यजमान रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात आज सलामीचा सामना

चार वर्षांपासून फुटबॉलप्रेमी ज्या क्षणाच्या प्रतीक्षेत होते, तो अखेरीस गुरुवारी येणार आहे. १४३२ दिवसांपूर्वी मारिया गोत्झेने अतिरिक्त वेळेत गोल करून जर्मनीला चौथे विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. त्याच कथेच्या नव्या अध्यायाला १४ जून २०१८पासून म्हणजेच गुरुवारपासून रशिया विरुद्ध सौदी अरेबिया या लढतीने सुरुवात होत आहे. राजधानी मॉस्कोतील ल्युझनिकी स्टेडियमवर रात्री ८.३० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे बिगूल वाजणार आहे. दहशतवादी हल्ला आणि हुल्लडबाज प्रेक्षक हे दुहेरी आव्हान समोर असतानाही रशिया ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला आहे. पोलिसांचा प्रचंड मोठा ताफा स्टेडियमभोवती तैनात करण्यात आल्याने एखाद्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत खेळण्याचा मान प्रथमच आशियाई देशाला मिळाला आहे. दुसरीकडे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात यजमानांना सलामीच्या लढतीत एकदाही पराभव पत्करावा लागलेला नाही. त्यामुळे यजमान रशिया ही परंपरा कायम राखण्यासाठी, तर सौदी अरेबिया संधीचे सोने करण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांची मुख्य स्पर्धेपूर्वीची कामगिरी

चढ-उतारांची राहिली आहे. रशियाला आंतरराष्ट्रीय सामन्यांत सात वेळा विजय मिळवण्यात अपयश आले आहे, त्यांनी ऑक्टोबर २०१७मध्ये दक्षिण कोरियावर मिळवलेला विजय अखेरचा ठरला आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाही सलग तीन मैत्रीपूर्ण लढतीत पराभवाचा सामना करून येथे दाखल झालेली आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयी सलामीसाठी उत्सुक आहेत. विश्वचषक स्पर्धेत २००२पासून विजय मिळवता आलेला नाही, तर सौदी अरेबियाने १९९४मध्ये शेवटची विजयाची चव चाखली होती.

नुकत्याच झालेल्या मैत्रीपूर्ण लढतींमध्ये कामगिरी साजेशी न झाल्याने रशियाच्या संघावर प्रचंड टीका झाली. मात्र, तरीही रशियाला पहिल्या लढतीत विजय मिळवण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांनी नोव्होगोस्र्क येथे कसून सराव केला. दुसरीकडे सौदी अरेबियाने निकालापलीकडे सातत्यपूर्ण खेळाचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांमध्ये रशिया (क्र. ७०) आणि सौदी अरेबिया (क्र. ६७) हे जागतिक क्रमवारीत पिछाडीवर असलेले संघ सहभागी झालेले आहेत. मात्र ‘अ’ गटातून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी ही लढत जिंकणे दोघांनाही अनिवार्य आहे.

तुम्हाला हे माहीत आहे?

  • विश्वचषक स्पर्धेत यजमान संघाला एकदाही सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागलेला नाही. यामध्ये सहा विजयांचा समावेश आहे, तर तीन सामने बरोबरीत सुटले आहेत. १९७०च्या विश्वचषक स्पर्धेत सोव्हियत युनियन असलेल्या रशियाला सलामीच्या लढतीत यजमान मेक्सिकोने गोलशून्य बरोबरीत रोखले होते.
  • आशियाई खंडातील यशस्वी संघांपैकी एक म्हणून सौदी अरेबिया ओळखला जातो. त्यांनी तीन वेळा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे आणि चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे. १९९४मध्ये ते प्रथम या स्पर्धेत सहभागी झाले होते.
  • रशिया आणि सौदी अरेबिया या संघांतील खेळाडूंचे सरासरी वय २९ वष्रे आहे. या स्पर्धेतील तरुण संघांच्या यादीत हे संघ तळाशी राहतात

संभाव्य संघ

रशिया : इगोर अ‍ॅकिन्फीव्ह, मारियो फर्नाडेस, फेडर क्रुडीयाशोव्ह, सेर्गी इग्नॅशेव्हीच, युरी झिरकोव्ह, रोमन झोबनीन, डॅलर कुझीयाइव्ह, अ‍ॅलन ड्झगोएव्ह, अ‍ॅलेक्सांडर सॅमेडोव्ह, अ‍ॅलेक्झँडर गोलोव्हीन, फेडर स्मोलोव्ह.

सौदी अरेबिया : अब्दुल्लाह अल-मेयूफ, उसमाह हुसवी, ओमार होसवी, यासेल अल-शाहरानी, मोहम्मद अल-सहलवी, अब्दुल्लाह ओटीफ, सलमान अल-फराज, याहया अल-शीहरी, तैसीर अल-जासीम, सालेम अल दोसारी, फहाद अल-मोलाद.

प्रशिक्षकांमध्ये चुरस

ज्युआन अँटोनियो पिझ्झी आणि रशियाचे स्टॅनिस्लाव्ह चेर्चेसोव्ह यांनी प्रशिक्षणाची शैली आणि व्यक्तिमत्त्व परस्परविरोधी आहे. सतत आक्रमण करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्याची रणनीती आखणाऱ्या पिझ्झी यांनी चिलीसह २०१६ची कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली आहे. सौदी अरेबियाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या कामगिरीतील सातत्य हरवलेले दिसले आहे. स्टॅनिस्लाव्ह हे बचावात्मक शैलीवर विश्वास ठेवतात.