येकातेरिनबुर्ग : उत्कृष्ट सांघिक समन्वय आणि भक्कम बचावाचा प्रत्यय घडवत स्वीडनने मेक्सिकोवर ३-० असा सफाईदार विजय मिळवला आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. साखळी ‘ड’ गटात त्यांनी अग्रस्थान मिळवले.

स्वीडनला बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी हा सामना दोन गोलांच्या फरकाने जिंकणे अनिवार्य होते. त्यांनी सुरुवातीपासून जोरदार आक्रमक चाली केल्या, परंतु पूर्वार्धात गोलफलक कोराच होता. ५०व्या मिनिटाला लुडविग ऑगस्टिन्सनने गोल करीत स्वीडनचे खाते उघडले. ६२व्या मिनिटाला पेनल्टी किकचा फायदा उठवत कर्णधार आंद्रेस लँडक्विस्टने संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. ७४व्या मिनिटाला मेक्सिकोच्या एडिसन अल्वारेझकडून स्वयंगोल झाला.