फिफा विश्वचषकात सलामीच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसलेल्या माजी विजेत्या जर्मनीचं स्पर्धेतलं आव्हान कायम राहिलेलं आहे. स्वीडनविरुद्धच्या सामन्यात अतिरीक्त वेळेत टोनी क्रुसने केलेल्या गोलमुळे जर्मनीने २-१ असा विजय संपादन केला. स्वीडनकडून ओला टोइवोनेनने ३२ व्या मिनीटाला गोल करत आघाडी घेतली होती. पण जर्मनीने आपला खेळ उंचावत स्वीडनच्या आशेवर पाणी फेरले. चार वेळा फिफा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या जर्मनीकडून मार्को रेयूसने 48 व्या आणि टोनी क्रुसने ९० + ४.४२ व्या मिनीटाला गोल केला.

सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा स्विकारला होता. दोन्ही संघाची बचावफळी चांगला खेळ करत असल्यामुळे सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. मात्र ३२ व्या मिनीटाला स्वीडनच्या ओला टोईवोनेने ही कोंडी फोडत स्वीडनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या सत्रात जर्मनीने आपला खेळ उंचावत सामन्यात बरोबरी साधली. मार्को रेयूसने ४८ व्या मिनीटाला जर्मनीला बरोबरी साधून दिली. यानंतर सामना बरोबरीत सुटणार असं वाटत असतानाच अतिरीक्त वेळेत टोनी क्रुसने गोल करत एका क्षणार्धात सामन्याचं चित्र पालटवत जर्मनीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.