क्रीडाविश्वापासून ते कलाविश्वापर्यंत सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे FIFA World Cup 2018ची. अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या फुटबॉल विश्वचषकासाठी आता प्रत्येकजण आपआपल्या परीने तयार होत आहे. त्यातच अनेकांना साथ देण्यासाठी सज्ज झालं आहे ते म्हणजे फिफाचं अन्थम साँग. निकी जॅम, विल स्मिथ आणि एरा इस्ट्रेफी यांनी यंदाच्या फिफासाठीचं हे गाणं साकारलं आहे.

‘लिव्ह इट अप’ या गाण्याच्या निमित्ताने विल स्मिथ बऱ्याच काळानंतर संगीतक्षेत्रात पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हे गाणं खास ठरत आहे. असं असलं तरीही सोशल मीडियावर मात्र या गाण्याची फारशी लोकप्रियता पाहायला मिळत नाहीये. शकिराच्या ‘वाका वाका’ या गाण्याला ज्या प्रकारे संपूर्ण जगभरातून पसंती मिळाली त्या प्रकारची पसंती मिळवण्यात लिव्ह इट अप बरंच मागे पडलं आहे.

हे अॅन्थम साँग पहिल्यांदाच ऐकल्यानंतर त्याच्या प्रेमात पडायला नाही झालं तरीही त्याचा ठेका मात्र लक्षात राहण्याजोगा आहे. त्याशिवाय आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे ते मनमुराद जगा, असं सांगणाऱ्या “One life, live it up, ’cause we got one life/ One life, live it up, ’cause you don’t get it twice…” या ओळीसुद्धा या गाण्याला खास टच देत आहेत.

वाचा : FIFA World Cup 2018 Couple Goals: ‘हे’ फुटबॉलप्रेमी दाम्पत्य दहावा वर्ल्डकप पाहण्यासाठी सज्ज, पण…

फिफाच्या अॅन्थम साँगविषयी सांगायचं झालं तर, १९६२ पासून या ट्रेंडची सुरुवात झाली. तेव्हापासून फिफाच्या प्रत्येक हंगामात एखाद्या अॅन्थम साँगने क्रीडारसिकांची मनं जिंकण्याचं काम करत आहे. फिफाला सर्वसामान्यांच्या आयुष्याशी जोडू पाहणाऱ्या या गाण्यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींची जाहीरातही तितक्याच प्रभावीपणे करण्यात येते. जगात फुटबॉलची लोकप्रियता पाहता या अॅन्थमच्या माध्यमातून बऱ्याच कलाकारांनाही प्रसिद्धीझोतात येण्याची संधी मिळते.