रवि पत्की – sachoten@hotmail.com
फ्रान्स विरुद्ध अर्जेन्टिना सामन्याचा ४-३ स्कोर ऐकल्यावर कुणालाही वाटले असते हा पेनल्टी शूट आऊटचा स्कोर आहे. विश्वचषक स्पर्धेतल्या दोन जगप्रसिद्ध संघाकडून पहिली अपेक्षा असते भक्कम बचावाची. प्राथमिक फेरी संपल्यावर होणारे सामने स्कोर बोर्डावर फार कंजूष असतात. १-०, १-१ अशा स्कोर लाईनवर सामने संपतात. पण ७ गोल झाल्यामुळे प्रेक्षकांची दिवाळी झाली.

अर्जेन्टिनाच्या डीमारियाने २५ यार्डावरून मारलेला गोल ब्राझीलचा माजी ग्रेट रोबरटो कारलॉसला सुद्धा रोमांचित करून गेला असेल. कारलॉसचे अशा शॉट्समध्ये स्वतःचे स्थान होते. रिव्हर्स स्विंगसारख्या बदलणाऱ्या दिशेने चेंडूने गोलकीपरच्या डाव्या बाजूला वळून जाळ्यात धडक मारली. फ्रान्सच्या पावार्डने मारलेला राईट फूटर तर खूपच कठीण होता. कारण चेंडू ट्रॅप न करता टप्प्यावर जमिनीला समांतर मारलेला बूम-बूम शॉट फ्रान्सच्या वाऱ्याच्या गतीच्या टिजीवि ट्रेनला लाजवेल असा होता.

अर्जेन्टिनाने बऱ्याचदा आपला हाफ फ्रान्सला आंदण म्हणून कसा दिला हे कोडंच आहे. अर्जेन्टिनाला बचावाकडे लक्ष द्यावं लागेल असे सामन्या आधी सगळेच म्हणत होते. एमबापे लोण्यातून सुरी जावी इतका सहज अर्जेन्टिनाच्या गोल पोस्टच्या दिशेने जात होता. त्याची स्प्रिंट बघून रोनाल्डो आणि रुड वॅन निस्टलरॉय आठवले. पायाच्या स्नायूत अफाट ताकद असण्याचा तो परिपाक होता.

सामना संपल्यावर सुरू झालेले बातम्यांचे मथळे अगदी अपेक्षित बालिशपणाने भरलेले होते. उदा: ‘मेसी अर्जेन्टिना वर्ल्ड कप मधून बाहेर’, ‘मेसी फ्लॉप, फ्रान्स ऑन टॉप’, ‘अर्जेन्टिनाला वर्ल्ड कप देण्यात मेसी अपयशी’. जसं काही ११ फ्रेंच खेळाडुंच्या विरुद्ध अर्जेन्टिना तर्फे एकटा मेसी मैदानात होता. अद्वितीय खेळाडूचा मिडीया प्रथम ब्रँड घडवतो आणि त्याच्या यश आणि अपयश दोन्हीवर कशी पोळी भाजून घेतो याच्या अनेक उदाहरणांपैकी मेसी एक. चाहत्यांनी केलेल्या व्यक्ती पूजेची आणि त्या बरोबर येणाऱ्या टीका, कडवट प्रतिक्रिया यांची कितीही सवय झालेली असली तरी अशी पदरी पडलेली निराशा खेळाडूला हलवून टाकते. भारतात असे दडपण किती वर्षे कोणी झेलले हे वेगळे सांगायला नको.

मीडियाने पुढचा मोर्चा एमबापे कडे वळवला तर आश्चर्य वाटायला नको. एमबापेने दुसरा गोल मारल्यावर दहा नंबरची जर्सी घालणाऱ्या एमबापे बद्दल ‘अ न्यू नंबर टेन ईज बॉर्न’ असं म्हणून टीव्ही समालोचकाने येणाऱ्या काळाची चुणूक दाखवून दिलीच आहे.