स्वित्झर्लंड आणि कोस्टारिका यांच्यातील बुधवारी रात्री उशिरा झालेला सामना बरोबरोबरीत राहिला. सामना बरोबरीत सुटूनही स्वित्झर्लंडने ‘इ’ गटातून बादफेरीत प्रवेश केला आहे. या गटातील ५ वेळच्या विश्वविजेता ब्राझीलनेही उप-उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. स्वित्झर्लंडची बादफेरीत स्वीडनशी गाठ पडेल. स्वित्झर्लंडचा खेळाडू सॉमरच्या आत्मघातकी गोलमुळे हा सामना बरोबरीत सुटला.

निजनी नोवगोरोद येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्वित्झर्लंडचा ब्लेरिम जेमेलीने ३१ व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. हाफ टाईमपर्यंत ही आघाडी कायम होती. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. या हाफमध्ये एकूण ३ गोल झाले. ३० वर्षीय केंडल वास्टनने ५६ व्या मिनिटाला हेडर करत कोस्टरिकाला १-१ अशी बरोबरी करून दिली.

अंतिम शिटी वाजण्याच्या काही क्षणापर्यंत हा सामना १-१ असा बरोबरीत राहील असे वाटले होते. पण जोसीप ड्रेमिकने ८८ व्या मिनिटाला पुन्हा एकदा स्वित्झर्लंडला २-१ने आघाडी मिळवून दिली. नंतर सॉमरच्या एक्स्ट्रा टाइममधील आत्मघातकी गोलमुळे कोस्टारिकाला बरोबरी साधता आली आणि हा सामना २-२ असा बरोबरीत राहिला.

स्वित्झर्लंडने यापूर्वी ब्राझीलला १-१ असे बरोबरीत रोखले होते. तर आपल्या दुसऱ्या सामन्यात सर्बियाला २-१ ने पराभूत केले होते. तर कोस्टारिकाला पहिल्या सामन्यात सर्बियाविरोधात ०-१ अशी हार पत्करावी लागली होती. तर दुसऱ्या सामन्यात ब्राझीलकडून त्यांचा ०-२ असा पराभव झाला होता.