराभूत झाले असले तरी ताठ मानेने माघारी येऊ शकतात, अशीच लढत त्यांनी दिली,’’ असा सूरदेखील अनेक ठिकाणच्या माध्यमांतून व्यक्त करण्यात आला. ‘‘जपानी खेळाडू आणि प्रेक्षकांना खरोखर मनापासून सलाम,’’ अशा शब्दांतदेखील समाजमाध्यमांवर अनेक ठिकाणी दाद देण्यात आली आहे. अनेक सामन्यात खेळाडूंनी पंचांशी वादावादी करणे, आकांडतांडव करणे किंवा खेळाशी निगडित गैरवर्तन करणे असे कुठलेही प्रसंग घडले नाहीत. सामन्यात खऱ्या अर्थाने खिलाडूवृत्ती दाखवून जपानी खेळाडूंनी सगळ्यांची मने जिंकल्याचे समाजमाध्यमांनी म्हटले आहे. जपानचा माजी मध्यरक्षक ताकाशी फुकूनिशीने त्याच्या ‘ट्विटर’ खात्यावर म्हटले आहे की, ‘‘या सामन्याने मी हादरून गेलो आहे. संघ अत्यंत एकजुटीने अखेपर्यंत लढला. संपूर्ण संघ, प्रशिक्षक आणि सहायक मार्गदर्शकांनी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे जाणवत होते, तरीदेखील अंतिम क्षणी उलटफेर झाल्याने हा अनुभव वेदनादायी होता.’’