विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू होण्याच्या ७१ दिवसांपूर्वीच प्रशिक्षकांची हकालपट्टी करणाऱ्या जपान संघासमोर मंगळवारी होणाऱ्या लढतीत कोलंबियाचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या विश्वचषकात ‘गोल्डन बूट’चा पुरस्कार पटकावणाऱ्या जेम्स रॉड्रिगेजच्या तंदुरुस्तीविषयी संभ्रम असल्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तो या सामन्यात खेळला नाही तरी कोलंबियाचे पारडे नक्कीच जड आहे.

रॉड्रिगेजच्या डाव्या पोटरीवर ताण पडल्यामुळे त्याने संघाच्या सराव शिबिरातही भाग घेतला नव्हता. रॉड्रिगेजवर कोलंबियाची प्रामुख्याने मदार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत गोलरक्षक डेव्हिड ओस्पिना आणि बचावपटू डेव्हिनसन सँचेझ यांच्यावरील दबाव वाढणार आहे. सलग सहाव्या वर्षी विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या जपानच्या आक्रमणाची धुरा शिंजी ओकाझकी सांभाळणार असून त्याला मध्य भागात माकोतो हसेबे आणि शिंजी कागवा हे अनुभवी खेळाडू साथ देतील.

तुम्हाला हे माहीत आहे?

३ जपान आणि कोलंबिया आतापर्यंत तीन वेळा एकमेकांसमोर आले असून या तीन्ही लढतींमध्ये कोलंबियाने जपानला पराभूत केले आहे. यामध्ये २०१४च्या विश्वचषकातील ४-१ अशा फरकाने मिळवलेल्या विजयाचाही समावेश आहे.